आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्कृतींमधील संघर्षाची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील जाणकार वाचकांमध्ये सॅम्युअल हटिंग्टन हे नाव सुपरिचित आहे. या महान अमेरिकी लेखकाने १९९६ मध्ये ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ नावाचे पुस्तक लिहिले. लेखकाच्या जीवनकाळातच या पुस्तकाचा बोलबाला झाला. २००८ मध्ये लेखकाचे निधन झाले, त्यानंतरही या पुस्तकाची चर्चा आणि औचित्य कमी झाले नाही. काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील नियतकालिकाच्या कार्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला. दहा पत्रकारांची हत्या केली. तेव्हापासून हटिंग्टन यांचे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. लेखकाचे म्हणणे आहे की, ‘संस्कृतींमध्ये संघर्ष होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात विनाश ठरलेला असतो आणि भविष्यात या जगाचा विनाश झालाच तर तो सभ्यतांमधील संघर्षातूनच होईल.'

मानवी जीवनाची शोकांतिका पाहा - या जगात आज आपण जे काही पाहत आहोत ते सर्व संस्कृतींच्या उत्कर्षातूनच निर्माण झालेले आहे; परंतु एक कटू सत्य हेही आहे की, जेव्हा एका संस्कृतीचा दुसर्‍या संस्कृतीशी संघर्ष झाला तेव्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विनाशच झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जगात वेळोवेळी पैगंबर आणि महापुरुष जन्मास आले आणि त्यातून हटिंग्टन यांनी सांगितलेल्या संस्कृतींचा उदय होत गेला. मानवता जिवंत राहील अशा सिद्धांतांची त्यांनी रचना केली; परंतु पाश्चात्त्य संस्कृतीनुसार या जगात सर्वप्रथम ईश्वराने आदम नामक व्यक्तीला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. आदमच्या छातीच्या हाडातून हौवाचा जन्म झाला. त्यांच्या हाबील आणि काबील या मुलांबद्दलही पश्चिमी धर्मग्रंथांतून वाचायला मिळते; परंतु या दोन भावांमध्ये संघर्ष झाला. काबीलने हाबीलला ठार केले. सर्वकाही या दोन भावांच्या हातात होते तरीही त्यांच्यात संघर्ष झाला. यातून असा अर्थ निघतो की, मानव सुरुवातीपासूनच संपत्तीसाठी भांडत आहे. त्यामुळे ती परंपरागत लढाई आज युद्धरूपात पाहायला मिळते.

मध्य पूर्वेतील इतिहासानुसार वेळोवेळी भिन्न भिन्न पैगंबर येत राहिले आणि त्यांनी माणसाला धर्माच्या माध्यमातून शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदम आणि नूह यांच्यानंतर अब्राहम साहेब महान होते. यांचे वंशजांच्या रूपात मोजेस (मुसा), जीजस (ख्रिश्चन) आणि मोहंमद (इस्लाम) प्रणेत्याच्या रूपात एकानंतर एक अवतरित झाले. ईश्वरीय दूतांकरवी आलेली पुस्तकेही मानव समाजाला मिळत राहिली. यामध्ये तोरेत, इंजील अर्थात बायबल आणि कुराण प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या पैगंबरांच्या अनुयायांमध्ये मात्र संघर्ष होत राहिला. हा संघर्ष सत्ता आणि जीवन निर्वाहासाठी अन्न व पाणी मिळवण्यावरून होत होता. या पैगंबरांच्या तीन मोठ्या धर्मांच्या अनुयायांमध्ये संघर्ष होत होता. सारी भूमी आपल्यालाच मिळावी आणि जीवनात आनंद यावा यासाठी चाललेल्या या संघर्षाला धर्मयुद्ध म्हटले गेले. पूर्वेकडील देशांतही आमच्या मोठ्या देवतांच्या रूपात पैगंबर अवतरित होत राहिले. यातूनच सनातन धर्म, बौद्ध, जैन आणि नंतर शीख धर्माचा उदय झाला. योगायोग म्हणजे या सर्व धर्मांचा उदय भारतभूमीत झाला. येथील भूमी धनधान्याने परिपूर्ण होती. त्यामुळे येथे संघर्षाचे कारणच नव्हते; परंतु जेव्हा मध्य पूर्वेतल्या लोकांनी भारत आणि उर्वरित आशिया, आफ्रिकेतील देशांना आपल्या आधीन करण्यासाठी तलवार उपसायला सुरुवात केली. यातून भयंकर संघर्षाला सुरुवात झाली.

पश्चिमेकडून आलेल्यांनी आपली गरज भागवण्यासाठी म्हणून युद्ध केले असते तर समजण्यासारखे होते; परंतु त्यांनी धर्माला आपल्या सत्तेचे माध्यम बनवले. त्यामुळे विचारधारांमधल्या या संघर्षाने रक्ताचे पाट वाहिले. जो शक्तिशाली तो अन्य देशांना जिंकून आपले साम्राज्य स्थापित करू लागला. यातूनच सर्व्हायव्हल आॅफ द फिटेस्ट हा सिद्धांत पुढे आला. या शर्यतीत ख्रिस्ती आणि मुसलमान खूप पुढे राहिले; परंतु भारताच्या भूमीत निर्माण झालेल्या धर्मांनी सत्तेसाठी नाही तर स्वकल्याणासोबतच समस्त मानवकल्याणासाठी पावले टाकली. यात सनातन धर्म आणि बुद्ध धर्म प्रमुख भूमिकेत राहिले. तुलनेने बुद्ध धर्म आणखी पुढे गेला. बुद्ध धर्माने आशियातील अनेक भागांवर विजय मिळवला, तलवारीने नाही तर शांततेच्या वचनांनी. मध्य पूर्वेतील धर्म भारतीय धर्मांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांच्यातही काही प्रमाणात बदल झाले. इस्लामसारख्या कट्टर पंथातही संत आणि सुफी पंथ विकसित झाले. थोडक्यात काय, तर पश्चिमी धर्म हे भौतिकताप्रधान आहेत, तर पूर्वतील धर्मांचा पाया अध्यात्म आहे.

