आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
रणजी चॅम्पियन मुंबईने विजेतेपदाचा चाळिसावा तुरा सोमवारी आपल्या शिरपेचात खोवला. या विजेतेपदाने मुंबईचे राष्ट्रीय क्रिकेटवरील वर्चस्व सिद्ध केले का, हा प्रश्न आहे. भारतीय संघात एखाद-दुसरा अपवादात्मक खेळाडू असणा-या मुंबईच्या विद्यमान संघाचे हे यश निर्विवाद मानायचे का? अंतिम फेरीपूर्वीच्या दहाही लढतींमध्ये एकमेव निर्णायक विजय मिळवणा-या मुंबईची गोलंदाजी भेदक आहे का? निवृत्तीकडे झुकलेल्या जाफरच्याच फलंदाजीवर आजही अवलंबून असलेल्या मुंबईकडे परिपक्व फलंदाज आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
मुळातच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा म्हणून रणजीला भारतीय क्रिकेट बोर्ड किती महत्त्व देते हा प्रश्न आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय मालिका, स्पर्धा आणि दौरे यांचे सातत्याने आयोजन करायचे, दुसरीकडे त्याच वेळी राष्ट्रीय स्पर्धा म्हणवल्या जाणा-या रणजी व अन्य स्पर्धांचे आयोजन करायचे, असे दुटप्पी धोरण बीसीसीआयचे आहे. त्यामुळे रणजी अंतिम स्पर्धेचा सामना म्हणजे एक फार्स ठरला. राजकोटच्या पाटा विकेटवर खेळण्यात आयुष्य गेलेल्या सौराष्ट्राच्या क्रिकेटपटूंना वानखेडेच्या खेळपट्टीवरील वेग आणि स्विंग यांचा सामनाच करता आला नाही. त्यातच त्यांच्या फलंदाजीचा भक्कम आधार असलेला फलंदाज चेतेश्वर पुजारा याला न खेळवताच भारतीय संघासोबत ठेवले गेले. अष्टपैलू रवींद्र जाडेजा याची कमतरता तर सौराष्ट्राला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे दोन्ही डावांत सौराष्ट्राला अडीचशे धावसंख्यादेखील उभारता आली नाही. त्याच खेळपट्टीवर सौराष्ट्राला मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडता आले नाही. जाफरने एका बाजूने नांगर टाकला आणि सौराष्ट्राच्या आक्रमणाची धारच बोथट झाली. कौस्तुभ पवार, आदित्य तरे, हिकेन शहा या नवोदितांचा हातभार लागला आणि रणजी क्रिकेटच्या इतिहासातील एकतर्फी अंतिम लढत पाहायला मिळाली.भारतीय क्रिकेटचे हेच खरे चित्र आहे. पुजारा, जाडेजा या खेळाडूंच्या अनुपस्थितीत एखाद्या क्लबच्या दर्जाचा सौराष्ट्र संघ वाटला. हा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाच कसा, याचे सर्वांना आश्चर्य वाटले.
तीच गोष्ट मुंबईचीही. मुंबईनेही या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखून जिंकलेला एकमेव सामना म्हणजे अंतिम सामना. पहिल्या डावातील आघाडीवर आणि इंदूरमध्ये मध्य प्रदेशवर मिळवलेल्या 7 धावांच्या निर्णायक विजयाच्या बळावर मुंबई संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय गोलंदाजीच्या शैलीचा जहीर खानचा त्या सामन्यातील स्पेलच मुंबईला अंतिम फेरीत घेऊन गेला. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो, की अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करणारा धवल कुलकर्णी त्याआधीच्या सामन्यात का चमकला नव्हता? धवलची गोलंदाजी अंतिम सामन्यात प्रभावी ठरली. याचे नेमके कारण कोणते? खेळपट्टी की दुबळे प्रतिस्पर्धी? कदाचित या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढच्या आठवड्यातच मिळू शकेल.
