आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची दातदुखी ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या प्राचीन संस्कृत साहित्यात खालचे दोन व वरचे दोन दात हे ‘राजदंत’ समजले जातात. म्हणजे हे दात पवित्र मानले जातात. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अहोरात्र जप करणा-या भाजप आणि संघ धुरीणांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे दात ‘राजदंत’ आहेत, याची पक्की खात्री असल्यानेच 2014 च्या लोकसभा निवडणुका होण्याआधीच ते मोदींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ घालण्यास उत्सुक आहेत. पण या मंडळींचे दुर्दैव आताच कसे आडवे आले ते पाहा. झाले असे की, सध्या मोदींना दातदुखी सतावत असून ते दंतरोग चिकित्सकाकडून घरीच उपचार घेत आहेत. मोदींची ही दातदुखी कर्नाटकातील काँग्रेसच्या दणदणीत विजयामुळे आहे की कर्नाटकाच्या जनतेने भाजपला नाकारले म्हणून आहे, हे अद्याप कळलेले नाही. पण तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक युद्धपातळीवर मोदींची दातदुखी दूर करण्यासाठी अहोरात्र झटत आहे हे नक्की.

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर गांधीनगरमधील मीडियाची मंडळी मोदींचे कर्नाटक निवडणुकांवरचे विश्लेषण ऐकण्यास उत्सुक होती. मोदी सहसा पत्रकारांना (समविचारी) टाळत नाहीत. त्यांचा एकूणच मीडियामधील जनसंपर्कही खूपच दणकेबाज आहे. म्हणूनच त्यांचा एखादा 30 सेकंदांचा बाइटही (कधी-कधी वाक्य) दिवसभर बातम्या चालवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सध्या मोदींच्या अखिल भारतीय करिष्म्याने पत्रकारांचे डोळे दिपून गेले असल्याने आणि मोदी हे स्वयंप्रकाशित नेते असल्याने त्यांच्या वलयाने दिपून जाणा-या पत्रकारांना आजूबाजूचा अंधार दिसत नाही. अशा मीडियाने ‘मोदी म्हणजे विजय’, ‘मोदी म्हणजे विकास’, ‘मोदी म्हणजे मर्यादापुरुषोत्तम’, ‘मोदी म्हणजे भाग्यविधाता’ अशी बिरुदावली त्यांना दिली आहे. गुजरातच्या विजयामुळे तर मोदीप्रेमी पत्रकारांची व भाजप-संघाच्या सहानुभूतीदारांची खात्री झाली होती की, मोदी भारतात कुठेही गेले तरी ते सहजतेने विजयश्री खेचून आणू शकतात. त्यामुळे कर्नाटकात भाजपचे ‘सुपरस्टार’ मोदी प्रचाराला जाणार की नाही येथपासून मोदींच्या केवळ तीन कर्नाटक भेटीतून तेथे कोणता चमत्कार होऊ शकतो, याच्या रसभरित बातम्या अनेक दिवस टीव्हीवर, वर्तमानपत्रांत छापून येत होत्या. तशाच त्या फेसबुक-ट्विटरवरून प्रत्येकाच्या पीसी-मोबाइल-टॅब्लेटपर्यंत वा-याच्या वेगाने पोहोचत होत्या. पण कर्नाटकात आक्रीत घडले.

भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे मीडियातील मोदीप्रेमींना जबर धक्का बसला. धक्का सहन न होऊन ते लगबगीने भाजपच्या दणदणीत पराभवाची मीमांसा ऐकण्यासाठी मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. देशाचे ‘भाग्यविधाता’ मोदी धीरोदात्तपणे भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन आपल्याच पक्षांतील विरोधकांचे दात घशात घालतील, असा या मंडळींचा अंदाज. पण तसे काहीच घडले नाही. कारण बुधवारी सकाळी कर्नाटकात मतमोजणी सुरू झाली, तेव्हाच नेमकी मोदींची दातदुखी सुरू झाली. विघ्नसंतोषी येदियुरप्पांच्या शापामुळे अगोदरच गाळात रुतलेला कर्नाटक भाजपचा रथ बाहेर येण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मोदींनी आपल्या सेक्रेटरीमार्फत निरोप पोहोचवला की ते पत्रकारांपुढे, टीव्ही कॅमे-यापुढे अचानक उद्भवलेल्या दातदुखीमुळे येऊ शकत नाहीत. एवढेच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलासुद्धा उपस्थित राहण्याचे मोदींनी टाळले. मोदी नसल्याने या बैठकीचे अध्यक्षपद राज्याच्या अर्थमंत्र्यांना (नितीन पटेल असे या सद्गृहस्थांचे नाव. मोदींना दातदुखीने सतावले नसते, तर पटेल हे गुजरातचे अर्थमंत्री आहेत, हे जगाला कळले नसते. असो.) करावे लागले.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, ही मोदींविना बैठक पार पडण्याची पहिलीच ऐतिहासिक घटना होती. एरवी मोदींची तुलना सिंहाशीही केली जाते. गुजरातचे सिंह असा त्यांचा गौरवाने उल्लेखही केला जातो. परंतु नेमक्या त्याच दिवशी गांधीनगरमध्ये मोदींच्या अध्यक्षतेखाली जंगलातील मानवी घुसखोरीबाबत एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. मोदींना दातदुखी सतावत असल्यामुळे त्यांनी या परिसंवादासही हजर राहण्याचे टाळले. सिंहाला स्वत:च्या राज्यात कुणाचे अतिक्रमण खपत नाही आणि जेव्हा त्याला दातदुखी बेजार करते, तेव्हा त्याचे जंगलातील महत्त्व आपोआप कमी होते, असे वनतज्ज्ञांचे म्हणणे आहे, आमचे नाही. कुणी काहीही म्हणो, पण मोदींची दातदुखी खूप गंभीर असणार याचा आणखी एक महत्त्वाचा पुरावा कर्नाटक निकालाच्या दिवशी सोशल मीडियातही उपलब्ध झाला. सोशल मीडियात फेसबुकपेक्षा ट्विटरवर मोदी अधिक वेळ उपलब्ध असतात. पत्रकार मोदींच्या ट्विटर अकाउंटवर ब्रेकिंग न्यूज शोधत असतात. परंतु इथेसुद्धा दातदुखी आडवी आली. कर्नाटकामधील भाजपचे पानिपत टीव्हीच्या पडद्यावर जसे स्पष्ट होत गेले तसे मोदींचे ट्विटर अकाउंट बंद झाले. त्यांनी ट्विटरवर एकही प्रतिक्रिया नोंदवली नाही. इकडे मोदींचा पत्रकारांशी असा ‘व्हर्च्युअल डिस्कनेक्ट’ झाल्यामुळे पत्रकारांचेच नव्हे तर दिल्लीत बसलेल्या भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कारण कर्नाटकामधील पराभवावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तातडीने बैठक बोलावली होती. ही बैठक सुरू होण्यापूर्वी गुजरातचा शेर दातदुखीमुळे येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने भाजपातील अडवाणी, सुषमा, जेटली, राजनाथ सिंग, वेंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, अनंतकुमार, जावडेकर आणि नक्वी यांच्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. त्यांच्या मते, मोदींची पक्ष कार्यकारिणीतील अशी अनपेक्षित गैरहजेरी म्हणजे आपणच मीडियाला फुकटचे देऊ केलेले खाद्य आहे. हे मीडियावाले मोदींचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे चित्र जनतेपुढे उभे करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. मीडियामध्ये मोदींचे आकर्षण आहे, पण ते इतर भाजप नेत्यांबद्दल नेहमीच दाती तृण धरत असल्याने, मोदींच्या बाबतीतील गॉसिप थांबवायचे असेल तर सर्वांनीच पुढील काही दिवस मीडियापासून दूर राहायला हवे, असा सर्वानुमते निर्णय झाला. त्या निर्णयाला अनुसरून सर्व नेत्यांनी टीव्ही मीडियाबरोबरच सोशल मीडियातही तोंड उघडले नाही. मोदींना आपण तसेही सहन करतोच; आता त्यांची दातदुखी सहन केलीच पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले आणि कर्नाटकचा पराभव संघशिस्तीला अनुसरून सर्वांनी मिळून गिळून टाकला. नमो नम:! नमो नम:!!