आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आणि मोदी(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभर सध्या नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आकस्मिकपणे पुन्हा ललित मोदी मीडियामध्ये अवतरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आयपीएल प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर एकूण आठ प्रकारचे आरोप निश्चित करण्यात आले. 2010च्या एप्रिल महिन्यापासून ललित मोदींना बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत ते बीसीसीआयसमोर आपल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कधीही उपस्थित राहिले नाहीत. उलट बीसीसीआयच्या बडतर्फीपासून म्हणजेच 2010पासून त्यांनी परदेशातच आसरा घेतला. बीसीसीआयपेक्षाही त्यांना देशाच्या कायद्याचीच अधिक भीती वाटत असावी. म्हणूनच ते देशातून परागंदा झाले असावेत. मोदींना परागंदा करण्यात आपल्याच देशाच्या काही उच्चपदस्थ राजकारणी मंडळींनी त्यांना परदेशात जाण्यास मदत केली असावी. कारण त्यांचे हितसंबंध मोदींच्या आर्थिक भानगडीत अडकले असावेत. मोदी यांचे परदेशात राहणे कदाचित अनेकांच्या दृष्टीने सोईचे ठरले असावे. मात्र परदेशातील मोदींना देशातील राजकीय मंडळींची मदत होत होती. त्यांना आवश्यक ती सारी रसद पुरवली जात होती. मोदींच्या डावपेचांना आणि इथल्या त्यांच्या समर्थकांना एन. श्रीनिवासन आणि मंडळींनी त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर दिले.

शिस्तपालन समितीने मोदींवर आठ आरोप ठेवले आणि दोषी जाहीर केले. शिस्तपालन समितीच्या त्या अहवालानंतर बीसीसीआयने 25 सप्टेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत सार्वमताने ललित मोदींसाठी बीसीसीआयचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले. शशांक मनोहर आणि आत्ताचे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी ललित मोदी यांच्या चोरीच्या वाटा वेळीच ओळखल्या. आयपीएल नावाच्या प्रचंड पैसे देणा-या ब्रँडचा जनक म्हणून मिरवणा-या ललित मोदींनी त्याच ब्रँडचा पैसा खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ‘मीडिया राइट’ विकताना अवघ्या एका डॉलर किमतीच्या डब्ल्यूएसजी नावाच्या कंपनीवर मोदींनी विश्वास टाकला. डब्ल्यूएसजी कंपनीने ते हक्कसोनी एंटरटेनमेंटला विकले. सोनीने 9 वर्षांत 425 कोटी रुपये डब्ल्यूएसजीला देण्याचे मान्य केले. मोदींनी त्यावर केलेली कडी म्हणजे सोनीने ते पैसे न दिल्यास डब्ल्यूएसजीला पैसे देण्याची जबाबदारी बीसीसीआयवर टाकली. सारेच अनाकलनीय आणि आश्चर्यकारक होते.

वरिष्ठांचा, उच्चपदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय मोदींना हे शक्य झाले नसते. याचाच अर्थ, या साठमारीत मोदी पुढे असले तरी त्यांचे अन्य भागीदारही असावेत. मोदींनी दुसरा डल्ला मारला आयपीएलचे इंटरनेट हक्क विकताना. त्यांनी त्यासाठीही टेलिव्हिजन हक्क विकतानाचीच युक्ती वापरली. एका डमी कंपनीला हक्कविकून दुस-या कंपनीला त्यांच्याकडून ते हक्क घ्यायला लावले. तो मलिदा त्यांनी आपले जावई बर्मन यांच्या घशात घातला. ‘स्‍ट्रॅटेजिक टाइम आऊट’मध्येच चमत्कारिक घटना घडतात, असे आरोप आता व्हायला लागले आहेत. मोदींनी तर कुणाचीही परवानगी न घेता 150 सेकंदांचे हक्क डायबॅक्स या कंपनीला विकून टाकले. सहारा आणि कोची या दोन फ्रँचायझींचे प्रस्ताव जगजाहीर केले. कोची कंपनीकडून अपेक्षित गोष्टी न मिळाल्यामुळे सुनंदा आणि शशी थरूर यांच्या भागीदारीचा गौप्यस्फोट केला.

आयपीएल कमिशनर म्हणून गोपनीयता पाळणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य होते. ललित मोदी यांच्या नैतिकतेचा बुरखा अखेर बीसीसीआयनेच तिस-या आयपीएल पर्वाच्या नवी मुंबईतील अंतिम लढतीनंतर फाडला. अंतिम सामन्यानंतर दुस-याच दिवशी ललित मोदी यांना बडतर्फ करण्यात आले. त्या क्षणापासून मोदींना बीसीसीआयपेक्षा परकीय चलन कायद्याचा भंग केल्यामुळे अटक होईल, अशी भीती वाटत होती. या भीतीमुळे ललित मोदी तेव्हापासून परदेशातच राहिले. त्यांनी आपण निर्दोष आहोत, असा टाहो फोडला; परंतु तो ‘ट्विटर’च्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजन चॅनलमार्फत. बीसीसीआयच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. न्यायालयात मात्र त्यांच्या वतीने त्यांचे कायदेतज्ज्ञ उभे राहिले. या सर्व घटनांनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हटले तर बीसीसीआय ही एक खासगी कंपनी किंवा क्रीडा संस्कृती चालवणारी कंपनी. ज्या कंपनीचे भवितव्य 120 कोटींच्या भारत देशातील अवघे 31 जण ठरवतात, हेदेखील एक आश्चर्य आहे. या संघटनेची अधिकृत आर्थिक उलाढाल कित्येक हजार कोटींची असली तरी गुलदस्त्यातील अनेक व्यवहार त्यापेक्षाही मोठे असावेत, असा संशय येतो. त्यामुळेच माजी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्या वेळी सर्व पक्षांची बीसीसीआयमधील नेतेमंडळी एकत्र येऊन सरकारच्या प्रयत्नांच्या आड आली होती. त्यामुळे ललित मोदींसारख्या अशा अनेक भ्रष्टाचाराच्या घटना अचानक चव्हाट्यावर येत राहणारच.

आर्थिक घोटाळे उघडकीस आणल्यानंतर जाहीर होणारी आकडेवारी राजकारण्यांना बीसीसीआयमध्ये येण्यासाठी आकृष्ट करू शकते. त्यामुळे बीसीसीआयमधील खेळाडूंचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत चालले आहे. निवडणुका जिंकण्यात तरबेज असलेली राजकारणातील मंडळी, मैदानावरच्या अनुभवाच्या जोरावर निवडणुकीत उतरलेल्या खेळाडूंना सहज चीतपट करू शकतात. हे चित्र बदलण्याचा सरकारमधील काही मूठभर नेत्यांचा प्रयत्न फलदायी होत नाही, हीच भारतीय क्रीडाक्षेत्राची खरी शोकांतिका आहे. ललित नावाच्या एका मोदीने आपल्या कल्पक बुद्धीने आयपीएल नावाचा ब्रँड उभा केला खरा; मात्र त्या ब्रँडचा सारा लाभ हस्ते-परहस्ते पळवताना दाखवलेली कुशाग्र बुद्धी वादातीत आहे. चलाख ललित मोदी त्यांनाही कुणी गुरू भेटू शकतो, हे विसरले. आयपीएल यशाच्या धुंदीत आणि गुर्मीत वावरताना त्यांनी केलेल्या चुकाच त्यांना अपयशाच्या गर्तेत घेऊन गेल्या. त्यामुळे या मोदींची झालेली फरपट पाहता दुसरे मोदी काही बोध घेतील का?