आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचे गूढ! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या अस्सल रहस्यकथेपेक्षाही गूढ आणि गुंतागुंतीची प्रकरणे सध्या भारतीय क्रिकेट बोर्डात घडताहेत. सुप्रसिद्ध ब्रिटिश डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स ख-या अर्थाने अस्तित्वात असते तर त्यांनाही या आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या आणि गूढ प्रकरणांची उकल करायला आवडले असते. दररोज काहीतरी नवे घडते. क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेरही. बोर्डरूममध्ये प्रकरणे शिजतात. दोन निवृत्त न्यायमूर्तींचा आयोग नेमून आयपीएलमध्ये सारे काही आलबेल असल्याचे प्रशस्तिपत्रक बीसीसीआयने मिळवले. श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे पुन्हा जाणा-या मार्गातील जावई मयप्पन यांच्यावरील कलंकाचा अडसरही दूर करून घेतला.

अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान होण्याच्या बेतात असलेल्या एन. श्रीनिवासन यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मात्र दणका दिला. बिहार व झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, बीसीसीआयने चौकशी आयोगाची केलेली नियुक्ती त्यांच्या घटनेला धरून आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. दोन निवृत्त न्यायमूर्ती असलेला आयोग, सरसकट सर्व संशयितांना पोलिसांची चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच निष्कलंक म्हणून घोषित करतो. त्या निर्णयाला न्यायालयाकडून चपराक मिळते. त्यामुळे सद्य:परिस्थितीत लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम समजण्यासारखा आहे. बीसीसीआयवर सत्तेचा अंकुश ठेवण्यासाठी उतावीळ झालेल्या प्रत्येक सत्तापिपासूचा वेगवेगळा ‘अजेंडा’ आहे. बीसीसीआयच्या सप्टेंबरमध्ये होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी श्रीनिवासन यांना स्वत:हून दूर लोटलेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसायचे आहे. त्यांना आणखी एका वर्षाच्या कार्यकालाचे वेध लागले आहेत. त्यांच्या या सत्तालोलुप प्रवृत्तीला रोखण्यासाठी सत्तेचे दुसरे पुजारी त्यापेक्षाही गलिच्छ राजकारण खेळत आहेत. प्रत्येक जण आपापल्या भात्यातील साम, दाम, दंड, भेद नीतीची अस्त्रे या युद्धात वापरत आहे. प्रत्येक राज्याचे पोलिस आपापल्या अनुषंगाने कामे करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी मोठा गौप्यस्फोट होणार, असे वाटत असतानाच फारसे काही हाती लागत नाही. मुळातच क्रिकेटमधील ‘फिक्सिंग’च्या व्याख्येबद्दलच गडबड आहे. पुरावे गोळा करण्यात पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणाही दिसून येत आहे. विंदू दारासिंग आणि मयप्पन यांच्यावर पोलिसांना अद्याप आरोपपत्रही दाखल करता आले नाही. तीन क्रिकेटपटूंविरुद्ध आरोप निश्चित करताना दिल्ली पोलिसांचीही दमछाक झालेली दिसून येते. सर्वसामान्य जनता मात्र या सर्व प्रकारांमुळे गोंधळली आहे. प्रसिद्धिमाध्यमांचे आणखी काही वेगळेच सुरू आहे. साप समजून दोरी धोपटण्यासारखे प्रकार सुरू आहेत. एकूण हा सारा प्रकार पाहता लोकांच्या मनातील संशय वाढायला लागला आहे. काही राजकीय व्यक्ती अशी परिस्थिती आपल्या स्वार्थासाठी तर निर्माण करीत नाहीत ना? कारण श्रीनिवासनसारखा खडूस, क्रिकेट प्रशासक हटवला तर अशा इच्छुक राजकारण्यांसाठी सत्ता काबीज करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बीसीसीआयच्या निवडणुका आहेत.

