आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग हिंदू होऊ लागले आहे काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदुत्वाबद्दलच्या जुन्या निकालावर फेरविचार करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे. २१ वर्षे जुन्या प्रकरणावर फेरविचाराबाबत ऐकून घेतले जाणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हिंदुत्व ही जीवनशैली आहे, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला होता, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे.

इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांमध्ये उघडपणे धर्मप्रसाराला आपल्या धर्माचा अविभाज्य भाग मानले गेले आहे. जेव्हा ते एखाद्याला आपल्या धर्मात धर्मांतरित करून घेतात तेव्हा त्यांंना असे वाटते की आपण धर्माची फारच मोठी सेवा केली आहे. आपल्या धर्मानेच आपल्याला ही पवित्र कामाची जबाबदारी सोपवलेली आहे, अशी त्यांची समजूत असते. त्यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांमध्ये एक असे धोरण निर्माण झालेले आहे की, संपूर्ण जग आपल्या धर्माचे झाले पाहिजे. त्यामुळे इस्लामचे तबलिगी आणि ख्रिश्चन धर्माचे मिशनरी हे धर्मप्रसारक कायमच मोठ्या जोमाने धर्मांतराच्या कामाला लागलेले असतात.

परंतु कृषिप्रधान देशांमध्ये जन्म झालेल्या धर्मांचा असा दृष्टिकोन नाही. संपूर्ण जगावर ईश्वराची सत्ता आहे, त्यामुळे इतर धर्माच्या लोकांशी त्यांचे काहीही वाकडे नाही, असा विचार ते करतात. त्यामुळे परधर्मीयांशी भेदभाव, संघर्ष अशा भावना ते जोपासत नाहीत. देवाने सर्वांना समान रूपाने जन्म दिलेला आहे. विविधतेने नटलेले हे जग अधिक सुंदर करण्यात आपण योग्य ते योगदान दिले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे शांततेने, सद््भावनेने आणि एकोप्याने परस्परांचा सन्मान ठेवत जीवन जगण्याकडे त्यांचा कल असतो. कृषिप्रधान देशात धर्म आणि राजकारण यांच्यात संघर्ष दिसून येत नाही. माणसाला भौतिक सुख हवे असते, त्यामुळे कृषिप्रधान देशात जन्माला आलेल्या धर्माच्या तुलनेत पश्चिम आशियातील धर्मानुयायांचे प्रमाण कमीच असल्याचे आढळेल. वेळोवेळी असे आढळून आलेले आहे की, माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन जसा विकसित होत गेला, तसे जग कृषिप्रधान देशातील धर्मांकडे अधिकाधिक आकर्षित होत असते.

माता-पित्यांकडून जन्मत: मिळणारा एक धर्म असतो. परंतु नंतर अनेकांना चिंतन वा साधना करून एखादा धर्म स्वीकारावासा वाटतो. पारंपरिक आस्थेऐवजी बुद्धीने स्वीकारलेला धर्म वरचढच ठरतो. विकसित समाजात नव्याने धर्मचिंतन आणि वेगळा मार्ग चोखाळण्याची एक सुप्त उत्क्रांती सुरूच असते. आज पाश्चात्त्य आणि अमेरिकी राष्ट्रांमध्ये बहाई आणि हिंदू धर्माकडे सामान्य लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत, याचेही हेच कारण आहे. एकेकाळी संपूर्ण अमेरिका खंडात ख्रिश्चन धर्माचा संपूर्ण पगडा होता. परंतु आज असे पाहावयास मिळते की, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये हिंदुत्वाचे विचार लोकांना अधिकाधिक भावत आहेत. अमेरिका आणि कॅनडातील ख्रिश्चन मिशनरीज या वाढत्या हिंदू जिव्हाळ्यापुढे हतबल होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी डग्लस टाड या पाश्चात्त्य लेखकाचा ऑनलाइन लेख वाचायला मिळाला. त्याने लिहिले होते की, ‘आम्ही हिंदू होत चाललो आहोत काय?’ गेल्या वर्षीसुद्धा टाइम्समध्ये एक लेख प्रकाशित झाला होता, त्याचे शीर्षकसुद्धा ‘आम्ही हिंदू झालो आहोत’ असेच होते. तिकडील वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारचे लेख प्रकाशित होणे आता नित्याचेच झाले आहे. याचे कारण हिंदुस्थानातून गेलेले हिंदू खूप मोठ्या संख्येत आहेत. २००१च्या जनगणनेनुसार कॅनडामध्ये तीन लाख बहात्तर हजारांपेक्षा अधिक तर अमेरिकेत ११ लाखांपेक्षा अधिक हिंदू राहतात. अमेरिका, कॅनडात गेलेले हे हिंदू तेथे हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे राहतात, सण आणि उत्सव साजरे करतात. हिंदू स्थानिक लोकांनाही उत्सवात सहभागी करून घेतात. त्यामुळे पाश्चात्त्यांना हिंदू धर्माबद्दल उत्कंठा निर्माण होते. ते माहिती मिळवतात तेव्हा त्यांना त्यामागची कारणमीमांसा दिसून येते.

भारतीय महिलांची साडी, नथ, पैंजण या गोष्टी असो वा तिळाचे लाडू, पुरणपोळी किंवा जिलेबी असो याचे ख्रिश्चनांना मोठे अप्रूप वाटते. अर्थात या वरवरच्या गोष्टींकडे स्थानिक लोक आकर्षित होत आहेत, असे अजिबात नाही. कारण तिकडचे लोक अतिशय स्पष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे असल्यामुळे एखादी गोष्ट आवडली की ते सरळ त्याच्या खोलात शिरून सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करू लागतात. हिंदू धर्माचे लोक किंवा हिंदू धर्माचे दर्शन भय किंवा प्रलोभन दाखवणारे नाहीत याची त्यांना खात्री पटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्माचे लोक धर्मांतरावर विश्वासच ठेवत नाहीत, त्यामुळे ते हे सारे धर्मांतरासाठी करत असल्याची भीतीही फोल ठरते. हिंदू धर्मांतरावर विश्वास ठेवत तर नाहीच शिवाय ते इतर धर्मांवर टीकाही करताना दिसत नाहीत.

अमेरिका व कॅनडात आयुर्वेद, ध्यान केंद्रे आणि योग केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. महेश योगी, ओशो रजनीश किंवा स्वामी चिन्मयानंद यांच्या केंद्रांतून साधना करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. हरे रामा हरे कृष्णापासून ते साईभक्तांपर्यंत अनेकांचे जथ्थे येथे पाहावयास मिळतील. ख्रिश्चन धर्म मृत व्यक्ती आणि स्वर्ग यात एका पावलाचे अंतर आहे असे मानतो, परंतु ही धारणा आता कमी होत चालली आहे. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून शरीर आणि आत्मा यांचे परस्परसंबंध समजून घेण्याचा अभ्यास ते करू लागले आहेत. केवळ विचारांमध्ये खुलेपणा आणि स्वातंत्र्य असल्यामुळे आम्ही हिंदू धर्म मानतो असे ते सांगतात.

ईश्वराला माना किंवा न माना, मूर्तिपूजा करा अथवा न करा, शाकाहारी असा वा नसा, तुम्ही हिंदू असू शकता हे मोठेच स्वातंत्र्य आहे. एवढा व्यापक धर्म जगाच्या पाठीवर दुसरा नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्व ही जीवनशैली असल्याचा निकाल दिला होता. जगातील प्रमुख धर्मांचा तौलनिक अभ्यास केल्याशिवाय ही बाब समजणे कठीण निश्चितच आहे.
बातम्या आणखी आहेत...