आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला धोक्याची घंटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उणपुरे आठ वर्षे वय असलेल्या मनसेला प्रतिष्ठापित होण्याची खरी संधी नाशिककरांनी दिली. मनसेच्या तीन आमदारांना संधी दिल्यानंतरही फारसे नवनिर्माण झाले नाही याची जाणीव असतानाही याच नाशिककरांनी शहराचा कायापालट करण्याच्या राज ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत महापालिकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या चाव्या मनसेकडे सुपूर्द केल्या. सत्ता मिळाल्यानंतर जादूची कांडी फिरवल्यागत बदल होतील व रातोरात रस्ते चकचकतील. गटारी बंद होऊन शुद्ध पाण्याचे झरे वाहतील. रोगराई जाईल. उच्च शिक्षण मिळेल अशी स्वप्ने नाशिककरांनीही पाहिली नाहीत. नुकतेच मनसेचे पालिकेतील सत्तेचे वर्ष पूर्ण झाले. त्याच वेळी राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. मनसेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौर्‍याला सुरुवात केली. दौर्‍यात कॉँग्रेस आघाडीला, खासकरून राष्ट्रवादीला लक्ष्य केल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांनीही प्रत्युत्तरात ठाकरे यांच्या ताब्यातील एकुलत्या एक नाशिकच्या गडावर हल्ला केला. एक वर्ष सरले; नाशिकमध्ये मनसेने काय केले, असा सवाल करून राज यांना लक्ष्य केले. ठाकरे यांनी चोख उत्तर देत 14 वर्षे सलग सत्ता उपभोगून कॉँग्रेस आघाडीने भ्रष्टाचारापलीकडे काय केले, असा प्रतिप्रश्न केला. यातच नाशिकच्या विकासाबाबत पाच वर्षांनी विचारा, असे सांगून त्यांनी सर्वांच्याच प्रश्नांच्या वाटाच बंद करण्याचा प्रयत्न केला. नियोजनबद्ध विकासासाठी काही अवधी लागतो हे राज यांचे म्हणणे स्वाभाविक आहे. अवाढव्य व ओबडधोबडपणे वाढलेल्या नाशिक शहराचे रुपडे एका वर्षात पालटणे अशक्यप्राय आहे. ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे पुरुष गरोदर होणे सोडले तर दुसरे काहीही अशक्य नाही, असे क्षणभर गृहीत धरले तरी कमी कालावधीत नवनिर्माण करणे अशक्यप्रायच आहे. साधे रस्ते रुंदीकरणाचेच उदाहरण घेतले तरी त्यासाठी प्रथम अतिक्रमण काढावे लागेल. लोकांचा रोष झेलावा लागेल. व्होट बॅँकेला धक्का लागेल. अशा अनंत अडचणी मनसेपुढे असतील. त्यामुळे राज यांनी एक वा दोन वर्षात विकास होणार नाही ही मांडलेली भूमिका निश्चितच योग्य आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की मोठा कायापालट करण्यासाठी छोट्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे. खासकरून राज यांच्याकडून तरी अपेक्षा नाही. मनसेला सत्ता मिळून वर्ष उलटल्यानंतर मोठा कायापालट तर सोडा, मात्र लक्षवेधी बदल झालेले नाही. वॉर्डातील साधे साधे प्रश्नही सुटलेले नाहीत. प्रभाग स्वच्छ ठेवणे, कपातीच्या कालावधीत पुरेसे पाणी देणे, आरोग्यविषयक उपाययोजना, साफसफाई, पालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावणे अशी साधी मलमपट्टीही मनसेच्या नगरसेवकांना करता आलेली नाही. मनसेच्या कार्यालयात रोजगारविषयक उपक्रम असो की आताच पार पडलेल्या कर्णबधिर तपासणी शिबिरासारख्या उपक्रमातून फारसा बदल होण्याची चिन्हे नाहीत. नाशिकचे शांघाय वगैरे करण्याचे प्रयत्न असतील तर त्यासाठी वेळ लागेल. मात्र ते करताना शहरातील मूलभूत प्रश्न वा समस्या सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्नांकडे