Home | Editorial | Columns | muslim people

मुस्लिम समाजाचा मागोवा

divya marathi | Update - Jun 02, 2011, 04:00 AM IST

संपूर्ण भारतीय मुस्लिम समाज हा एकसंध आहे हा दुसरा गैरसमज! काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते बंगालपर्यंत विखुरलेल्या मुस्लिम समाजाचा इस्लाम हाच धर्म असला तरी प्रादेशिक सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत त्यांच्यात बरीच भिन्नता आहे.

  • muslim people

    अब्दुल कादर मुकादम
    संपूर्ण भारतीय मुस्लिम समाज हा एकसंध आहे हा दुसरा गैरसमज! काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते बंगालपर्यंत विखुरलेल्या मुस्लिम समाजाचा इस्लाम हाच धर्म असला तरी प्रादेशिक सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत त्यांच्यात बरीच भिन्नता आहे. नुसता महाराष्ट्रापुरता विचार केला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील मुस्लिम समाज, सामाजिक चालीरीती, भाषा, इतकेच काय पण धार्मिक कर्मकांडे पाळण्याच्या पद्धती या बाबतीत एकमेकांपासून बराच भिन्न आहे. मराठवाड्याशी इस्लामचा प्रथम संबंध आला तो तेराव्या शतकाचा उत्तरार्धात 1295 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी प्रथमत: देवगिरीवर स्वारी केली व तिथे लुटालूट करून बरीच संपत्ती आपल्याबरोबर नेली. पण 1310-11 मध्ये त्याने देवगिरीवर दुसरी स्वारी केली तेव्हा राज रामचंद्र याला पदच्युत करता त्याचे राज्य आपल्या साम्राज्याला जोडून टाकले व त्याचा कारभार मलिक काफूर याच्याकडे सोपविला. इथूनच हिंदूंना धर्मांतरित करण्याची परंपरा सुरू झाली. अर्थात हे धर्मांतर जबरदस्तीचे होते हे ओघानेच आले. पण तरीही तलवार आणि कुराण असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आले होते, असे ठामपणे सांगता येणे कठीण आहे. कारण अशा नव्या धर्मांतरितांपैकी बर्‍याच जणांनी नव्या राजवटींबरोबर जुळते घेऊन आपली ऐहिक प्रगती करून घेतल्याचे पुरावे इतिहासात आहेत. त्यामुळे इस्लामचा स्वीकार करण्यासाठी त्यांना ऐहिक प्रगतीची व सुखाची आमिषे दाखविण्यात आली होती, असे मात्र म्हणता येईल. चौदाव्या शतकात महंमद तुघलखने देवगिरीला म्हणजेच पर्यायाने दौलताबादला आपली राजधानी करण्याचे दोनदा प्रयत्न केले. प्रथम 1338 मध्ये व नंतर 1343 मध्ये हे दोन्ही प्रयत्न फसले. तुघलकाच्या सैन्यात स्थानिकांचा भरणा बर्‍यापैकी होता. पण पर्शियन आणि अफगाणी सैनिक बहुसंख्य होते. व त्यात शिया आणि सुन्नी असे पंथभेदही होते. शिया पंथीयांत सर्व साधारणपणे परकीय मानले जात असे व सुन्नी आणि शिया यांच्यात सतत तणावाचे वातावरण असे. याचाच परिणाम म्हणून 1347 मध्ये शियापंथीयांनी हसत गंगु याच्या नेतृत्वाखाली बंड केले. या बंडामुळे दक्षिणेत स्वतंत्र मुस्लिम राजवटींचा पाया घातला गेला.
    कुतुबशाह आणि आदिलशाह हे शिया होते. तर औरंगजेब सुन्नी होता. त्याला धर्मापेक्षा आपल्या पंथाचा व वंशाचा अभिमान जास्त होता. म्हणूनच त्यांनी दक्षिणेतल्या या दोन्ही शाहय़ा नेस्तनाबूत केल्या. त्यानंतरचे त्याचे लक्ष्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतंत्र राज्य हे होते. ते काबीज करण्यासाठी तो पाच दशके (1680 ते 1707) दक्षिणेत ठाण मांडून बसला होता. त्यासाठी त्यांना औरंगाबाद शहरही वसविले. पण छत्रपतींचे राज्य तो नष्ट करू शकला नाही. हे अपयश पचवतच त्याने मराठवाड्यात शेवटचा श्वास घेतला. दैवदुर्विलास असा की ज्या दक्षिणेवर आपले अधिराज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्याने पाहिले ते तर पुरे झाले नाहीच पण त्याच महाराष्ट्राच्या भूमीत त्याला दफन करून घ्यावे लागले.
    मराठवाड्यातील मुस्लिम समाजाचा वांशिक दृष्ट्या विचार केला तर त्यापैकी बहुतांश लोक अरब अफगाण (पठाण) आणि नंतरच्या काळातील मोगल वंशाचे आहेत. पठाण लोकांनी मग आपले वेगळेपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. ते स्थानिक मुस्लिम समाजाशी संपूर्णपणे समरस कधीच झाले नाहीत. त्यांचा बेटी व्यवहारसुद्धा त्यांच्यातील अफगाणी टोळ्यांशीच होत असत. मोगल हे मूळचे तार्तार किंवा तुरेनीयन वंशाचे होते. परंतु त्यांची वांशिक वैशिष्ट्ये काळाच्या ओघात नष्ट झाली. आजच्या मराठवाड्यातील मुस्लिम समाजाचे मूळ असे पठाण, अरब औबेसीनीयन आणि मोगल वंशाच्या संमिर्शणात आहे. अर्थात त्यामध्ये धर्मांतरीत स्थानिकांचा वाटाही मोठा आहे. या त्यांच्या वांशिक वैशिष्ट्यांमुळे हा समाज स्थानिक हिंदू समाजापेक्षा असल्याचे मात्र स्पष्टपणे जाणवते पण त्यांच्यापैकी अरब कोण पठाण किंवा इतर वंशीय कोण, हे समजणे मात्र कठीण आहे.

Trending