Home »Editorial »Columns» Mujaffar Hussain Article On Advani And President Election

अडवाणी, राष्ट्रपती निवडणूक व शिवसेना

मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार | Apr 21, 2017, 03:00 AM IST

  • अडवाणी, राष्ट्रपती निवडणूक व शिवसेना
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना असते. पंतप्रधान हे सरकार आणि सर्वात मोठ्या पक्षाचे नेते असतात. त्यामुळे छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन या दृष्टीने विचारविमर्श करणे हे त्यांचे दायित्वच असते. आपल्या देशात एक काळ असा होता की, काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असे. त्यामुळे लोकसभेतील इतर छोट्या पक्षांना विश्वासात घेणे त्या पक्षाला आवश्यक वाटत नसे. इतर पक्षांना केवळ आपल्या उमेदवाराची माहिती दिली जात असे. उमेदवाराची निवड झाल्यावरच लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांना कळवण्याची परंपरा दीर्घकाळ चालली.
एखाद्या सत्तारूढ पक्षाकडे आवश्यक बहुमत नसल्याच्या स्थितीत छाेट्या पक्षांना विश्वासात घेणे अनिवार्यच होऊन जाते. या वेळीही अशीच स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक बहुमत नाही. त्यामुळे इतर मित्रपक्षांची मदत लागणारच आहे. भाजपला मदतीची गरज असते तेव्हा त्या पक्षासमोर पहिले नाव असते महाराष्ट्रातील शिवसेना. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही संघटना हिंदुत्वाचा विचार घेऊन वाढली आणि स्थिरावली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी मदतीसाठी शिवसेनेला प्राधान्य दिल्याचे दिसते. मागील निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले. पाठिंबा मागितला. दाेन्ही नेत्यांत काय चर्चा झाली हे पुढे आले नाही, पण हिंदुत्वाच्या मुद्द्याने दोघांना पुन्हा एक केले हे दिसून आले. शिवसेनेचा पाठिंबा असेल तर भाजपचा उमेदवार निवडून येणार यात काही शंका नाही.
राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक मतांचे गणित पाहिले तर शिवसेनेची ताकद आपल्या ध्यानात येऊ शकेल. उत्तर प्रदेशात दणदणीत बहुमत मिळाल्यावरही भाजपला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान २० हजार मतांची आवश्यकता आहे. त्यामुळेच मोदी यांनी वेळीच शिवसेनेशी संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे आता आगामी राष्ट्रपती मोदी ठरवतील तेच होतील, हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. २० हजार मते गोळा करणे हे एक आव्हानच होते. छोट्या छोट्या पक्षांकडून ही पूर्तता शक्य नव्हती. शिवसेना या एकाच पक्षाकडे मतांची ही ताकद आहे. सेना सोबत असेल तर भाजपच्या उमेदवाराला काहीच धोका नाही.
मोदी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना नेत्यांकडे पाठिंब्याची मागणी केली आणि उद्धव ठाकरे यांनी होकार भरला, असे सांगितले जात आहे. मोदी सरकार हिंदुत्वाच्या मुद्द्यांची पूर्तता करणार असेल तर शिवसेना सोबत असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये हिंदुत्वाच्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे प्रेसकडे अाले नाही; पण हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी शिवसेना पूर्ण पाठिंबा देईल, हे स्पष्ट आहे. भाजपला आपला राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी २० हजार मतांची गरज आहे. शिवसेनेकडे २१ खासदार आणि ६३ आमदार असून त्यांच्या मतांचे मूल्य २५ हजार ८०० इतके आहे. हे भक्कम संख्याबळ शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या मागे उभे केल्यास भाजपचा उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण नाही.
शिवसेनेने आपली ताकद भाजपमागे उभी केली नाही तर भाजपचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार चारीमुंड्या चीत होऊ शकतो. शिवसेनेने याआधी दुसऱ्या पक्षांना मतदान केले नाही, असे बिलकुल नाही. काँग्रेसचे प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मतदान केले होते हे विसरून चालणार नाही. हिंदुत्ववादी नसणाऱ्या उमेदवाराला शिवसेना मतदान करू शकते, तर हिंदुत्व विचाराचा उमेदवार असेल तर का करणार नाही? शिवसेनेला विश्वासात घेण्याची गरज होती, ते काम मोदी यांनी केले आहे. मोदी भेटीनंतरची उद्धव ठाकरे यांची भूमिका बोलकी आहे. हिंदुत्वाच्या समान मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकदुसऱ्यांना विश्वासात घेऊन काम करतील, याची ग्वाही उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदी जे उमेदवार देतील तेच देशाचे राष्ट्रपती बनतील आणि तो उमेदवार हिंदुत्वाला पूरकच असणार हे वेगळ्याने सांगायला नको.
बाबरी विध्वंस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानंतर गुंतागुंत वाढली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आता खटला चालणार आहे. खटल्याचा निकाल येण्यास किमान दोन वर्षांचा अवधी आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ठरवतील तेच होईल. शिवसेना आणि भाजपचा संभाव्य उमेदवार लालकृष्ण अडवाणी हेच असतील. अडवाणी हे राष्ट्रपती होण्यास कायद्याची काहीच आडकाठी नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण विरोधी पक्ष या मुद्द्यावरून रान पेटवतील हे नक्की. याचा फायदा भाजपलाच होणार आहे. अडवाणी यांचे इतर पक्षांतील नेत्यांशी असलेले संबंध ध्यानात घेता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेले नितीशकुमार आणि इतर अनेक महत्त्वाचे पक्ष अडवाणींच्या बाजूने कौल देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पुढचे राष्ट्रपती लालकृष्ण अडवाणी हेच असतील यात काहीही अतिशयोक्ती नाही.
अडवाणी यांच्याहून शक्तिशाली हिंदुत्ववादी नेता असू शकत नाही. ते भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी हिंदुत्वाला एक झळाळी मिळवून दिली होती. अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. हिंदुत्व विचार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते खऱ्या अर्थाने अडवाणी आणि बाळासाहेब यांचे वारसदार आहेत. भविष्यात हिंदुत्वाचे राजकारण हे अधिक प्रभावी आणि गतिशील बनणार आहे. वरील समीकरण यशस्वी झाले तर भारतात हिंदुत्वाची एक व्यापक लाट निर्माण होईल. भारताच्या राजकारणातील हा बदल ऐतिहासिक असेल. भारतीय राज्यघटनेच्या मर्यादेमुळे लालकृष्ण अडवाणी यांना हिंदू राष्ट्रपती म्हटले जाणार नाही, परंतु राजकारणाचे हिंदुत्वीकरण करण्याचे श्रेय त्यांना नक्कीच देता येईल.
राष्ट्रपतिपदावर लालकृष्ण अडवाणी विराजमान झाले तर त्यानंतर देशात जे वातावरण तयार होईल त्याने हिंदू राजकारण आणि हिंदू अर्थव्यवस्थेची झलक पाहायला मिळेल. आर्य चाणक्य यांनी काहीही न बोलता आपल्या रणनीतीने हिंदू भारताचे मानचित्र जगासमोर साकार केले होते, त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या अनेक दशकांपासून हृदयात साठवलेली ‘जगद््गुरू भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याची सुरुवात असू शकते.

Next Article

Recommended