आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक समाजवादाचे स्फुल्लिंग : ह्युगो चावेझ (अग्रलेख )

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. वास्तविक महाराष्ट्र-भारत आणि व्हेनेझुएला यांना जोडणारा भौगोलिक-राजकीय किंवा वांशिक असा कोणताही धागा नाही. व्हेनेझुएला हा देश लॅटिन अमेरिकेतला म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक तेलसंपन्न पण गरीब असा देश आहे. या देशाला भेडसावणारे जे सामाजिक-आर्थिक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याकडेही आहेत. पण आपल्याकडे भ्रष्टाचार या विषयाचा बागुलबुवा इतका मोठा करण्यात आला आहे, की इतर प्रश्नांकडे लक्ष देण्याची आपली तयारी नाही. त्यामुळेच आपल्याकडे चर्चा चालते ती शेअर बाजाराची, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या नफेखोरीची वा विकासाची.

पण खरा प्रश्न आहे तो सामाजिक विषमता निर्मूलनाचा. जागतिकीकरणाच्या रेट्यात तिस-या जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मल्टिनॅशनल कंपन्यांच्या म्हणजे अमेरिकेच्या हातात गेल्या. अशा काळात क्युबा, व्हेनेझुएलासारखे विकसनशील देश अमेरिकेच्या साम्राज्यवादाच्या विरोधात लढले. ही लढाई करण्यासाठी या देशांनी सशस्त्र आणि राजकीय संघर्ष केला. अस्थिरता पत्करली; पण आपल्या राजकीय भूमिकेशी या देशांनी प्रतारणा केली नाही. चावेझ यांचे राजकारण जेवढे सामाजिक विषमता निर्मूलनाशी निगडित होते, तेवढेच ते गरीब व उपेक्षित वर्गांशी सामाजिक बांधिलकी जपणारे होते. त्यांच्या राजकारणात तळागाळातील लोकांसाठी आवाज होता; शिवाय आंतरराष्ट्रीय प्रश्नांची दखल होती. त्यांच्या राजकारणामध्ये संदिग्धता नव्हती वा कावेबाजपणा नव्हता वा स्वार्थ नव्हता. लोकांमध्ये थेट मिसळून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर राष्ट्रीय पातळीवर मार्ग काढण्याचे राजकारण ते करत. त्यामुळे चावेझ हे व्हेनेझुएलातील पददलित-कष्टकरी, कामगार-मजूर, गरीब-मध्यमवर्गीय समाजाचे ख-या अर्थाने मसीहा होते.

क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचे व्यक्तिमाहात्म्य व लोकप्रियता लॅटिन अमेरिकेत जेवढी आहे तेवढेच आदराचे स्थान चावेझ यांना मिळत होते, हे विशेष. या लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत. 1992 मध्ये सत्तेवर आल्यानंतर चावेझ यांनी तेलसंपन्न असलेल्या आपल्या देशाला बड्या अमेरिकी तेल कंपन्यांच्या तावडीतून सोडवले व सर्व तेलखाणींचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर त्यांनी गरिबी निर्मूलनासाठी मोठ्या योजना हाती घेतल्या. ते स्वत: झोपडपट्ट्यांमध्ये फिरत असत. ग्रामीण भागाचे महिनोन्महिने दौरे करत असत. या दौ-यांमध्ये ते लोकांची विचारपूस करत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तत्काळ निर्णय घेत असत. व्हेनेझुएलामध्ये शेतीव्यवस्थेत अराजक माजले तेव्हा त्यांनी शेतीव्यवस्था आमूलाग्ररीत्या बदलेल असे जमीनधोरण लागू केले. या धोरणामुळे केवळ गरीब शेतकरी नव्हे तर मजूर आणि कष्टक-यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्या शेतीसुधारणा कार्यक्रमावर अनेक बाजूंनी टीका झाली. काही टीकाकारांनी त्यांच्यावर समाजवाद रुजवत असल्याची टीका केली. या टीकाकारांना उत्तर देताना ते म्हणत, ‘मला माहितेय की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात समाजवाद ही संकल्पना कालबाह्य समजली जाते व समाजवाद रुजवणारा मी शेवटचा नेता आहे. पण मला सामाजिक विषमतेशी भिडण्यासाठी या विचारसरणीशिवाय अन्य मार्ग सापडत नाही.’

