आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहोल मान्सूनचा (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत बेभरवशाचा समजला जाणारा मान्सून यंदा महाराष्ट्रात वेळेवर आला आणि स्थिरावला म्हणून एकीकडे समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे त्याने मुंबई, कोकणपट्टी आणि विदर्भात अगदी दाणादाण उडवून दिली आहे. गेल्या हंगामात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने पाठ फिरवली होती. इतरत्रसुद्धा तो म्हणावा तसा बरसला नव्हता. त्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. मराठवाडा आणि खान्देशच्या ग्रामीण भागात दुष्काळाचा दाह एवढा होता की हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत होती. पंधरवड्यातून एकदा पाणीपुरवठा हे चित्र येथे सार्वत्रिक झाले असताना मनमाडसारख्या ठिकाणी तर घरातल्या नळाला पाणी येण्यासाठी तब्बल एकतीस दिवसांची प्रतीक्षा लोकांना करावी लागली. बहुतेक धरणे आणि परिसरातील पाणवठे आटल्याने टँकरसुद्धा कोठून भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. दुष्काळाचा फटका शेती व्यवसायाला तर बसलाच, पण शेवटचे दोन महिने अनेक उद्योगांच्या उत्पादन क्षमतेवरही त्याचा विपरीत परिणाम दिसून आला. साहजिकच यंदा सगळ्यांचे डोळे मेअखेरीपासून आभाळाकडे लागले होते. हवामान खात्याने पाऊस सरासरी गाठेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अंदाजाला अनेकांनी नेहमीप्रमाणे चेष्टेचा विषय बनवले. त्यामध्ये स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवून घेणारी मंडळी पुढे होती. झाडे तोडता..इमारती उभारता.. रस्ते बांधता.. मग आता भोगा आपल्या कर्माची फळे.. दिवसेंदिवस पाऊस असाच घटत जाणार.. असा नेहमीचा आपला आवडता धोशा पर्यावरणवाद्यांनी सुरू केला. मीडियानेसुद्धा हा विषय बहुतांशाने असाच थिल्लरपणे घेतला. त्यामुळे अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्यांमध्ये अधिकच नैराश्याची भावना पसरण्यास हातभार लागला. पण आता झालेल्या पावसाने त्याला आशेची नवी पालवी फुटली असून तथाकथित पर्यावरणवाद्यांचे दावे त्यामध्ये वाहून गेले आहेत. पावसाबाबतचा अशास्त्रीय दृष्टिकोन हीच खर्‍या अर्थाने आपल्याकडे मोठी अडचण आहे. इकडचा पाऊसच मुळात इतर ठिकाणांहून वेगळा आहे. त्यामुळे इतरत्र हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असले तरी आपल्याकडे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू म्हणून गणला जातो. पृथ्वीच्या आसपासच्या वातावरणाची जी शृंखला किंवा सायकल आहे, त्यावर हा सारा खेळ अवलंबून असतो. मुख्यत: नैर्ऋत्य मोसमी वारे आपल्याकडे हा पाऊस घेऊन येतात. त्याला मान्सून म्हटले जाते आणि अनिश्चितता हा जणू त्याचा स्थायीभाव आहे. कारण दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागरातील एल नीनो या उष्ण तसेच शीतप्रवाहांचा तेथील वातावरणावर होणारा प्रभाव, त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे कमी वा जास्त दाबाचे पट्टे, वात पोकळ्या येथपासून पृथ्वीभोवतालच्या वातावरणातल्या अनेक घटकांचा व चढ-उतारांचा परिणाम ही सायकल पूर्ण होईपर्यंत मान्सूनवर होत असतो. जगभरातील अशा वातावरणीय बदलांचा प्रभाव आणि परिणाम यांचा वेध घेऊन मान्सूनबाबत अगदी छातीठोक अथवा ठोस दावा करणे आजवर त्यामुळेच कुणाला शक्य झालेले नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी जगभरातील अभ्यासकांच्या प्रयत्नातून मान्सूनचे ‘मॉडेल’ आकारास आले आहे. तरीही त्यावर आपल्याकडच्या म्हणजे एकुणातच दक्षिण आशियातल्या पावसाचे केवळ अंदाज बांधले जाऊ शकतात. कुठल्याही कारणाने एक वा अनेक वातावरणीय घटक कमी-अधिक प्रमाणात प्रभावित होत असल्याने वा एकमेकांनाही प्रभावित करत असल्याने त्यांच्यात कधीही बदल संभवतात. परिणामी मान्सूनचे रंगही त्यानुसार बदलत जातात. म्हणूनच कधी तो डोळ्यात प्राण येईपर्यंत वाट पाहायला लावतो, तर कधी एखाद्या ठिकाणी नको तेवढा बरसून तेथे हाहाकार उडवून देतो. त्यानुसार महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर यंदा त्याने पहिल्याच फटक्यात विदर्भ आणि कोकणपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. तसेच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीचीही दैना उडवली आहे. विदर्भात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून दोन दिवसांपासून मुंबईचे संपूर्ण जनजीवन कोलमडून पडले आहे. चटपटीत बातम्यांना चटावलेल्या मीडियाने लागलीच नेहमीप्रमाणे त्याचे वृत्तांकन करताना शासन, प्रशासन आणि निसर्गाला ओरबाडण्याच्या मानवी वृत्तीला झोडपायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांनीसुद्धा जसे अगोदर दुष्काळाचे राजकारण सुरू केले होते, तसे आता पावसाने केलेल्या या नुकसानीचेही राजकारण सुरू केले आहे. सुस्ती आणि मस्तीची लागण झालेल्या आपल्या राज्य सरकारची त्याबाबतची भूमिकासुद्धा केवळ ‘जे जे होईल ते ते पाहावे’ अशी असल्याने एकंदरीतच सध्या सगळ्या पातळ्यांवरून मान्सूनच्या चर्चेचे वारे जोरदारपणे वाहत आहेत. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना योग्य ती दिशा नसल्याने आणि अभ्यासू वृत्तीचा अभाव असल्याने या चर्चा नेहमीप्रमाणे भलतीकडेच भरकटत आहेत. वास्तविक पाहता राज्याच्या इतर भागात एरवीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस आहे. बहुतांश धरणेदेखील निम्म्याहून अधिक भरली आहेत. त्यामुळे शिल्लक असलेल्या अर्ध्याअधिक पावसाळ्याचा नूर पाहून त्यानुसार विविध ठिकाणच्या धरणांतून पाणी कधी, कसे व किती सोडायचे याच्या नियोजनावर भर द्यायला हवा. त्याचप्रमाणे उपलब्ध पाण्याचे काटेकोर आणि न्याय्य वितरण करण्यावर कटाक्ष ठेवला जायला हवा. त्यानुसार विधिमंडळाच्या सभागृहापासून संबंधित सर्वच पातळ्यांवर आणि माध्यमांमध्येसुद्धा साधकबाधक चर्चा व्हायला हवी. ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने मदतीसाठी धाव घेणे क्रमप्राप्त आहेच; पण ते करताना योग्य नियोजनाचे भान राखणेही अनिवार्य आहे. अन्यथा सार्‍या उपाययोजना पावसात वाहून जातील अन् ‘मान्सून वेडिंग’च्या बँडबाजावर ‘मान्सून पॉलिटिक्स’चा ताल धरत पुन्हा झाले गेले गंगेला मिळेल आणि ‘द ग्रेट मान्सून सर्कस’ भविष्यातही अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावरच हेलकावे खात राहील.