आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतिहासाच्या प्रकाशात भारत-पाक संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतावर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचे पाकिस्तानने मनोमन ठरवले असावे, असे तो वागत आहे. भारताशी दोन हात करण्याची धमक आपल्यात नाही, हे पाकिस्तानचे राजकीय नेते जाणून आहेत. कोणत्याही बाबतीत ते आपली तुलना भारताशी करू शकत नाहीत. परंतु तरीही भारताशी वैर करण्यातच आपले भले आहे, असे त्या देशाला नेहमी वाटते.
पूर्व बंगालचे रूपांतर बांगलादेशात झाले, याचे पाकिस्तानला काहीच दु:ख नाही. बांगलादेश तयार झाल्याने आणखी एका इस्लामी देशाची निर्मिती झाली याचाच त्यांना आनंद आहे. भारतात या भूमीचा विलय झाला असता, तर मात्र पाकिस्तानला मोठे दु:ख झाले असते. बांगलादेश निर्मितीमुळे पाकिस्तानला आपल्या देशाचा पूर्व भाग कायमसाठी गमवावा लागला. त्याने आपले मोठे नुकसान झाले यापेक्षा त्याचा भारताला काही लाभ झाला नाही, भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही, याचा पाकिस्तानला आनंद वाटतो. आपले किती नुकसान होते याचे त्याला काही पडले नाही, त्यापेक्षा भारताचे किती नुकसान केले यात त्याला जास्त रस आहे. त्यामुळे भारताशी संघर्ष करून आपण काय गमावले याचा हिशेब तो करत नाही. भारताशी वैर घेऊन येनकेनप्रकारेन नुकसान करणे आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ पदरात पाडून घेणे हे पाकिस्तानचे धोरण चालत आले आहे.
भारताशी युद्ध केल्याने कितीतरी सैनिक प्राणास मुकतात, पाकिस्तानी जनतेचे महागाईने किती हाल होतात, पराभव झाल्याने जागतिक स्तरावर जी छी-थू होते याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नाही. त्यामुळे भारत आणि शेजारील इतर देशांनी खोलात जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. चर्चेच्या टेबलवर बसताना यापुढे भारताने वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या पराभवातही त्याचा काय फायदा झाला, याचा विचार करावा लागेल. कारण विजयी होऊनही चर्चेच्या वेळी स्वत:चे नुकसान करून घेण्याची भारताची परंपरा राहिली आहे. यापुढे असे वागून चालणार नाही. अन्यथा मानवतेच्या नावाखाली भारत आपली उदार भूमिका घेत राहिल्यास इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत राहील आणि पाकिस्तान कधीच बदलणार नाही.
फेब्रुवारी १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली आणि लाहोरसाठी बससेवा सुरू केली. त्याशिवाय आणखी चार बससेवा सुरू केल्या, त्या आजही सुरू आहेत. एप्रिल २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आणि इंदिरा गांधी यांच्या काळात श्रीनगर आणि मुजफ्फराबाददरम्यान कारवां ए अमन नावाने बससेवेस परवानगी देण्यात आली होती. २००६ मध्ये ताबा रेषा पार करण्यासाठी पूंछ आणि रावलकोटदरम्यान बससेवेस सुरुवात झाली. त्याच वर्षी गुरुनानक यांचे जन्मस्थान ननकाना साहिब ते भारतातील अमृतसरपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली.
याआधी १९७६ मध्ये सिमला करारांतर्गत समझौता एक्स्प्रेस सुरू केली होती. भारत-पाकिस्तानदरम्यानची ही पहिली रेल्वेसेवा होती. यानंतर तीस वर्षांनी म्हणजे २००६ मध्ये जोधपूर ते कराची थार एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. खर्च भारताने उचलला आणि त्याचा अधिक लाभ पाकिस्तानने करून घेतला. या सेवांमुळे आर्थिक आणि राजकीय हानी मात्र भारताच्याच वाटेस आली, याला इतिहास साक्षी आहे. या फायद्या-तोट्याचा एकूण लेखाजोखा सरकारने एकदा संसदेच्या पटलावर मांडला पाहिजे.
इतकेच नाही तर भारताने उत्साहाच्या भरात १९९६ मध्ये पाकिस्तानला मोस्ट फेव्हरेट नेशनचा दर्जा दिला. पाकिस्तानी नागरिक भारतात गुंतवणूक करू शकतील, अशी परवानगीही देण्यात आली. आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी संबंध वाढीस लागावेत यासाठी भारत सरकारने उदार भूमिका स्वीकारली. यासाठी सरकारने काय काय केले, किती तरतूद केली यावर एक स्वतंत्र अहवाल जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे. २००७ मध्ये भारताने तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसोबत गॅस वाहिनी टाकण्याचा करार केला. गेल्या वर्षी वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. भारताच्या खर्चाने टाकलेल्या या वाहिनीचा लाभ भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश उठवतील. भारत आणि पाकने मिळून ठरवले होते की, २००७ आणि २००८ मध्ये वाघा, अटारी, श्रीनगर, मुजफ्फराबाद, पूंछ आणि रावलकोटच्या रस्त्याने आणि मुनाबाव खोकरापारच्या रेल्वेमार्गाने २१ वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल; पण हे स्वप्न पूर्ण नाही झाले.
आपल्याला आठवत असेल की सात वर्षांपूर्वी महापूर आल्याने पाकिस्तानात हाहाकार माजला होता. त्या वेळी भारत सरकारने अडीच कोटी अमेरिकी डाॅलरची मदत केली होती. दोन्ही देशांत दरवर्षी कैद्यांची सूची दिली-घेतली जाते. कैदीच नाही तर मासेमारी करताना चुकून सीमा ओलांडणाऱ्यांचीही अदलाबदल होते. इतकेच नाही तर डाॅक्टर, पर्यटक, व्यापारी आदींना पारपत्र दिले जाते. परंतु या साऱ्या बाबींवर नजर टाकल्यास ध्यानात येते की भारतावर नेहमीच अन्याय होतो. भारत सहकार्यासाठी नेहमीच तत्पर असूनही पाकिस्तानची वृत्ती बदललेली नाही. संधी मिळेल तेव्हा पाठीत खंजीर खुपसायला तो मागेपुढे पाहत नाही. दूध पाजूनही दंश करण्याचे काम पाकिस्तान करत आला आहे. शेजारधर्माचे पालन करण्याचा सल्ला अटलजींनी पाकिस्तानला वारंवार दिला. त्यांचे म्हणणे होते की, “सर्व काही बदलता येते, शेजारी बदलता येत नाही.’ पण पाकिस्तानची भूमिका बदलली नाही.
बातम्या आणखी आहेत...