आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माऊसचा ‘एंजल’बर्ट हरवला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबर 1968. सॅन फ्रान्सिस्कोत फॉल जॉइंट कॉम्प्युटर कॉन्फरन्स आयोजित केली गेलेली. 1950 नंतर पहिल्यांदाच जगभरातील आघाडीचे कॉम्प्युटर सायंटिस्ट्स कॉम्प्युटिंगवरील या कॉन्फरन्सला जमले होते. माऊस, कीबोर्ड, इतर कंट्रोलिंग डिव्हायसेससोबत तो बावीस फुटांच्या हाय व्हिडिओ स्क्रीनसमोर बसला होता. दोन चाकं असलेल्या माऊसद्वारे नेटवर्क आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह कॉम्प्युटिंग सिस्टिमचा आधार घेऊन संशोधन केलेली माहिती सर्व शास्त्रज्ञांमध्ये वेगाने शेअर करता येते, हे तो दाखवत होता.


चार वर्षांपूर्वी त्याने ज्या माऊसचा शोध लावला होता, त्याआधारे कॉम्प्युटर कसा कंट्रोल करावा हे तो उपस्थितांना कौशल्याने दाखवत होता आणि उपस्थितांचे डोळे विस्फारत होते. टेक्स्ट एडिटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, हायपरटेक्स्ट नॅव्हिगेशन आणि विंडोइंग कसं करावं याचं प्रात्यक्षिक तो शास्त्रज्ञांना दाखवत होता. या प्रेझेंटेशनद्वारे जगातला पहिला कॉम्प्युटर डेमो त्याने उपस्थितांना दाखवला. ‘द मदर ऑफ ऑल डेमोज’ या डेमोला आज सिलिकॉन व्हॅली आणि एकूणच जगात ओळखले जाते.


डग्लस कार्ल एंजलबर्ट. जन्म 30 जानेवारी 1925, मृत्यू 2 जुलै 2013. उंदीर हरवल्यावर गणपतीची जशी अवस्था होईल, तशीच काहीशी अवस्था आजच्या डग्लस एंजलबर्टच्या निधनाने कॉम्प्युटिंग जगाची झालीय. अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉनस्थित एका रेडिओ विक्रेत्याचा मुलगा असलेला एंजलबर्ट नऊ वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर अमेरिकन नेव्हीमध्ये रडार टेक्निशियन म्हणून एंजलबर्टला नोकरी लागली. नोकरीदरम्यान दुस-या महायुद्धाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. युद्धानंतर विंड टनल इंजिनिअर म्हणून नासाचा भाग असलेल्या अ‍ॅमिस रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी नोकरी केली. याच वेळी त्यांनी टीव्हीप्रमाणे कॅथोड रे ट्यूबच्या आधारावर कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे एकमेकांशी संवाद साधून एकत्रितपणे समस्या सोडवण्याचे तंत्र शोधून काढले. या तंत्रालाच अर्पानेट असे म्हटले जाते. आजच्या इंटरनेटचे अर्पानेट हे प्रथम रूप होते. याआधी याच कामासाठी एका रूमएवढ्या मोठ्या बिनास्क्रीनच्या कॉम्प्युटरला इनपुट देऊन हव्या त्या आऊटपुटसाठी तासन्तास वाट पाहावी लागत असे.


एंजलबर्टला माऊसची संकल्पना 1961 मध्ये सुचली. प्रथम अवस्थेत असलेल्या या माऊसला दोन चाके होती ज्यामुळे माऊस फक्त उभ्या आणि आडव्या दिशेने हलवता येत असे. या माऊसची प्रतिकृती त्यांचे लीड इंजिनिअर बिल इंग्लिश यांच्या साहाय्याने त्यांनी बनवली होती. 1968च्या डेमोन्स्ट्रेशनमध्ये त्यांनी कॉम्प्युटर डिस्प्लेवर टेक्स्ट एडिट करणे, एकाच वेळी अनेक कॉम्प्युटर विंडोजचा वापर करणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या संकल्पनांची जगाला ओळख करून दिली. यालाच एंजलबर्ट स्वत: सुट ऑफ इनोव्हेशन्स म्हणजे ‘ऑनलाइन सिस्टिम’ किंवा एनएलएस असे संबोधत असत.
नुसतेच माऊसचे शोधकर्ते म्हणून एंजलबर्ट यांना संबोधणे चुकीचे ठरेल. कलेक्टिव्ह आयक्यूच्या क्षेत्रातील त्यांची भूमिका आणि योगदान अतिशय महत्त्वाचे असे आहे. मानवी कल्पनाशक्तीची चुणूक दाखवणा-यांपैकी आवर्जून नाव घ्यावे, अशांपैकी एंजलबर्ट एक आहेत.


एंजलबर्ट यांनी तयार केलेल्या माऊसचे हक्क त्यांना काहीशा उशिराने 1970 मध्ये मिळाले. या वेळी त्यांनी माऊसची निर्मिती करायला सुरुवात केली. मात्र, त्याला खरी लोकप्रियता 80 च्या नंतर मिळण्यास सुरुवात झाली. 1987 मध्ये माऊस हे लोकोपयोगी वापरासाठी (पब्लिक डोमेन) उपलब्ध झाले. स्वामित्व हक्क मिळवल्यानंतर 17 वर्षांच्या कालावधीत त्याचा फारसा वापर झाला नाही. 1987 नंतर मात्र माऊसला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 80 च्या उत्तरार्धात जगभरात सुमारे शंभर कोटी माऊसची विक्री झाली होती. दोन चाकांच्या माऊसपासून झालेल्या सुरुवातीनंतर सर्व दिशेने हलवता येईल असा ट्रॅकबॉल माऊस सर्वांना परिचित झाला. टॉम क्रॅन्स्टन, फ्रेड लाँगस्टाफ आणि केन्यॉन टेलर या तिघांनी हा माऊस तयार केला. त्याचा वापर फक्त नौदलासाठीच झाल्याने पेटंट नोंदवले गेले नव्हते. त्याची जागा नंतर 2004 मध्ये आलेल्या लॉजिटेकच्या रेड एलईडी ऑप्टिकल माऊसने घेतली.


आताच्या मॉडर्न लेसर माऊसमध्ये अदृश्य लेसर डायोड वापरले जातात. तंत्रज्ञानप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रदर्शन कॉम्प्युटेक्स 2013 मध्ये आसुसतर्फे मल्टी टचपॅड आणि ब्ल्यू एलईडीची उत्तम सेन्सिबिलिटी असलेला माऊस प्रदर्शित करण्यात आला. गेमिंगचे वेड असलेल्या गेमर्ससाठीही ‘सुपर माऊस’ बाजारात आज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ऑन द फ्लाय अ‍ॅडजस्टेबल सेन्सिटिव्हिटी, गेमर्सच्या हाताच्या साइजप्रमाणे वेगवेगळ्या ग्रिप साइझेसमध्ये माऊस उपलब्ध आहेत. थ्रीडी, टॅक्टिकल, अर्गोनॉमिक, गेमिंग, वायरलेस इतक्या वेगवेगळ्या त-हेचे माऊस बाजारात आणणा-या कंपन्यांइतकी सुबत्ता एंजलबर्ट यांना मात्र लाभली नाही.