आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय उपखंडातही "इसिस'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईजवळ वसलेल्या कल्याणचे काही तरुण सिरियात सुरू असलेल्या जिहादकडे आकर्षित झाल्याची बातमी आली तेव्हा अनेकांनी त्या बातमीवर विश्वास ठेवला नाही. त्यातील एक तरुण परतला आणि त्याने सत्यस्थिती कथन केली, तेव्हा सर्वसामान्य जनताच नव्हे, तर भारत सरकारलाही जाणवू लागले की, मध्य आशियात सुरू असलेल्या "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया'म्हणजेच इसिसच्या अतिरेकी कारवायांचा प्रभाव आता दूरदूरपर्यंत पसरू लागला आहे.
अमेरिका आणि युरोपमधील काही देशांनीही हे मान्य केले आहे की, अल् बगदादीने लावलेल्या आगीच्या झळा आता आमच्याही घरापर्यंत येऊन पोहोचू लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानातून सिरियाला गेलेले जिहादी आता इतर मुस्लिम देशांतही वेगाने शिरकाव करू लागले आहेत. भारतीय उपखंडात त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही, असे मानले जात होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या बातम्यांनी हा समज खोटा ठरवला आहे.
दौलते इस्लामिया इराको सिरिया या संघटनेचा प्रभाव जेथे कट्टरवादी मुसलमानांच्या संघटना आहेत, तेथे वाढताना दिसत आहे. अफगाणिस्तान हा लादेनचा बालेकिल्ला होता, हे साऱ्या जगालाच माहीत आहे. तेथे बसूनच त्याने अफूची काळी कमाई केली आणि त्याच्या जोरावर पाकिस्तानात घुसखोरी केली. काही दिवसांपूर्वी पेशावर येथील एका शाळेतील १४० मुलांची हत्या करण्यात आली आणि नंतर पेशावरमधीलच हयाताबाद येथे एका मशिदीत स्फोट करून २० जणांना उडवण्यात आले. या दोन घटना अल् बगदादीचा पाकिस्तानातील प्रभाव दाखवण्यास पुरेशा आहेत.
लादेनशी आमचा काही संबंध नाही, असा खुलासा पाकिस्तानमधील सत्ताधारी वारंवार करत असत. जेव्हा एका रात्री अमेरिकेच्या कमांडोंनी ओसामाची पाकिस्तानमधील त्याच्या घरात घुसून मानगूट पकडली आणि धडक कारवाई करून त्याला अरबी समुद्राच्या तळाशी गाडले, तेव्हा कोठे पाकिस्तानसह मुस्लिम देशांना मान्य करावे लागले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मुस्लिम दहशतवाद्यांसाठी नंदनवनच आहे.

सिरियात दाईशच्या क्रूर कारवाया सुरू आहेत, हे काही आता लपून राहिलेले नाही. तरीही राजकीय बुद्धिजीवी सांगत आहेत की, "इसिसचा प्रमुख अल् बगदादी हा सिरिया, इराक, तुर्की आणि इराणमध्ये वाटेल ते करू शकतो. मात्र, भारतीय उपखंडात त्याची डाळ शिजणार नाही.' पण गेल्या काही दिवसांतील घटना पाहता म्हणावे लागते की, अल्् बगदादीचा जिहाद हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला आहे.
आपल्या कथित साम्राज्याची सीमा सांगताना बगदादी याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला आपल्या साम्राज्यात विलीन केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर त्याने पाकिस्तानमध्ये हाफिज सईद आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबान नेता मुल्ला अब्दुल रऊफ खादिम यांना आपले कमांडर म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्याने, लवकरच भारतीय उपखंडातील इतरही कमांडर नियुक्त केले जातील, असे जाहीर केले. हा सर्व प्रकार पाहता, असे म्हटले जात आहे की, बगदादी याने आता या दोन्ही देशांतील अतिरेकी संघटनांना आपले नेतृत्व स्वीकारून एकत्रित येण्याचेच जणू आमंत्रण दिले आहे. यात अल् कायदा, जमातुल अहरार आणि लादेनच्या काळात अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या लहान-मोठ्या अतिरेकी संघटनांचा समावेश आहे. लादेनच्या खात्म्यानंतर त्याचे साम्राज्य विखुरले गेले आहे, त्याचा फायदा घेऊन बगदादी या भागात आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

