आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mulism Community Electoral Behaviour By Muzafffar Husain

मुस्लिम मतदारांचा प्रभाव किती ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडेल. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष या वेळी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस - प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करताना दिसत आहे. पण मागील विधानसभा निवडणुकांचा अनुभव पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल, असे वाटत नाही. दोन किंवा त्याहून अधिक पक्षांना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही, असेच एकूण चित्र आहे.

राज्यातील १६ टक्के मुस्लिम मतदार या निवडणुकीत प्रभावी घटक राहील, यावर मात्र सर्वच राजकीय पक्षांचे एकमत आहे. मुस्लिम समाजाचेही स्वत:चे राजकीय पक्ष उदयास आले आहेत, परंतु इतरांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याएवढी शक्ती त्या पक्षांमध्ये नाही, हे वास्तव आहे. मुस्लिम मतदार मतदान केंद्रावर पोहोचतो, निवडणुकीनंतर मुस्लिम अजेंडा कोण लागू करेल याचा आपल्या मतीप्रमाणे विचार करून तो मतदान करतो. पण कोणत्याही स्थितीत तो मतदान केंद्रावर पोहोचतो हे नक्की.

पूर्वीप्रमाणे त्याचे मतदान मुस्लिम समाजातील एखाद्या धार्मिक संघटनेच्या फतव्यानुसार बदलत नाही, पण पुढील काळात मुस्लिमांना कोणता उमेदवार साथ देईल याचा विचार तो नक्की करतो. कोणत्याही मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांची गर्दी होऊ नये याची त्याला काळजी असते. त्याचे म्हणणे असते की निवड चुकली तर गैरमुस्लिम उमेदवार, जो त्याच्या दृष्टीने जातीयवादी आहे, तो निवडून येईल आणि दुस-या पक्षाच्या धर्मनिरपेक्ष उमेदवारावर पराभूत होण्याची पाळी येईल.
त्यामुळे एखादा उमेदवार मुस्लिम नसतानाही केवळ तो धर्मनिरपेक्ष आहे यासाठी तो त्याला विजयी करण्याचा प्रयत्न करत असतो. मुस्लिम मते विभागली जाऊ नयेत यासाठी तो प्रयत्न करत असतो.
महाराष्ट्रातील या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची एकूण संख्या आहे ४११७. मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये सन २००९ च्या तुलनेत या वेळी सर्वच राजकीय पक्षांनी अधिक मुस्लिम उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. काँग्रेसने या वेळी १९ उमेदवार दिले आहेत. गेल्या वेळी ही संख्या १२ होती. राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ मध्ये ४ उमेदवार दिले होते, तर या वेळी १६ उमेदवार रिंगणात आणले आहेत. शिवसेनेने गेल्या वेळी फक्त एकच उमेदवार दिला होता. या वेळी दोन दिले आहेत. भाजपनेही गेल्या वेळी एक, तर या वेळी दोन मुस्लिम उमेदवार दिले आहेत. गेल्या वेळी फक्त एक उमेदवार दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वेळी सात मुस्लिम उमेदवार दिले आहेत. अपक्ष उमेदवारांची गणती करणेच कठीण आहे.

मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघांमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येतात. परिणामी कोणत्याही स्थितीत मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकत नाही. या वेळीही चांदिवली, भायखळा, मुंबादेवी आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघांमध्ये हे दृश्य पाहायला मिळते. मुस्लिमबहुल मतदारसंघातील मुस्लिम मते विभागली गेल्यामुळे गैरमुस्लिम उमेदवार विजयी होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मुंब्रा - कळवा मतदारसंघातील मुस्लिम उमेदवारांच्या गर्दीने गैरमुस्लिम उमेदवारांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. गेल्या वेळी जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघातून निवडून आले होते, पण या वेळी ९ मुस्लिम उमेदवारांनी त्यांच्या विजयाची वाट बिकट करून ठेवली आहे. परिणामी त्या जागी शिवसेना उमेदवार विजयी झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

सर्वेक्षणावरून ध्यानात येते की, मुंबईजवळील अनेक मतदारसंघ असे आहेत, जेथे मुस्लिम उमेदवार आपल्या मतदारांच्या बळावर विजयी होऊ शकतात. परंतु मुस्लिम उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे तसे होताना दिसत नाही. धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने पाहू गेल्यास यात चुकीचे असे काहीच नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मुस्लिम मतदारांच्या शब्दावरूनच कोण उमेदवार निवडून येईल हे ठरू लागले तर देशातील धर्मनिरपेक्षतेचे काय होईल? त्यामुळे कोणताही उमेदवार हा त्याने केलेली कामे आणि विचारधारा यावरच निवडून आला पाहिजे, जाती किंवा धर्म याच्या आधारे नव्हे. राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरच निवडणुका व्हाव्यात.

महाराष्ट्राच्या राजकीय फडातील पाचवा भिडू राज ठाकरे हे असतील. युती आणि आघाडी तुटल्यामुळे निकालानंतर विधानसभेची स्थिती त्रिशंकू असेल, याची शक्यता वाढली आहे. आपल्या रचनात्मक कामांचा प्रभाव पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास निवडणुकीनंतर नवी समीकरणे पुढे येतील. राजकारणात कोणतीही गोष्ट स्थायी नसते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दुरावलेले मित्रपक्ष पुन्हा एक होऊ शकतील किंवा वेगळी समीकरणेही जुळून येतील. शरद पवार हे भाजपशी हातमिळवणी करू शकतील, असेही म्हटले जात आहे. शेवटी या सा-या कल्पनाच आहेत, खरी समीकरणे तर निकालानंतरच पुढे येतील.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. बाळासाहेबांचा एकही गुण त्यांच्यात आजवर पाहायला मिळालेला नाही, हेही विसरून चालणार नाही. महायुतीच्या जागावाटपात त्यांनी कठोरता दाखवली, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहण्याबाबतचा निर्णय मात्र त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सोडला. महायुती तुटल्याचा उद्धव ठाकरे यांना पश्चात्ताप होत आहे, हे यातून स्पष्ट होते.

यामागे अनेक कारणे असू शकतील. एक - शिवसेनेचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही. काही भागापुरताच तो मर्यादित आहे. दोन - विदर्भात शिवसेनेला यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. विदर्भाला महाराष्ट्रातून बाहेर पडायचे आहे. भाजप स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे, तर शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भ निर्मितीला कडवा विरोध आहे. तीन - या वेळी सेनेला गुजराती आणि महायुतीतल्या अन्य पक्षांची मते मिळणार नाहीत. मराठी मतांवरही फक्त शिवसेनेचाच एकाधिकार राहिलेला नाही. राज ठाकरे यांचाही मराठी मतांवर दावा आहे. त्यामुळे मराठी मते विभागल्याचा फटका सेनेलाच बसणार आहे.

या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याप्रमाणेच मतदारांचीही कसोटी लागणार आहे. राज्यातील पाच मोठ्या पक्षांसह अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातून एकाची निवड करणे अवघड असेल. अशा स्थितीत विचारपूर्वक टाकलेली मुस्लिम मते निर्णायक ठरतील. वेगळे होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील मुस्लिम मतांवर एकाधिकार होता. आता मुस्लिम मतांना खुश करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा असेल. स्पर्धेमुळे मुस्लिम मते विभागली जातील. अशा स्थितीत सर्व मुसलमान संघटित होऊन एखाद्या पक्षाला मतदान करतील तर त्या पक्षाला यश निश्चित मिळेल. परंतु असे होणे शक्य आहे काय?