आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother Tongue Has Taken Back Seat Due To English

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्रजीच्या भूलभुलय्यात मातृभाषेचा विसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ नाटक इंग्रजीत सादर करण्यात आले. खरे तर ‘श्यामची आई’ या मराठी नाटकाचे गेल्या पाच वर्षांत 500 पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. मराठी साहित्यात ‘श्यामची आई’ पुस्तकाने क्लासिकचा दर्जा प्राप्त केलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे भाषांतर होणे वा नाटकाचे प्रयोग करणे ही फार मोठी बातमी नाही. जर यापैकी काहीच झाले नसते तर ती सगळ्यात मोठी बातमी ठरली असती, परंतु तरीही इंग्रजी ‘श्यामची आई’ ही एक बातमी झाली. ही गोष्ट एकाच नव्हे तर अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
‘श्यामची आई’चे इंग्रजीत रूपांतर करणा-या राहुल मनोहरचे म्हणणे होते की, हे पुस्तक केवळ भाषेमुळे वैश्विक स्तरावर जाण्यापासून वंचित राहू नये. तसेच आजची मराठी पिढी मराठी पुस्तके वाचत नसल्याने आणि नाटकेही पाहत नसल्याने, त्यांना ही कलाकृती समजावी म्हणून याचे इंग्रजीत भाषांतर करावे लागले. आपल्या भारतीय भाषांमधील श्रेष्ठ साहित्य जगातील अन्य भाषांमध्ये भाषांतरित होणे ही साहित्य आणि समाज या दोघांसाठीही चांगली गोष्ट आहे. परंतु मराठी मुले मराठी पुस्तके वाचत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे आणि मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कलाकृती असलेल्या पुस्तकाचे मराठी मुलांसाठीच इंग्रजीत भाषांतर करणे यापेक्षा जास्त चिंताजनक दुसरी बाब नाही. इंग्रजी भाषेची मदत घेण्याची स्थिती का उत्पन्न झाली यावर विचार झाला पाहिजे. मराठीसारखीच स्थिती देशातील सगळ्या भाषांमधील साहित्याचीही झाली आहे, हे कटू सत्य आहे.
एक भाषा म्हणून इंग्रजीला विरोध करणे योग्य नाही. इंग्रजीत विपुल साहित्यसंपदा असून त्यासाठी ही भाषा येणे योग्यच आहे. परंतु मराठी भाषक मुलांसाठी ‘श्यामच्या आई’चे महत्त्व समजावून सांगण्यासाठी इंग्रजी भाषेची मदत घ्यावी लागणे ही साधी गोष्ट नाही आणि ती पचनीही पडत नाही. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी मनपा शाळांची आणि त्यात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, ही गोष्टही पचनी पडणे अवघड आहे. खरे तर या शाळा शिवसेनेचे सरकार असलेल्या मनपाच्या ताब्यात आहेत आणि शिवसेना स्वत:ला मराठी माणसाचा कैवारी समजते. असे असताना असे का झाले, असा प्रश्न पडतो. गेल्या 20 वर्षांत मनपाच्या मराठी माध्यमाच्या 37 शाळा पुरेसे विद्यार्थी नसल्याने बंद पडल्या. 2008-2009 या एका वर्षात मनपाच्या मराठी माध्यमाच्या 15 शाळा बंद पडल्या. आकडेवारी हेही सांगते की 2004-05 मध्ये मुंबई मनपाच्या मराठी माध्यमाच्या 450 शाळा होत्या आणि त्यात 179539 विद्यार्थी शिकत होते. 2009-1010 मध्ये शाळांची संख्या कमी होऊन 413 वर आली आणि विद्यार्थी संख्याही 107413 पर्यंत खाली उतरली. मराठी माध्यमाच्या शाळांबरोबरच तामिळ, तेलुगू, उर्दू, गुजराती माध्यमाच्या शाळांमधून शिकणा-या विद्यार्थ्यांचीही संख्या प्रचंड प्रमाणात कमी होऊ लागली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊ लागलेले आहेत आणि जाऊ पाहत आहेत. दुसरीकडे हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थी संख्या थोडीशी वाढलेली दिसत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या मानसिकतेबाबत चर्चा करणे आवश्यक झाले आहे.
