आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनोरेलची धाव कुठवर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''जानेवारी 2009 मध्ये मोनोरेलचे काम सुरू करण्यात आले. हे काम जून 2011 मध्ये पूर्ण होणार होते, परंतु अनेक अडचणी आल्याने काम रखडले. नुकत्याच केलेल्या यशस्वी चाचणीनंतर पुढील सहा ते सात महिन्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील पहिली मोनो रेल्वे मुंबईत धावायला लागण्याची शक्यता आहे.''

शहरांमध्ये वाढणारी लोकसंख्या, त्याचबरोबर वाढणारी वाहने आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध मार्ग अवलंबले जात आहेत. यात मेट्रोरेल, मोनोरेल असे काही पर्याय आहेत. मेट्रोरेल देशातील काही शहरांत सुरू झाली आहे, तर देशातील पहिली मोनोरेल मुंबईत सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत उभारण्यात येणार्‍या मोनोरेलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासाठी पत्रकारांनाही विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. प्रवास केल्यानंतर जाणवले की, अजून भरपूर काम बाकी आहे. शहरातील पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मोहिमेच्या अंर्तगत 2.80 अब्ज रुपये खर्च केले जाणार आहेत. जेएनएनयूआरएमतर्फे 10 लाख वा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात मेट्रो रेल्वेसेवा उभारण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले जात असून नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांत मेट्रोरेल धावणार आहे. मुंबईत मोनोरेलचा प्रवास काही महिन्यांत सुरू होणार असला तरी गेल्या सहा वर्षांपासून या शहरात मेट्रोरेल अजूनही धावू शकलेली नाही. मेट्रोरेलचे संथगती काम पाहता नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांत मेट्रो सुरू होण्यास अजून दहा ते पंधरा वर्षे लागली तर आश्चर्य वाटायला नको.
मेट्रोरेल आणि मोनोरेलमध्ये खूप फरक आहे. मेट्रोरेल ही रेल्वेप्रमाणेच दोन रुळांवर धावते, मात्र ती पुलांवर बांधण्यात आलेल्या रुळांवरून जाते. मोनोरेल मात्र एका मोठ्या सिमेंटच्या वा लोखंडाच्या बीमवरून धावते आणि ती जमीन व वरून अशा दोन्ही ठिकाणांवरून धावते. मोनोरेलची सुरुवात रशियामध्ये 1820 मध्ये इवान एल्मानोव यांनी केली. मोनोरेलचा हा पहिला प्रयत्न काही अंशी सफल झाला होता, परंतु मोनोरेलला खरे यश मिळाले इंग्लंडमध्ये. त्या देशातील हेन्री पाल्मरने कोळशाच्या खाणींमध्ये दगडाची ने-आण करण्यासाठी मोनोरेल सुरू केली आणि नंतर त्याने मोनोरेलचे पेटंटही घेतले. पेटंट घेतल्यानंतर मोनोरेल प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात आली. सुरुवातीला दोन कडा असलेल्या धातूच्या रुळावरून ती धावू लागली. दोन रुळांऐवजी एकाच रुळाचा वापर होत असल्याने तिची लोकप्रियता वाढली. स्वातंत्र्योत्तर काळात देशात मुंबईत प्रथमच मोनोरेल धावणार असल्याचा एक अनोखा आनंद असला तरी खूपच कमी लोकांना ठाऊक आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोनोरेल धावत होती. पतियाळा स्टेट मोनोरेल (पीएसएमटी) या नावाने 1910 ते 1927 पर्यंत पतियाळामध्ये मोनोरेलचा आनंद नागरिक घेत होते. नंतर ही मोनोरेल बंद पडली, परंतु आजही दिल्ली येथील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात या मोनोरेलचे इंजिन आणि डबे जतन करून ठेवलेले आहेत. 1950 पर्यंत मोनोरेल एकाच पद्धतीने तयार करण्यात येत होती, परंतु 1950 नंतर मोनोरेलमध्ये बदल करण्यात आला. आज जी मोनोरेल दिसते आहे ती यानंतरच्या बदलाचाच परिपाक आहे. मोनोरेल उंच खांबावरून धावू लागल्याने जागेची बचत होऊ लागली. मुंबईत धावणारी मोनोरेल ही स्टँडिंग बीम मोनोरेल प्रकाराची आहे. यामध्ये एका बीमवर रेल्वेचे डबे धावतात. डब्यांचा तोल राखण्यासाठी दोन्ही बाजूला रबरी चाके दिलेली असतात आणि ती दिसू नयेत म्हणून त्यांच्यावर आवरण घालण्यात आलेले असते. मॅग्नेटिक लॅविटेशन या चुंबकीय शक्तीचा वापर करून मोनोरेलला ऊर्जा पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विजेची बचत होते आणि मोनोरेल तिला लागणारी ऊर्जा स्वत:च तयार करू शकते. खांबावर उभारली जात असल्याने मोनोरेलला कमी जागा लागते, रेल्वेसेवेच्या खर्चापेक्षा कमी खर्चात तयार होते, वाहतूक व्यवस्थेत मोनोरेल कोणतीही बाधा आणत नाही. याचा प्रत्यय मोनोरेलमधून प्रवास करताना आलाच होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोनोरेल रुळावरून घसरण्याची अजिबात शक्यता नसते. फक्त वळणावर काही घडले तरच, अन्यथा मोनोरेल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त आहे.
