आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Muzaffar Hussain Article About Saudi Woman Voters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीत महिलांना मताधिकार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबिया हे नाव कानावर पडताच आपल्यासमोर काय चित्र उभे राहते? एक असा देश जो वाळवंटाने व्यापलेला आहे. तेथील राजा कट्टरतेसाठी जगप्रसिद्ध आहे. पण त्याच्याजवळ असलेल्या खनिज तेलाच्या मोठ्या साठ्यामुळे जगातील प्रत्येक देश त्याला मान देतो. तेथील राजा हा इस्लामी देशांचा शहेनशहा म्हणवला जातो. कारण सर्वात मोठे तीर्थस्थळ असलेल्या मक्का मदिनेचा तोच तर मालक आहे.

तेथे जमिनीची काही कमतरता नाही. परंतु, वाळूचा समुद्र असल्यामुळे शहरांच्या आसपासच थोडीफार हिरवळ दिसून येते. रस्त्यांवर महिला दिसत नाहीत. क्वचित दिसल्याच तर त्या वरपासून खालपर्यंत बुरख्यात लपेटलेल्या असतात. त्यांना कार चालवण्याचा अधिकार नाही. एका विशिष्ट वयापर्यंत मदरशात जाऊन शिक्षण घेण्यास त्यांना परवानगी आहे. महिलांवर जितकी काही बंधने असू शकतात ती सारी येथे पाहायला मिळतात. लोकशाहीची चिमणी तिथे चिवचिव करताना दिसत नाही. महिला शिक्षणाच्या नावे तिथे कोणतेही उपक्रम होताना दिसत नाहीत.

तेथील कट्टरपंथी राजाने महिलांना मतदानाचा अधिकार दिल्याचे काही दिवसांपूर्वी वाचनात आले. त्या देशात लोकशाहीच नाही तर या मताधिकाराचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होईल. राजेशाही असल्याने तेथे लोकशाही नाही, हे खरेच. पण तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मताधिकाराचा उपयोग नक्कीच होईल. मतदान हा शब्द सौदी अरेबियासारख्या अशा देशात ऐकायला मिळतोय जिथे एका छोट्या मुलीने शाळा तपासायला आलेल्या अधिकार्‍यांना ‘मी कवितेवर प्रेम करते’ असे सांगितले म्हणून तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. मुलीच्या तोंडून प्रेम शब्द बाहेर पडल्याने त्या मुलीला ही भयंकर शिक्षा भोगावी लागली. अशा देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळतोय. या सामाजिक बदलामुळे इस्लामी कट्टरवाद्यांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. आता मक्का मदिना, ताइफ आणि रियाध यांसारख्या मोठ्या शहरांच्या महापालिकांसाठी महिला पहिल्यांदाच मतदान करतील. हज यात्रा समाप्त होताच तेथे निवडणुका होतील.

सरकारने दिलेल्या जाहिरातीनुसार महिलांना मतदान करण्याचा अधिकार असेल, पण त्यांना निवडणुकीस उभे राहता येणार नाही. दैनिक सौदी गॅझेटचे म्हणणे आहे की महिलांना मिळालेला मताधिकार हा अपूर्ण विजय आहे. ज्या दिवशी महिला निवडणूक जिंकून महापौरपदी विराजमान होतील तेव्हाच महिलांचा खरा विजय होईल. सौदीतील महिलांना लोकशाहीची पहिली पायरी चढायला मिळत आहे, याबद्दल सौदीच्या बाहेर राहणार्‍या अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. बाहेरील देशांत राहणारे सौदी नागरिक आता सौदीतील राजेशाही जाऊन लोकशाही मार्गाने सरकार येईल, असे स्वप्न रंगवत आहेत.

अरबस्तानच्या वाळवंटात पूर्ण लोकशाही स्थापित होईल अथवा नाही, हे सांगणे आज तरी कठीण आहे. सोशल मीडियामुळे सौदीतील वृत्तपत्रांची संख्या वेगाने घटत असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. या आधारावर म्हणता येईल की सोशल मीडियात विचार आणि बातम्या पोहोचवण्याची मोठी शक्ती आहे. यात विचारधारा घडवण्याचीही शक्ती आहे. यातूनच सौदी अरेबियात हळूहळू विचारस्वातंत्र्य येऊ लागेल, अशी आशा आहे. शिक्षणाच्या बाबतीत सौदी मागासलेला आहे. या मागास देशात क्रांती झाली तर आपल्या हितसंबंधाला बाधा पोहोचेल, असा विचार करूनच अमेरिकेसारखे देश धोरणे आखतात, हा आजवरचा अनुभव आहे.

