आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपाची वेळ चुकली?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य संमेलनाच्या सुमारे दीडशे वर्षांच्या  इतिहासात विदर्भातील बुलडाण्यात एकदाही संमेलन झालेले नव्हते. दुसरी आनंदाची बाब अशी होती की, महानगरीय संमेलनांचा  एक साचा ठरून गेला आहे आणि वारेमाप खर्चाचीही चर्चा होत राहते.  साहित्य महामंडळाची स्थळनिवड समिती स्थळांची पाहणी करून स्थळ निवडत असते. त्यामध्ये  आयोजनाची क्षमता, जागेची उपलब्धता, कार्यकर्त्यांची फळी, अनुभवी मनुष्यबळ आणि आर्थिक सक्षमता असे काही निकष प्रामुख्याने  विचारात घेतले जातात. यंदा  संमेलनाच्या  स्थळनिवड समितीने दिल्ली, बडोदा आणि  हिवरा आश्रम अशा तीन स्थळांना भेटी दिल्या. दिल्लीचे निमंत्रण आयोजकांनी स्वत:च मागे घेतल्याने  दिल्लीचा स्थळ म्हणून विचार अर्थातच मागे पडला. त्यामुळे  स्पर्धा बडोदा आणि हिवरा आश्रम यांच्यात होती. स्थळनिवड समिती आपला अहवाल साहित्य महामंडळासमोर  सादर करते आणि त्यानंतर महामंडळ त्यावर शिक्कामोर्तब करते, अशी पद्धत आहे. त्यानुसार स्थळनिवड समितीने आपला अहवाल महामंडळासमोर सादर केला. महामंडळाच्या  निर्णयात्मक बैठकीत  काही जणांचा बडोद्याला पाठिंबा होता, तर काही जण हिवरा आश्रमाच्या बाजूने होते. त्यामुळे महामंडळाच्या  इतिहासात प्रथमच संमेलनाच्या  स्थळनिश्चितीसाठी मतदान घेण्याचा प्रसंग आला आणि या मतदानात पाच विरुद्ध एक अशा फरकाने हिवरे आश्रमाची निवड झाली. ही निवड जाहीर झाल्यावरच्या तत्काळ प्रतिक्रियांचा मागोवा घेतला तर त्या स्वागत करणाऱ्याच होत्या. हिवरे आश्रमाच्या  पार्श्वभूमीची, शुकदास महाराजांविषयीच्या  किंवदन्तीविषयीचे तपशील काही तासांनी ‘बाहेर’ आले आणि मग हिवरे आश्रम या ‘स्थळा’ला विरोध सुरू झाला.

मात्र, विरोध करणाऱ्यांनी पुढील काही गोष्टींचा विचार केला आहे का, असे विचारावेसे वाटते. निमंत्रण चार महिन्यांपूर्वी दिले गेले, तेव्हा हिवरे आश्रम या नावाला कुणी आक्षेप घेतला नाही. त्यानंतर स्थळनिवड समितीने ज्या स्थळांना भेटी देण्याचे ठरवले, ती नावेही जाहीर करण्यात आली होती. तेव्हाही या स्थळाला कुणी आक्षेप घेतला नाही. स्थळनिवड समितीचे सदस्य प्रत्यक्ष हिवरा आश्रमाला भेट द्यायला गेले, तेव्हाही कुणाला आक्षेप घ्यावा, असे वाटले नाही. 

ज्यांनी या स्थळाविषयीचे आक्षेप माध्यमांसमोर  प्रथम जाहीर केले, त्यांना हा सर्व तपशील आधी आठवला नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. महामंडळाने स्थळ ‘जाहीर’ केल्यावरच त्यावरचे आक्षेप, वाद, निदर्शनांचे इशारे, मूल्यविवेकाचा मुद्दा उपस्थित केला गेला, हे आक्षेप घेणाऱ्यांच्या  हेतूंविषयी शंका निर्माण करणारे आहे, अशी भूमिका महामंडळातील सूत्रांनी मांडली आहे. १९६५ मध्ये स्थापन झालेल्या  विवेकानंद आश्रमाच्या  परिसरात संमेलन होणार आहे. खुद्द हिवरा आश्रम येथील शाखेसह बुलडडाणा जिल्ह्यात विदर्भ साहित्य संघाच्या  तब्बल अकरा शाखा आहेत.  हिवरा आश्रम येथील शाखेने केवळ तांत्रिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे, संमेलनाचा सर्व पुढाकार विदर्भ साहित्य संघाचाच असणार आहे, हे स्पष्ट आहे. शुकदास महाराजांची पार्श्वभूमी, त्यांच्यावरील आरोप या साऱ्या प्रकाराला ३० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. संमेलनाचे स्थानिक आयोजक, पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नवी फळी सध्या कार्यरत आहे. प्रत्येकाला  तीस – पस्तीस वर्षांपूर्वीचे संदर्भ माहिती असणे शक्य असेल असे नाही. ही वस्तुस्थितीही विचारात घेतली जावी. बुवाबाजी, ढोंगीपणा, अंधश्रद्धा, गैरवर्तन या कशाचेच समर्थन कुणीच करणार नाही, मात्र प्रदीर्घ काळानंतर या परिसरात होऊ घातलेला सारस्वतांचा मेळा  शाब्दिक वादांमुळे  अडचणीत सापडू नये, अशी समन्वयवादी भूमिका साऱ्यांनीच  आपलीशी करावी, अशी मनीषा साहित्य महामंडळासह साहित्यप्रेमींचीही आहे. 
- जयश्री बोकील
ब्युरो चीफ, पुणे
बातम्या आणखी आहेत...