13 ऑगस्ट 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबईतील मोनोरेलचा प्रकल्प मंजूर केला. जानेवारी 2009 मध्ये मोनोरेलचे काम सुरू करण्यात आले. हे काम जून 2011 मध्ये पूर्ण होणार होते, परंतु अनेक अडचणी आल्याने काम रखडले. पुनर्वसनाचा प्रश्न सगळ्यात जास्त बिकट होता. त्यामुळे त्यानंतर मोनोरेल सुरू करण्यासाठी डिसेंबर 2012 चा काढण्यात आलेला मुहूर्तही हुकला. आता ऑगस्ट 2013 चा मुहूर्त काढण्यात आला आहे. मोनोरेलचा पहिला रॅक 15 जानेवारी 2010 ला मुंबईत आला आणि 26 जानेवारी 2010 ला चाचणीही घेण्यात आली, परंतु मोनोरेल सुरू होण्यास अजूनही पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.
प्रकल्प रखडल्यामुळे त्याचा खर्च वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकल्पाचा खर्च तीन हजार कोटी रुपयांवर गेला आहे. ही ट्रेन चालवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 36 ट्रेन कॅप्टनची गरज भासणार असून ट्रेन कॅप्टन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात महिला ट्रेन कॅप्टनही मोनोरेल चालवताना दिसणार आहेत. स्कोमी या मलेशियन कंपनीतर्फे महिलांनाही मोनोरेल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी वडाळा डेपोमध्ये लेडी कॅप्टन रूमही तयार करण्यात आली आहे. सध्या स्कुमीचे पॉल राज मुंबईत मोनोरेल कॅप्टनना मोनोरेल चालवण्याचे प्रशिक्षण स्टिम्युलेटरच्या माध्यमातून देत असून पाच जणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. अडीच महिन्यांचे हे प्रशिक्षण असून मोनोरेल चालवण्याचा 100 तासांचा निकष पूर्ण केल्यानंतरच मोनोरेल चालवण्याचा परवाना दिला जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 69 ट्रेन कॅप्टनची गरज भासणार आहे.
गाडी खोळंबल्यास प्रवाशांची सुटका व अन्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही मुंबई पोलिस, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांना देण्यात आले आहे. देशातील पहिली मोनोरेल सुरू करण्याचा मान ऑगस्टपासून मुंबईला मिळेल, अशी लक्षणे दिसू लागलेली आहेत. अनंत अडचणींवर मात करत अखेर मोनोरेलचा प्रकल्प मार्गी लागला असून वडाळा ते चेंबूर हा मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एमएमआरडीए, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो आणि मलेशियाची स्कुमी कंपनी यांनी संयुक्तरीत्या हा प्रकल्प हाती घेतला असून तो पूर्णत्वाला आणला आहे. मोनोरेलचा दुसरा टप्पा म्हणजेच जेकब सर्कल ते वडाळा. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात जास्त लांबीची 19.54 किमींची मोनोरेल असून गाडीचा वेग 32 किमी प्रतितास, जास्तीत जास्त 65 किमी प्रतितास आहे. तिकीटदरही कमीत कमी आठ रुपये आणि जास्तीत जास्त 20 रुपये ठेवण्यात आला आहे. मुंबईत मोनोरेल सुरू होणार आहे, परंतु नाशिक आणि औरंगाबादकरांचेही मेट्रोरेलचे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे, अशीच इच्छा याप्रसंगी व्यक्त करावीशी वाटते.
(shindeckant@gmail.com)