आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिवसः \'My मराठी’ कडे वाहत चाललेले तारू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘टू बीएचकेचा थर्ड फ्लोरचा फ्लॅट बुक केलाय, बाल्कनीतून इतका क्लासिक व्ह्यू दिसतो.’
‘सगळं मिक्स करून त्याचे बॉल्स ब्रेडक्रम्समध्ये रोल करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचं.’

‘स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, प्रिन्सेस ब्यूटिपार्लरचा बोर्ड दिसेल, जस्ट साइडची बिल्डींग.’
‘माय गॉड, मंथ एंडला एग्झाम आहे, मग सिलॅबस केव्हा कम्प्लीट करणार?’
 
मराठीचा वापर आपण फक्त क्रियापदांपुरता करत असू तर हे प्रकरण गंभीर आहे. अशा भाषेचा आपल्याला अभिमान वाटेल तरी कसा! मराठी भाषा दिन ‘साजरा’ करायचाय तो आपल्याला आपल्या भाषिक भरकटलेपणाचे भान यावे म्हणून. जागतिकीकरणाच्या झंझावातात आपले ‘My मराठी’ कडे नकळत वाहत चाललेले तारू पुन्हा ‘माय-मराठी’च्या किनाऱ्याला लागावे म्हणून...
 
१० कोटी लोक वापरत असलेल्या मराठीच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण? असे विचारले तर पालक, साहित्यिक, राजकारणी सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. खरं तर जबाबदार आहोत आपण सगळेच. भाषेचा प्रसार हा राजसत्तेकडून कसा व्हायला हवा याचा बोध, केवळ उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी मराठीप्रेमाचा पुळका दाखवणारे राजकारणी घेतील का? पालकांची स्थिती तर त्रिशंकू झाली आहे. मुलांवर इंग्लिश बरोबरच उत्तम मराठीचे संस्कार घरातून व्हायला हवेत आणि त्यासाठी मुळात आपली भाषा, आपलं वाचन सकस असायला हवं याची जाणीव पालकांना आहे का?
 
हे सगळं ठीक आहे पण या समस्येचे मूळ इंग्लीश माध्यमात आहे ना मग सरळ मातृभाषेतूनच शिक्षण घ्या ना, अशी आग्रही भूमिका स्वत:ची नातवंडे इंग्लीश माध्यमात घातलेले अनेक जण मांडतात. मुद्दा ठसवण्य़ासाठी मातृभाषेतून शिकून यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली जातात. जात्याच हुशार मुलांचे यश शिक्षणाच्या माध्यमावर अवलंबून नसते पण सर्वसामान्य मुलांना मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्लीशमधे उच्चशिक्षण घेणे अतिशय जड जाते. शिवाय काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे सेमी-इंग्लीशचा सुवर्णमध्य अधिक संयुक्तिक आहे ही वस्तुस्थिती आहे. ‘इंग्लीशच्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ हे हल्लीचे सर्वाधिक लोकप्रिय घोषवाक्य आहे. विशेषत: राजकीय भाषणात वापरण्याचे. मातृभाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करणाऱ्या युरोपातील काही राष्ट्रांची उदाहरणं यासंदर्भात दिली जातात. मुळात ती राष्ट्रे लोकसंख्येचा विचार करता जेमतेम आपल्या मुंबई इतकी असतात. भारतात अठरापगड भाषा आहेत. 

समजा उद्या उच्चशिक्षण मराठीतून उपलब्ध झाले आणि ती तांत्रिक अर्थाने ज्ञानभाषा झाली असे आपण गृहीत धरले तरीही मराठी माध्यमातून डॉक्टर झालेली व्यक्ती परराज्यात कसे काम करू शकेल? परराज्यात शिक्षक म्हणून कसे शिकवू शकेल? पर्यटन करून आल्यावर विशेषत: दक्षिण भारतातून किंवा परदेशातून आलेल्यांना जाणवतं की, भाषेचा दुराभिमान गैरसोयीचा देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे अनेक भाषा अवगत असलेल्या लोकांना विशेष संधी आणि प्राधान्य दिलं जाते. भाषा टिकून राहण्य़ासाठी तिचं जतन आणि संवर्धन होणं आवश्यक असतं. आज आपल्या देशात सुमारे ९५ कोटी मोबाईलधारक आहेत. बहुतांश मोबाईल फोन चीन, कोरिया किंवा तैवान बनावटीचे असतात. त्यामुळे त्यात मराठी वा अन्य भारतीय भाषा वापराची सुविधा उपलब्ध नसते. आपण ही सुविधा असलेला फोन घ्यायला आणि शक्य असेल तेव्हा ब्लॉग तसेच सोशल माध्यमांवर मराठीचा वापर आवर्जून करायला काय हरकत आहे? 

इंग्रजीच्या अपरिहार्यतेमुळे किंवा समाजाने केलेल्या तिच्या व्यापक स्वीकारामुळे आधुनिक व्यवहार मराठी किंवा एकूणच भारतीय भाषांमधे होणे शक्य नसेल तर त्यांच्या संवर्धनाचा आव आणण्यापेक्षा त्यांचे जतन करण्यावर अधिक भर द्यायला हवा. हे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, परंतु स्पर्धेच्या भीतीने त्यांचा रस अर्थकारणात अधिक आहे, साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन (म्हणजे आजच्या मराठीत ’कॉमेंट्री’ बरं का!) आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचं. त्यामुळे चौकार, षटकार, शतक, धावचीत, झेल, बळी, सामनावीर असे किती तरी सोपे मराठी प्रतिशब्द सहजपणे रुळले. आता मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नावे ’ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले’ अशी असतात. विमानतळावरील सरकारी कचेरीबाहेर ‘भारतीय विमानपत्तन प्राधिकरण’ अशी पाटी वाचल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल का! संस्कृतप्रचुर मराठीपेक्षा ती जितकी साधी, सुगम होत जाईल तितकीच व्यापकतेने स्वीकारली जाईल. मराठी माध्यमांनी आज ही जबाबदारी नाकारली तर त्यात त्यांचेही नुकसान आहे.
 
त्या त्या वेळचे प्रचलित शब्द सामावून घेतच भाषा प्रवाही होते त्यामुळे ज्या परभाषेतील शब्दांना सोपे प्रतिशब्द नाहीत ते तसेच ठेवून मराठीत त्यांचे विलीनीकरण व्हावे. जी मराठी भाषा आपल्याला ओळख देते, तिचा आदर करायलाच हवा. मराठी मातीचा सुगंध, मराठी लोकजीवनाचा, भावबंधांचा, उत्तम साहित्याचा आनंद आपण अनुभवू शकतो तो या भाषेमुळेच. मराठीचं अस्तित्व हेच आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेसोबत मराठी संस्कृतीची नाळ जुळलेली आहे. ती जगणं सुंदर करण्यासाठी आहे, हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं. त्यासाठी मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान नको, मराठीवर नितांत प्रेम असायला हवं. आईवर प्रेम करणं शिकवावं लागत नाही, तितक्याच सहजपणे.

mohinimodak@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...