वानखेडे स्टेडियमच्या याच मैदानावर रणजी विजेते मुंबई आणि शेष भारत संघादरम्यान इराणी करंडकासाठीचा सामना होणार आहे. या सामन्यात शेष भारत संघात दर्जेदार फलंदाज आहेत. त्यांच्याविरुद्ध धवल कुलकर्णी आणि कंपनीची गोलंदाजी कशी पडते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजित आगरकर सलग किती सामने खेळण्याइतपत फिट आहे? आगरकरच्या नेतृत्वगुणाची प्रशंसा करावी लागेल. सेवादलाविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्यात त्याने काढलेले शतक कौतुकास्पद होते. मात्र गोलंदाज म्हणून त्याच्या फिटनेसबाबत कायम प्रश्नचिन्ह राहील. मुंबईच्या गोलंदाजांपैकी क्षेमल वायंगणकर, जावेद खान, ठाकूर या नवोदितांपैकी जावेद खान व ठाकूर यांनी लक्षवेधी कामगिरी केली. वायंगणकरच्या गोलंदाजीच्या मर्यादांपेक्षाही क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा मुंबईला चांगलाच भोवला होता. बंगालविरुद्ध सोपा झेल सोडणा-या वायंगणकरने मुंबईच्या बाद फेरीतील प्रवेशाचे दरवाजे जवळजवळ बंद केले होते. मध्य प्रदेशविरुद्ध लढतीत निर्णायक क्षणी झेल सोडणा-या इक्बाल अब्दुल्लानेही मुंबईच्या झुंजार प्रयत्नांवर पाणी फेरले होते. सुदैवाने मुंबईने मध्य प्रदेशविरुद्ध सामना जिंकला. जहीर खानचा 13 सलग षटकांचा भन्नाट स्पेल कामी आला. एरवी अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात मुंबईचा ‘टिपिकल’ खडूस दृष्टिकोन कधीच दिसला नाही.
सचिन तेंडुलकरची उपस्थिती नवोदितांसाठी एक शिक्षण होते. सरावासाठी दोन तास आधी येण्याची त्याची सवय. सरावात मेहनत घेण्याची व सरावाला अधिक महत्त्व देण्याचा दृष्टिकोन नवोदित खेळाडूंना खूप काही शिकवून गेला. सचिनने रेल्वे आणि बडोद्याविरुद्ध सामन्यात शतके ठोकली. मास्टर ब्लास्टरच्या बॅटीत त्याने वयाच्या 16व्या वर्षी केलेल्या फलंदाजीचा रुबाब मात्र नव्हता. ऑ स्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेची पूर्वतयारी म्हणून सचिन मुंबईतर्फे कदाचित खेळत असेल. वाढत्या वयातील काही मर्यादा त्याच्या खेळात आता स्पष्ट दिसायला लागल्या आहेत. मात्र मुंबईसाठी विजेतेपद मिळवून देण्याच्या मोहिमेला सचिनचा हातभार लागला, हे काही कमी नाही. रणजी विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंची संख्या वाढली पाहिजे, असा आग्रह होणे स्वाभाविक आहे. मात्र मुंबईनेच अंतर्मुख होऊन राष्ट्रीय संघाच्या दर्जाचे किती खेळाडू सध्या आपल्या संघात आहेत, याचा विचार करणे गरजेचे आहे.
धवल कुलकर्णीचा फिटनेस आणि फॉर्म अनिश्चित असतो. मुंबईच्या अन्य नवोदित मध्यमगती गोलंदाजांसाठी राष्ट्रीय संघ सध्या फारच दूरची गोष्ट आहे. मुंबईच्या फिरकी गोलंदाजांपैकी डावखु-या अंकित चव्हाण व विशाल दाभोळकर यांनी प्रभावी गोलंदाजी केली. अंकित चव्हाणने 23 धावांत पंजाबचे 9 खेळाडू बाद करून खळबळ उडवली होती. परंतु दाभोळकर हाच ‘लंबी रेस’चा घोडा वाटतो. विशाल दाभोळकर याला फिरकी गोलंदाजीची उत्तम जाण व समज आहे. त्याला कप्तानाचा आदेश कळतो. त्यानुसार किंवा क्षेत्रव्यूहानुसार गोलंदाजी करण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. तो चेंडूला उंची देतो. क्षेत्ररक्षणही उत्तम आहे. त्याच्यावर मुंबईने मेहनत घेतली तर राष्ट्रीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी भविष्यकाळात उघडू शकतात.
मात्र 40व्या विजेतेपदाच्या आनंदात मग्शुल होण्यापेक्षा मुंबईने आपल्या विजय मर्चंट ट्रॉफी जिंकणा-या संघावार अधिक मेहनत घ्यावी. त्यांच्यातील खेळाडू भारतीय संघात भविष्यकाळात कसे जातील यावर अधिक विचार करावा. 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंना तयार करण्याच्या दृष्टीने योजना आखाव्यात. रणजी विजेत्या संघातील खेळाडूंची राष्ट्रीय संघात वर्णी लावण्यापेक्षा उदयोन्मुख खेळाडूंना तयार करावे. येत्या 4-5 वर्षांत मुंबईचे जे खेळाडू तयार होतील तेच खरे चॅम्पियन असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.