इंग्रजी भाषेचे ज्ञान प्राप्त करणे आणि इंग्रजी माध्यमात शिकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजी ही केवळ एक भाषाच राहिली नसून ती सभ्यतेचे प्रतीक होऊ पाहत आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा दिसत असत. परंतु आता गुजरात, बिहार राज्यांमध्ये, अगदी ग्रामीण भागातही, पहिलीपासून इंग्रजी शिकवले जाऊ लागले आहे. याची खरोखरच आवश्यकता आहे का? या गोष्टीचा विपरीत परिणाम तर आपल्या विचारांवर आणि जीवनशैलीवर होणार नाही ना? या प्रश्नांची उत्तरे आज शोधण्याचा प्रयत्न केला जाणे आवश्यक आहे.
साने गुरुजींच्या या क्लासिक पुस्तकाचा परदेशात इंग्रजीत अनुवाद झाला असता तर आपण समजू शकलो असतो की, त्यांना या कथेचे महत्त्व समजले आहे. देशातीलच अन्य भाषांमध्येही या पुस्तकाचा अनुवाद झाला असता तर आपण हेही समजू शकलो असतो की, मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे पुस्तक देशाच्या अन्य भागातही पोहोचत आहे. परंतु मराठी भाषक मुलांना ‘श्यामची आई’ची कथा समजून सांगण्यासाठी इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागत असेल तर ही बाब नीती तयार करणा-यांसाठी, राजकारणी आणि समाजाचे नेतृत्व करणा-यांसाठी चिंतेचा विषय ठरली पाहिजे. कल्पना करा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या रचना समजून घेण्यासाठी बंगाली माणसांना इंग्रजीची मदत घ्यावी लागत आहे, वा संतकवी थिरुवेलुवर यांच्या रचना तामिळ मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेची मदत घ्यावी लागत आहे, वा नरसी भगतच्या रचना समजून घेण्यासाठी गुजराती लोकांना इंग्रजीची मदत घ्यावी लागत आहे, वा पंजाबमध्ये गुरूनानक यांनी दिलेली शिकवण जर इंग्रजीत समजून घ्यावी लागत असेल, तर कशी असेल ही स्थिती आणि तुम्ही याला काय म्हणाल?
इंग्रजी शिकण्याला कोणाचाही विरोध असणार नाही आणि विरोध असण्याचे कारणही नाही. इंग्रजीच्या भूलभुलय्यात आम्ही आपल्या भाषा विसरू लागलो आहोत, हे खरे चिंतेचे कारण आहे. हे एक प्रकारचे सांस्कृतिक संकटच आहे आणि अजूनही आपण त्याकडे लक्ष दिलेले नाही.
मराठी मुलांना ‘श्यामची आई’ कथेचा अर्थ आणि महत्त्व इंग्रजीत रूपांतर करून समजवावे लागत असेल तर ती मुले आपल्या संस्कृतीपासून दूर तर चालली नाहीत ना, या एका गोष्टीची मला भीती वाटत आहे. या मुलांना पुन्हा आपल्या संस्कृतीशी घट्टपणे जोडण्याची गरज आहे. भारतीय भाषांवर ओढवत असलेले संकट ओळखावे आणि समजून घ्यावे. हे संकट फक्त आपल्या भाषेवरच आहे असे नाही, तर आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपल्या सभ्यतेवरीलही संकट आहे. या प्रक्रियेत आपण केवळ आपल्या भाषेलाच नव्हे तर स्वत:लाही नाकारत आहोत ही गोष्ट वैश्विकीकरण आणि वैश्विक स्थितीचा हवाला देऊन इंग्रजीची वकिली करणा-यांना कधी समजणार कोणास ठाऊक! या आत्मघाती प्रवृत्तीपासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण आपल्या मुलांना आपल्या भाषेपासून तोडून त्यांच्यावर अन्याय करत आहोत आणि या अन्यायाचा विरोध व्हायलाच पाहिजे.
(अनुवाद - चंद्रकांत शिंदे / लेखक हिंदीतील वरिष्ठ पत्रकार आहेत.)