काही दिवसांपूर्वी सौदीतील अनेक ठिकाणी पंचायत आणि नगरपालिका स्तरावरील निवडणुका झाल्या. तेथील महिलांनी पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार वापरला. आजवर सौदी अरेबियातील महिला या राजकीय, सामाजिक आणि मानव अधिकारांपासून वंचित होत्या. त्यामुळे मताधिकार मिळणे म्हणजे अंधकारात प्रकाशाचा किरण येण्यासारखे आहे. कालपर्यंत जेथील महिला कार चालवू शकत नव्हत्या त्या आता शासन आणि प्रशासनात महत्त्वाच्या भागीदार बनतील, ही मोठीच क्रांती आहे. महिलांनी मतदार म्हणून नाव नोंदवणे सुरू केले आहे. त्या म्हणतात, ‘आम्ही केवळ मतदार बनणार नाही, उमेदवार बनून निवडणुकीतही उतरू.’ त्यांना हे वरदान स्वर्गीय राजा अब्दुल्ला यांनी २०११ मध्ये दिले. गेल्या दोन वर्षांतील संघर्षानंतर महिलांना हा अधिकार मिळाला. मागील शाह अब्दुल्लाह यांना तेथील तेथील जनता प्रगतिशील राजा म्हणून ओळखते. कारण मागील दोन वर्षांत महिला जगतामध्ये जे परिवर्तन झाले ते गेल्या हजार वर्षांत कधीही झाले नव्हते. त्यांच्या कार्यकाळापासूनच राजाचे शाही अधिकार कमी करण्यात येऊ लागले. क्रांतीचा वाहक बनलेल्या या राजाप्रती तेथील जनता आणि महिला सदैव ऋणी राहतील.
शाह अब्दुल्लाह यांनी आपल्या सल्लागार मंडळात महिलांना स्थान देण्यास सुरुवात केली होती. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांत महिला या पुरुषांपेक्षा चांगले काम करू शकतात, यावर त्यांचा विश्वास होता. २०१२ मध्ये लंडन येथे भरलेल्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेण्यास सौदीच्या महिलांना परवानगी मिळाली, हे एक आश्चर्यच होते. सौदी महिलांनी आपले शरीर डोक्यापासून पायापर्यंत बुरख्यात झाकूनच या स्पर्धेत भाग घेतला होता. आता सरकारी स्तरावर तेथील महिला कार चालवू शकतात. पण हे प्रमाण आजही खूप कमी आहे.

सौदी अरेबियामध्ये शरियत आणि सुन्नतचे राज्य आहे. त्यामुळे मुल्ला मौलवी हे सामान्यजनांना सुखाने जगू देत नाहीत. इस्लामी शरियतच्या विरुद्ध काहीही चालणार नाही, असा त्यांचा हेका असतो. तेथील जनतेची खरी लढाई ही कट्टरपंथी मुल्लांशी असते. सौदीच्या रस्त्यावरून एकटी महिला जाऊ शकत नाही. जायचे असेल तर सोबत सख्ख्या नात्यातील पुरुष असणे बंधनकारक असते. महिला कार चालवत असेल तर शेजारी तिचा सख्खा पुरुष नातेवाईक बसलेला असला पाहिजे. उलेमांचा फतवा हा कायद्याप्रमाणेच बंधनकारक असतो. महिलांनी हवे ते कपडे घालावेत; पण त्यावर डोक्यापासून पायापर्यंत झाकणारा बुरखा असलाच पाहिजे, अशी अट असते. नियमांचे पालन झाले नाही तर फटके मारले जातात. यातून कोणत्याही महिलेची सुटका नाही. दर शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर सार्वजनिक ठिकाणी दंड ठोठावला जातो. चाबकाचे फटके, शिरच्छेद आदी दंडांचा यात समावेश असतो. अशा मध्ययुगीन मानसिकतेच्या देेशात मतदानाचा अधिकार मिळणे चमत्कारच नाही काय?

मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार
m_hussain1945@yahoo.com