बगदादी म्हणतो की, या क्षेत्रात फिदाईनचे सरकार स्थापन करायचे आहे. भारतीय उपखंडात केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तानच नव्हे, तर तथाकथित खिलाफतच्या स्थापनेसाठी भारत आणि बांगलादेशची भूमीही सुपीक आहे. बगदादीच्या कमांडरना वाटते की त्यांच्या सेनेला येथे फिदाईनही मिळू शकतात आणि अफिमसारखे काळे सोनेही! भारतीय उपखंडात घुसखोरीची योजना तयार करताना अल् बगदादीचे सौदी, येमेन आणि लिबिया येथील कमांडरही सहभागी झाले होते.

आतापर्यंत लोकांना वाटत होते की, बगदादी भारतीय उपखंडाकडे वळणार नाही. कारण बगदादीच्या समर्थकांमध्ये सलफी विचारधारेच्या लोकांची संख्या जास्त आहे आणि भारतीय उपखंडात हनफी आणि देवबंदी विचारधारेचे लोक अधिक संख्येने आहेत. सलफी त्यांचा द्वेष करतात. कारण, ते भारतीय उपखंडातील मुसलमानांना पूर्ण मुसलमान समजत नाहीत. हनफी लोकांना सलफी लोकांएवढे कट्टर मानले जात नाही. असे असले तरी भारतीय उपखंडात वाढत असलेली कट्टरता पाहूनच बगदादीच्या सल्लागारांनी त्याला येथे पाय रोवण्यासाठी प्रोत्साहन दिले.
पैशासोबतच येथे मोठ्या प्रमाणावर फिदाईन मिळू शकतात, असे त्यांना वाटते. या उपखंडातील लोकसंख्या पाहता धर्मांतरणाचे काम करणाऱ्या मुल्ला-मौलवींना त्यांनी आपले मोहरे बनवण्याचे ठरवले आहे. जगात इस्लामी राज्य स्थापन करायचे असेल, तर या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे या सल्लागारांचे मत आहे.

भारतावर मुस्लिमांनी विजय मिळवल्यानंतरच इस्लामी साम्राज्याची सीमा आणखी वाढवता येईल आणि मोठ्या संख्येने अनुयायी आपल्या सेनेसाठी प्राप्त होतील, असे बगदादीच्या सल्लागारांना वाटते. या क्षेत्रातील सर्वात मोठा अडसर राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयता असल्याचे इसिसच्या सूत्रांना वाटते. इस्लाम साऱ्या जगाला आपले राष्ट्र समजते. मात्र, भारतीय उपखंडातील लोक केवळ आपल्या क्षेत्रीय भूभागालाच आपले राष्ट्र समजतात. त्यांच्यासाठी धर्म नव्हे, तर त्यांची भूमी महान आहे. त्यामुळे बगदादी आणि समर्थक आपल्या धार्मिक शक्तीच्या आधारे भारतीय उपखंडातील राष्ट्रवादाचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर कोणत्या बाबीला मान्यता देणे म्हणजे इस्लामचा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतरांच्या तुलनेत आपण इस्लामला दुय्यम दर्जा दिला असल्यामुळे जगात इस्लामचे साम्राज्य निर्माण करता आले नाही, असे कट्टरपंथीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या मताप्रमाणे अशा विचारांनाच कुफ्र म्हटले जाते. संपूर्ण जगात इस्लामचा प्रचार करणे, हा एकमात्र उद्देश बगदादी याचा आहे. त्यामुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील
कडव्या संघटना आणि कट्टरवादी विचारधारा आता बगदादीच्या समर्थक झाल्या आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला इसिस, बगदादी व त्या संघटनेच्या समर्थकांपासून कोण वाचवेल हा खरा प्रश्न आहे. भारतीय उपखंडासमोर हेच एक मोठे आव्हान आहे.