चावेझ यांच्यावर फ्रेंच साहित्याचा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचा प्रभाव असल्याने ते समाजवादाकडे आकर्षिले गेले. त्यांच्या या समाजवादी राजकीय भूमिकेमुळे ते क्युबा, बोलिव्हिया, इक्वेडोर, अर्जेंटिना, निकाराग्वा या देशांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा अमेरिकेच्या साम्राज्यवादाला असलेला विरोध. अमेरिकेच्या वाढत्या लष्करी साम्राज्यवादाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी रशिया, लिबिया, इराण, क्युबा, युरोपमधील समाजवादी पक्ष यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. 2001 मध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानावर केलेल्या कारवाईचा त्यांनी जाहीर निषेध केला होता. त्यांनी त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर ‘मिस्टर डेंजर, डाँकी’ अशी विशेषणे वापरून व्यक्तिगत पातळीवर टीका केली होती. ते व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून अमेरिकी साम्राज्यवादाचा समाचार घेत असत. 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत जॉर्ज बुश यांनी एक भाषण केले होते. यानंतर एक दिवसाने चावेझ यांचे भाषण होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच चावेझ यांनी आपल्याला ‘सल्फरचा वास’ येत असल्याचे वक्तव्य केले होते. बुश हे सैतान आहेत, अशीही टीका त्यांनी या वेळी केली होती. अमेरिकेविरोधात अशी जाहीर भूमिका ते घेत असल्याने 2002 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलात चावेझ यांची सत्ता उलथवली होती. हे सत्तांतर नाट्य फार दिवस टिकले नाही. पण या घटनेनंतर चावेझ आणि अमेरिका यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. चावेझ यांनी पुढे तर अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला होता. त्यांनी इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन तसेच लिबियाचा हुकूमशहा कर्नल मोहंमद गडाफी, इराणचे अध्यक्ष अहमदीनेजाद, बेलारुसचे अध्यक्ष लुकाक्षेंको यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. तसेच व्हेनेझुएलाच्या सामुद्रिक प्रदेशात रशियन नौदलाने कवायती कराव्यात यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना विनंतीही केली होती. तिसरे जग आणि अमेरिका असा संघर्ष जागतिकीकरणाच्या काळात अपरिहार्य असल्याने व अमेरिकेचा आर्थिक आणि लष्करी साम्राज्यवाद रोखण्यासाठी या देशांनी एकत्र यायला हवे, अशी चावेझ यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ लॅटिन अमेरिका नव्हे तर तिस-या जगातील देशांमधील अनेक राजकीय नेत्यांसाठी मार्गदर्शक होते. नेहरू, कॅस्ट्रो यांनी अलिप्तता चळवळीला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणून ठेवले होते. पण शीतयुद्धानंतर ही चळवळ थंडावलेली असताना चावेझ यांनी त्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्या अर्थाने चावेझ यांचे एकूणच राजकारण सळसळणारे, लोकाभिमुख, समाजाप्रति आस्था दाखवणारे होते. फिडेल कॅस्ट्रो हे त्यांच्यासाठी आदर्श होते. तसेच त्यांच्याबद्दल चावेझ यांना आत्मीयता होती. जेव्हा चावेझ यांना कर्करोगाची लागण झाली तेव्हा कॅस्ट्रो यांच्याविषयीच्या आत्मीयतेतून त्यांनी उपचारांकरिता क्युबात राहणे पसंत केले. चावेझ यांच्या आजाराबाबत अनेक वावड्या गेली दोन वर्षे दक्षिण अमेरिकेच्या राजकारणात उठवल्या जात होत्या. लोकांमध्ये अफवा पसरू नयेत, म्हणून त्यांचे दूरचित्रवाणीवरून दर्शनही दाखवले जात असे.

एका अर्थी व्हेनेझुएलात राजकीय अशांतता पसरू नये म्हणून हे प्रयत्न केले जात असत. आता त्यांच्या निधनानंतर व्हेनेझुएला पुन्हा एका राजकीय पोकळीत गेला आहे व तो दुभंगणार, असे भविष्य प्रसारमाध्यमांतून सांगितले जात आहे. राजकारण हे समाजातील सर्व घटकांच्या अपेक्षांची पूर्ती करणारे सर्वसमावेशक असावे लागते. तसे असेल तर देश असे नेतृत्व स्वीकारतो. चावेझ हे जागतिकीकरणाच्या काळात समाजवादाचे एक स्फुल्लिंग होते. त्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना नक्कीच मिळेल.