श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सध्या दालमिया यांच्याकडे सोपवली आहेत. त्यांनाही सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी सत्तेच्या नाड्या आपल्या हाती घ्यायच्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरायचे आहे. त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या जावयाचे प्रताप प्रमुख अस्त्र म्हणून कामी आले आहे. श्रीनिवासन यांच्याकडे बीसीसीआयच्या सत्तेच्या किल्ल्या जर पुन्हा गेल्या, तर अनेकांना बीसीसीआयमधील श्रीनिवासन यांनी उपकृत करून उभा केलेला पाठिंब्याचा अभेद्य किल्ला भेदता येणे अशक्य आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांची आताच कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे अंतर्गत शत्रू बीसीसीआयला खिळखिळे करीत असतानाच, दुसरीकडे सरकारनेही क्रीडाविकासाचा नवा आराखडा तयार करताना बीसीसीआय आणि अन्य मग्रूर क्रीडा संघटना नजरेसमोर ठेवून नियमांची आखणी केली आहे. बीसीसीआयला ‘आरटीआय’ कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी क्रीडा खात्यानेही कंबर कसली आहे.

पैशाचा माज आणि सत्तेची मग्रुरी वाढल्यामुळे बीसीसीआयने सर्वच पातळ्यांवर अनेक शत्रू निर्माण केले आहेत. अस्तनीतल्या निखा-यांनी त्यांना आधीच पोळले आहे. प्रसिद्धिमाध्यमांशी सतत पंगा घेणा-या बीसीसीआयने मीडियाला स्वत:हून मोठा शत्रू निर्माण केला. आयसीसीलाही पैशाच्या जोरावर लोटांगण घालायला लावणा-या बीसीसीआयचे आपल्या वडीलधा-या संघटनेशी असलेले वैरही महागात पडणार आहे. अनेक राजकारण्यांना प्रसिद्धी, पैसा आणि वलय क्रिकेटकडे आकर्षित करीत आहे. सरकारलाही क्रिकेटवर वर्चस्व हवे आहे. अशा परिस्थितीत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये होणा-या घटना, निर्णय आणि राजकारण यांनी खेळापेक्षाही अन्य गोष्टींबाबतचा संभ्रम वाढवला आहे. क्रिकेटरसिकांना खेळाचा, भारतीय संघाच्या विजयाचा आनंददेखील आता लुटता येत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक विजय आणि विजेतेपदाला निकाल ‘फिक्स’ केल्याच्या संशयाचा वास येतो. प्रत्येक निकाल आणि निर्णयापाठी सुडाच्या राजकारणाचे धागेदोरे दिसायला लागतात. सत्तालोलुप श्रीनिवासन यांना स्वत:च्या जावयाला निष्कलंक ठरवण्याची घाई झाली. अध्यक्षपदाची सूत्रे दालमिया यांच्याकडे काही काळापुरती सोपवून त्यांनी स्वत:ची मान वाचवली. मात्र पुन्हा एकदा जावयाला झटपट निर्दोष ठरवण्याच्या प्रयत्नात ते अडचणीत आले आहेत. पोलिसांच्या चौकशी प्रक्रियेची पूर्तता होण्याआधीच आयोगामार्फत दोषी व्यक्तींना निर्दोष ठरवण्याचा प्रमाद त्यांच्याकडून घडला आहे. दालमिया यांच्याकडे सोपवलेला सत्तेचा राजदंड पुन्हा स्वीकारण्यासाठी त्यांची ही धावपळ सुरू असल्याचे संकेत मिळताहेत. राजीव शुक्ला यांच्याकडे आयपीएल अध्यक्षपद पुन्हा सोपवून त्यांच्यामार्फत आयोगाच्या या निर्दोष ठरवण्याच्या अहवालावर शिक्कामोर्तब करून घेण्याचा डाव आहे. श्रीनिवासन यांच्यावर त्यांचा हा डाव उलटवण्यासाठी अन्य मंडळीही त्यामुळे सज्ज झाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे ‘सिग्नल्स’ शरद पवारांनी दिले आहेत. मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर पवारांना पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्षपदही भुरळ घालू शकते, हेही तसे गूढच आहे. सध्याच्या घटना त्या गोष्टी तर सूचित करीत नाहीत?