होणारी डोळेझाक आता चर्चेचा विषय ठरू लागली आहे. मध्यंतरी ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला गेला खरा; मात्र या दौर्‍यात प्रचंड समस्यांचा पाऊसच पडला. महापौर गल्लीबोळात गेले नसते तर या वर्षभरापासून नाशिककर सोसत असलेल्या समस्यांवर प्रकाश पडला नसता. त्यामुळे मोठे प्रकल्प करण्याच्या नादात छोट्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष मनसेसाठी बालेकिल्ल्यात धोक्याची घंटा ठरू शकते. आजघडीला नाशिकचे वैभव असलेल्या गोदावरीचा विचार केला तर प्रदूषणमुक्त करणेही जमलेले नाही. गोदावरी गटारीकरणविरोधी मंचसारख्या सामाजिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे आता कोठे सफाईचा हात फिरवण्यापासून तर आधुनिक यंत्र खरेदीसाठी प्रयत्न होत आहेत. तिकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विक्रांत मते या एका नवोदित नगरसेवकाने प्रभागातील गोदावरी स्वच्छ करण्यासाठी मोटारबोट तयार करून छोटे प्रयत्नदेखील कसे कायापालट करू शकतात व लोकांचे लक्ष वेधू शकतात हे दाखवून दिले.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाशिकचे नवनिर्माण करण्याजोगा एकही ठळक प्रकल्प नाही. खासगीकरण अथवा पीपीपीसारख्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांसाठी प्रस्ताव तयार करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पोषक वातावरण निर्माण करणे आणि त्यापुढे टेंडर प्रक्रियेपासून तर प्रत्यक्षात प्रकल्प साकारण्यापर्यंतचे टप्पे मोठे आहेत. प्रक्रियेशिवाय कोणतेही काम होत नाही ही राज यांची भूमिका योग्यच आहे. मात्र प्रक्रिया कधी सुरू होणार हे महत्त्वाचे आहे. आजघडीला नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने एखादा मोठा प्रकल्प मनसेने आणला किंवा आणला जात आहे अशी आनंददायी कोणतीही वार्ता नाही. त्यामुळे एक असो की चार वर्षे, नाशिककरांनी धीर धरण्याकरिता काहीतरी शुभसंकेत मिळण्याची अपेक्षा धरली तर त्यात गैर काय ? जनतेच्या मनातील प्रश्न असो की खदखद मोकळी करून देण्याचे काम मीडिया करीत असते. त्यामुळे पाळणा कधी हलणार हा मीडियातील प्रश्न शिवराळ भाषेत व नेहमीच्या शैलीत टोलवून प्रश्न थोडीच मिटणार? 14 वर्षे त्यांनी काय केले हे विरोधकांना विचारा असा मीडियाकडे आग्रह धरणेही चुकीचे आहे. शेवटी राज यांनी माझ्याकडे चमत्कार करणारी शक्ती नाही असे सांगितलेच. चमत्काराची शक्ती नसेल तर एकाएकी कायापालट होणार तरी कसा ? त्यामुळे थोडा दम धरा, विकास करून दाखवतो यावर कितपत विश्वास ठेवायचा. पुढील वर्षभरात लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी सहा महिन्यांतच आचारसंहिता लागेल. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सहा महिने उलटतील. तोपर्यंत साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊन महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजतील. विकासकामांना आचारसंहितेची बाधा होण्याचे नेहमीचेच प्रकार लक्षात घेतले तर आताच मनसेच्या आमदारांना तीन वर्षात काय केले, असे विचारले तर त्यांचे पहिले उत्तर राज्य सरकारकडून आर्थिक कोंडी होत असल्याचे दिले जाते. उद्या मनसेने नाशिकमध्ये सत्ता असताना काय केले, असे विचारले तर, दोन वर्षे नियोजनात व अंमलबजावणीची वेळ आल्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण झाली, असे उत्तर मिळाले तर नवल वाटू देऊ नये.