आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपर्क क्रांती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी समाजावर तंत्रज्ञानाचा प्रभाव दिवसेंदिवस किती वाढत आहे याची आकडेवारी वर्ल्ड बँकेने आपल्या ‘इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट 2012 : मॅक्झिमायझिंग मोबाइल’ या अहवालात दिली आहे. गेल्या काही वर्षांत कम्प्युटरच्या वापरामुळे किंवा सोशल मीडियामुळे मानवी जीवन वेगाने प्रभावित झाल्याचे अनेकांना वाटेल. पण वस्तुस्थिती तशी नाही. वर्ल्ड बँकेच्या या अहवालात केवळ मोबाइलच्या सार्वत्रिक आणि वेगवान प्रसारामुळे मानवी जीवनाला वेग आल्याचे म्हटले आहे. अगदी आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास 2000 मध्ये जगभरात मोबाइल वापरणा-यांची संख्या 1 अब्ज होती. आता 2012 पर्यंत 6 अब्ज लोकसंख्येच्या हातात मोबाइल गेला आहे. म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या मोबाइलच्या सेवेत जाळ्यात आली आहे आणि येत्या 5 वर्षांत संपूर्ण जग मोबाइलच्या जाळ्यात येईल असा काही जाणकारांचा होरा आहे. या मोबाइल क्रांतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे जे ग्राहक मोबाइल सेवेचा लाभ घेत आहेत, त्यापैकी दोन तृतीयांशपैकी अधिक ग्राहक हे गरीब आणि विकसनशील देशातील आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती केली असली तरी अनेक वैज्ञानिक शोध किंवा तंत्रज्ञानाचा फायदा तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचतोच असे नसते. पण मोबाइल तंत्रज्ञानाने धर्म-वंश-भाषा-लिंग-देश अशा सर्व सीमारेषा भेदून अल्पावधीत संपूर्ण जगभरात सामाजिक-आर्थिक पातळीवर संवादाचे पूल बांधले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एखाद्या तंत्रज्ञानाने अत्यंत कमी वेळात मानवी समाजामध्ये सामाजिक-आर्थिक पातळीवर अशा प्रकारचे मंथन करणे ही ऐतिहासिक बाब असल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे.
भारताच्या बाबतीत या मोबाइल क्रांतीची आकडेवारी विस्मयकारक आहे. आपल्या देशातील प्रत्येकी 100 व्यक्तींपैकी 70 व्यक्तींकडे स्वत:चा मोबाइल आहे. या मोबाइलधारकांपैकी 96 टक्के व्यक्तींकडे मोबाइल कंपन्यांची प्रीपेड कार्ड आहेत. सुमारे 53 टक्के घरांमध्ये किमान एक मोबाइल आहे. देशातील सुमारे 83 टक्क्यांहून अधिक जनता मोबाइल सेवेचा आपल्या दैनंदिन कामासाठी वापर करते. आपल्या देशातील मोबाइल वापरणारी एक व्यक्ती महिन्याला सरासरी 330 मिनिटे बोलते(म्हणजे दिवसाला 11 मिनिटे). मोबाइलवर बोलणा-यांचे जगातील सर्वाधिक प्रमाण अमेरिकेत आढळते. अमेरिकेत एक मोबाइलधारक साधारण महिन्यातील 772 मिनिटे बोलतो. हे प्रमाण चीनमध्ये 420 मिनिटे तर ब्रिटनमध्ये 192 मिनिटे इतके आहे. या आकडेवारीनुसार अमेरिका आणि चीनपेक्षा भारत मोबाइलवर बोलण्यात फारच मागे असल्याचे दिसते. आपल्याकडे एसएमएस वापरणा-यांची संख्याही एकूण मोबाइलधारकांच्या निम्मी आहे. आपल्याकडे दर मिनिटाला मोबाइल कॉल रेट हा इतर कोणत्याही देशांपेक्षा सर्वाधिक स्वस्त आहे.
भारत आणि चीनमध्ये मोबाइल क्षेत्रात खासगीकरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यातच मोबाइलचे हँडसेट विक्री करणा-या अनेक विदेशी कंपन्या येथील बाजारपेठेत उतरल्याने माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसारही वेगात होत आहे. गेल्या काही वर्षांत बाजारात अनेक स्मार्टफोन आल्यामुळे ही स्पर्धा अधिक चिघळली आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट यांचा जवळचा संबंध असल्याने ग्राहकाला खेचण्यासाठी या कंपन्या रोजच्या रोज नव्या क्लृप्त्या लढवत आहेत. सोशल मीडिया हा तर माहिती-तंत्रज्ञानाचा 21 व्या शतकातील महाविष्कार समजला जातो. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया जेवढा पसरत चालला आहे त्यामध्ये येत्या काही वर्षांत कम्प्युटरपेक्षा मोबाइलचा वाटा अधिक असेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजारात येणा-या नवनव्या स्मार्टफोनसाठी भारत ही भविष्यातील सर्वात मोठी शक्तिशाली बाजारपेठ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतातील ग्राहकांमध्ये मोबाइलचे नवे हँडसेट घेण्यामागेही बरेचसे कुतूहल आहे. अशा स्मार्टफोनचा ग्राहक वर्ग मोठ्या शहरात प्रामुख्याने अधिक आहे. हे स्मार्टफोन घेण्यामधील ग्राहक वर्ग हा ब-याचदा मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय-श्रीमंत असल्याने तो इंटरनेट ग्राहकही आहे. या वर्गामध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. चीनमध्ये मात्र ही आकडेवारी 26.5 टक्के, अमेरिकेत 35.6 टक्के आणि ब्रिटनमध्ये 20.6 टक्के इतकी आहे. भारतातील मोबाइलद्वारे इंटरनेट वापरणा-यांची संख्या इतर विकसित देशांपेक्षा फार कमी असली तरी ही बाजारपेठ सुप्त अशी आहे. उदारीकरणाच्या काळात आणि प्रामुख्याने 21 व्या शतकाच्या अखेरीस देशात इंटरनेटचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हा इंटरनेट घरी घेणा-यांचे प्र्रमाण कमी होते. त्या वेळी शहरांमध्ये कोप-या-कोप-याला इंटरनेट कॅफेंचे जाळे पसरत चालले होते. हे चित्र कालांतराने ग्रामीण भागातही दिसू लागले. पण नंतर काही वर्षांत घराघरात केबलच्या माध्यमातून इंटरनेटने आपले जाळे पसरवले. तशीच परिस्थिती स्मार्टफोनच्या माध्यमातून होईल असे सध्या तरी दिसते. आपल्याकडे वायफाय तंत्रज्ञानाबाबत अजूनही फारशी चर्चा होत नाही. पण मोबाइल इंटरनेटचा ग्राहक वाढवायचा असेल तर अनेक खासगी किंवा सरकारी कंपन्यांना वायफाय तंत्रज्ञान देणारे बूथ गल्लोगल्ली उघडावे लागतील. तो दिवस फार लांबचा नसेल.