आपल्या शक्तीच्या जोरावर ख्रिस्ती आणि मुसलमान संघर्ष करत राहिले. त्यांनी धर्मालाच पुढे केले. याला कधी क्रुसेड म्हटले, तर कधी जिहाद. लढाया होत राहिल्या. या सत्तास्पर्धेत ख्रिश्चन आणि मुसलमान वेगाने पुढे सरसावले तसे नव्या देशांना जिंकण्याची ईर्षा जागी होत गेली. त्यातून आशियाच्या मध्य पूर्वेत मुसलमानांची पकड घट्ट होत गेली. या दोघांनी यहुदी लोकांना दाबले. त्यामुळे यहुदी लोक जगाच्या सक्रिय राजकारणातून दूर झाले. याच मार्गाने मुसलमानांनी इराणातून पारसी लोकांना पराजित केले आणि तेथे वर्चस्व स्थापित केले. यहुदी हे हजरते मुसा यांचे वंशज होते. त्यामुळे त्यांनी वेळ येताच इस्रायलची स्थापना केली. या वेळी यहुदींना ख्रिस्ती देशांची मोठी मदत मिळाली. यातून मुसलमानांना रोखणे हाच हेतू होता; परंतु बिचार्‍या इराणी लोकांना अल्प लोकसंख्येमुळे इराणवर वर्चस्व राखता आले नाही. त्यामुळे आज पारसी धर्माला स्वत:चा ठावठिकाणा नाही.

पूर्वेत जन्मलेल्या सर्व धर्मांमध्ये अहिंसा आणि शांती या मूल्यांच्या आधारे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था होती. याउलट मुस्लिम आणि ख्रिस्ती संघटित राहायचे. संघटनेची ही शक्तीच पुढे जाऊन त्यांची सैन्यशक्ती बनली. त्यामुळे जगात लोकशाहीचे वारे वाहू लागले तेव्हा जगात सर्वात अधिक भूमी, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बाह्य साधनांवर त्यांचे वर्चस्व टिकून राहिले. सत्तेच्या भुकेने या दोन्ही धर्मावलंबीयांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढत राहिला. परिणाम म्हणून युद्ध होत राहिले. दोन्ही महायुद्ध ज्या देशांमध्ये झाले त्यामध्ये अधिकांश ख्रिस्ती देश होते. महायुद्धाच्या खाईत आशियाही ओढला गेला.
ख्रिस्ती देश आपसात भांडत राहिले; परंतु मुस्लिम पेट्रोलच्या बळावर शक्तिशाली होऊ लागले तेव्हा त्यांना टक्कर देण्यासाठी सारे एक बनले. यासाठी त्यांनी राष्ट्रसंघ आणि पोपच्या सत्तेचाही लाभ उठवला. आता जगात दहशतवादाने हैदोस घातला आहे तेव्हा सर्व ख्रिस्ती देश संघटित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा एकच उद्देश आहे मुस्लिम शक्तींना नेस्तनाबूत करून टाकणे. हाच तो केंद्रबिंदू आहे जेथून संस्कृतींमधील संघर्ष सुरू होतो. सध्या जिहादी अतिरेकी आशियासोबतच युरोपातील काही देशांमध्ये घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील काळात सारे ख्रिस्ती देश एका झेंड्याखाली आलेले दिसतील.

या पार्श्वभूमीवर हिंदू आणि बौद्ध यांच्याकडे पाहा. आज हे दोन्ही धर्म विश्वशांतीसाठी प्रयत्नरत आहेत. चीन हा भारताचा द्वेष करतो, पण त्याचा एक नंबरचा शत्रू तर जपान आहे. भारताची भूमिका अत्यंत तटस्थ आहे. तो वैज्ञानिक आधारावर बाॅम्बची निर्मितीही करत आहे आणि दुसरीकडे मंगळावरही पोहोचला आहे; परंतु भारताचे हे प्रयत्न केवळ स्वस्त ऊर्जा शोधण्यासाठी आहेत. निसर्गाची रहस्ये शोधून त्यांचा मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करता यावा यासाठीच अंतरिक्षातील झेप आहे. यावरून ध्यानात येते की सार्‍या जगात केवळ दक्षिण आशियाच सुरक्षित आहे. पाकिस्तानचा दहशतवाद हा यातील अडथळा आहे. पण पाकला ताळ्यावर कसे आणायचे हे भारताला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे संस्कृतींमधील संघर्ष हा ख्रिस्ती आणि मुस्लिम जगतातच होईल. हा संघर्ष इतका तीव्र असेल की यात ते देशही टिकणार नाहीत आणि त्यांची संस्कृतीही टिकणार नाही. यातून विनाशच होईल. भविष्यात महायुद्ध झालेच तर संस्कृतींमधील संघर्षातूनच होणार हे नक्की.
मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार
m_hussain1945@yahoo.com