आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळी रजा नकोच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबईतल्या एका कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं धोरण नुकतंच जाहीर केलं आहे. तसंच, राष्ट्रीय पातळीवर असा निर्णय घेण्यात यावा, यासाठी एक स्वाक्षरी मोहीमही हाती घेण्यात आली आहे. वरवर पाहता हे धोरण  स्वागतार्ह वाटत असले तरी ते तितकेसे सरळ नाही. राज्यातील महिला संघटनांनीही यास विरोध दर्शवला आहे, हे इथे उल्लेखनीय! 
 
 जर पाळीचा त्रास होत असेल तर त्यासाठी लागणारी रजा ही सरळसरळ वैद्यकीय रजा असायला हवी, तिला पाळीसाठीची रजा असं वेगळं नाव का द्यावं? पाळीचा त्रास होणाऱ्या असंख्य महिला असतात, परंतु त्यातल्या अनेकींचा त्रास डाॅक्टरकडे जाऊन, औषध घेऊन कमी होणारा असताे. परंतु, या कारणासाठी डाॅक्टरकडे जाणाऱ्या किती महिला असतात, हा संशोधनाचा विषय आहे. वेदनानाशक गोळी घेऊन अनेकींचा त्रास कमी होऊ शकतो, परंतु अनेक कारणांनी महिला गोळ्या घेत नाहीत. या कारणांमध्ये अज्ञान, गोळ्यांविषयीची भीती, गोळ्यांचा खर्च टाळण्याची वृत्ती, महिलांच्या आरोग्याकडे त्यांचे व कुटुंबीयांचे दुर्लक्ष, यांचा समावेश होतो. या रजेमध्ये एक सरसकटीकरणाचा मुद्दा आहे. सरसकट सर्व महिलांना मासिक पाळी येत नाही किंवा पहिल्या दिवशी वेदना होत नाहीत, किंवा सरसकट सगळ्या जणींना त्रासही होत नाही. काही जणींना हा त्रास दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या दिवशी होत असतो. ४५ ते ५० हे वय रजोनिवृत्तीचे मानले साधारणपणे आणि निवृत्तीचे ५८ वा ६०, तर अनेक जणी पाळी न येणाऱ्या गटात मोडतात. त्या सगळ्यांना हा नियम कसा लागू करणार, प्रत्येकीला महिन्यातून एक म्हणजे वर्षातून किमान १२ भरपगारी रजा देणार का? मासिक पाळीत जसा अनेकींना त्रास होतो, तसा अनेकींना त्यापूर्वी होतो. त्यांचं काय करणार? तसंच, एखाद्या कर्मचाऱ्याने या पीरिएड लिव्हसाठी अर्ज केला किंवा ते कारण देऊन रजा घेतेय असं कळवलं, तर ती खरं बोलतेय की थाप मारतेय, हे ठरवण्यासाठी त्यांचा छळ केला जाण्याचीही शक्यता निर्माण होते. केरळातल्या एका कंपनीत प्रसाधनगृहात सॅनिटरी नॅपकिन सापडल्यानंतर सर्व महिलांची तपासणी केल्याची घटना ताजीच आहे. 
 
अनेक कार्यालयांमध्ये महिलांना नोकरीवर ठेवण्यातच काचकूच केली जाते, अनेक कारणं देऊन त्यांना नोकरीपासून दूर ठेवण्यात येतं. बाळंतपणाची भरपगारी रजा द्यावी लागते, यालाही अनेक व्यवस्थापनांचा आक्षेप असतो. बायका कौटुंबिक कारण देऊन वा मुलांच्या आजारपणाचं कारण सांगून जास्त रजा मागतात, असा (गैर)समज अनेक पुरुषांचा असतो. बायका अशा रजा जास्त घेत असतील तर त्यामागे आपली समाजव्यवस्था आहे, पुरुषांचा घरातील सहभाग “न के बराबर’आहे, हे अशा वेळी लक्षात घेतले जात नाही. अशी रजा देण्याचे धोरण राष्ट्रीय पातळीवर खरोखरीच अमलात आले तर अशा संस्थांना महिलांना नोकरीपासून दूर ठेवण्यासाठी अधिकचे कारण मिळेल. 
 
या निमित्ताने मासिक पाळी या विषयावर लोक जाहीर बोलू लागलेत, ही सकारात्मक बाब नक्कीच आहे. अन्यथा आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये पाळी हा शब्द स्पष्ट घरातल्या पुरुष सदस्यांसमोर सोडा, महिलांमध्येही, उच्चारला जात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. या निमित्ताने आपल्या घरातल्याच स्त्रियांच्या आरोग्याविषयी पुरुषवर्ग जागृत झाला, त्यांची काळजी घेऊ लागला, तर त्याचं स्वागतच आहे. 
 
या चर्चेत जिला शेतावरच्या कामातून साप्ताहिक सुटीही मिळत नसते, जिला पाळी काय आणि बाळंतपण काय, कामावर जावंच लागतं, ती ग्रामीण स्त्री कुठेच नाही, याचीही दखल घ्यायला हवी. आज ऊसतोडणी, बांधकाम उद्योगात तसेच लहान मोठ्या उद्योगांमध्ये असंख्य महिला कार्यरत असतात. अशा नोंद नसलेल्या असंघटित गटातील महिलांपर्यंत हा अधिकार कसा पोहोचवणार, हा देखील प्रश्न आहेच. या सर्वांना वगळून ही रजा मान्य केल्यास समाजातील या मोठ्या संख्येने असलेल्या महिला वर्गावर अन्याय केल्यासारखेच होईल. सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय हेही माहीत नसलेला मोठा वर्ग भारतात आहे, हे विसरून चालणार नाही.  
 
सरतेशेवटी, असं कोणतंही काम नाही जे एक महिला करू शकत नाही, असं आपण अभिमानाने म्हणत असतो. आपण समानतेच्या गोष्टी करतो. मग आपल्या शरीरधर्माचं भांडवल करून रजेची सवलत मागताना हा समानतेचा, स्त्रीमुक्तीचा मुद्दा मागे पडतोय की काय, अशी शंका यायला वाव नक्कीच आहे. शेतात काम करता करता बाळंत होऊन आपल्या हाताने नाळ कापून काही वेळातच पुन्हा कामाला लागणारी स्त्री जशी दुर्मीळ नव्हे तशीच, असह्य वेदना होतानाही काॅर्पोरेट प्रेझेंटेशन करणारी वा क्लाएंट मीटिंग पूर्ण करणारी स्त्रीही आपल्या आजूबाजूला असतेच, याची आठवण ठेवायलाच हवी.
 
-संपादक, मधुरिमा
बातम्या आणखी आहेत...