आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, मुस्लिम आणि गाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम मानस- मुस्लिम मते खेचण्याची आहे रणनीती.
मोदी हे मुख्यमंत्री असताना आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात गोरक्षेचे समर्थन करताना थकत नव्हते. आतातीच गाय अडथळा कशी बनली? भावीलोकसभा निवडणुकीची ही नवी रणनीती असू शकते, पण बहुतांश मुसलमान हे गाेविरोधी नाहीत, याकडे कोणाचेच लक्ष नाही.

सन १९५२पासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाने गाेरक्षणाच्या मुद्द्यावर मतांचा जोगवा मागितला. सत्तेच्या नशेत ते आज गायीची अवहेलना करत आहेत. हिंदुत्वाचा जप करणाऱ्या पक्षाने गोरक्षणाच्या नावाखाली मते मागणे आणि नंतर सेक्युलॅरिझमचा आडोसा घेत यू टर्न घेणे हे दु:खदायी आहे. आपल्या कृषिप्रधान देशात गायीवरून राजकारण केव्हा आणि कसे सुरू झाले, हा या लेखाचा विषय नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षांविरुद्ध तीव्र आक्रोश आणि संताप व्यक्त केला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. मात्र, सेक्युलरवाद्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर गोभक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येऊ लागले. कोणी गोरक्षेच्या नावाखाली दलितांचा छळ करत असेल तर संबंधितांना कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, पण आपले राजकारण साधण्यासाठी कोणी सरसकट गोरक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असेल तर त्याचा वेगळा विचार करणे अपरिहार्य आहे. नव्या खेळीतून संभ्रम निर्माण करून मुस्लिम आणि सेक्युलरांचे लांगूलचालन करण्याच्या प्रयत्नात मोदीजी असावेत, असे दिसते. याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसे झाले तर सत्ता गमावण्याचीही पाळी येऊ शकते.

गोसमर्थकांवर संताप व्यक्त करून आणि प्रसंगी जेलमध्ये टाकून दलित मतांसह मुस्लिम मते खेचण्याची ही रणनीती आहे, परंतु त्यांना माहीत असले पाहिजे की भारतीय मुसलमानांनीही गोमातेची शक्ती आणि वरदान स्वीकारून तिची भक्ती केली आहे. यावर विश्वास बसत नसेल तर कोणत्याही उर्दू जाणणाऱ्याला मौलाना मोहम्मद इस्माईल (जे मेरठचे होते आणि त्यांची समाधी तेथे आजही आहे) यांच्याबद्दल विचारा. हमारी गाय ही त्यांची लोकप्रिय कविता तुम्हाला कोणीही सांगू शकेल. स्वातंत्र्यापूर्वी उर्दू प्राथमिक शाळांमध्ये ही कविता शिकवली जात असे. उर्दू मदरसा आणि शाळांमध्ये या कवितेचे सामूहिक गायन करण्याची परंपरा होती. हिंदी वाचकांना मोहम्मद खान पठाण रसखान यांची चांगली ओळख आहे. या कृष्णभक्त कवीची माहिती नाही, असा कोण बरे सापडेल? त्यामुळे सरसकट सारे मुस्लिम गोमातेचे विरोधक आहेत, हे खरे नाही. मोदी समर्थक भाजप नेते मुस्लिमांना गोविरोधी का ठरवताहेत?

मुस्लिम जर गोमांस खात असतील तर त्यामागचे कारण ते तुलनेने इतर मांसापेक्षा स्वस्त असणे आहे. तुम्ही गरिबांना स्वस्त मांस उपलब्ध केले तर ते कधीही गोहत्या करणार नाहीत. मुस्लिम हे गौचर आहेत. गायी पाळणारा मुस्लिम गोविरोधी असणे शक्यच नाही. समाजातील मोठ्या वर्गाच्या भावना दुखावणारा तो असता तर भारतात अनेक ठिकाणी मुस्लिम गोशाळा चालवताना दिसलेच नसते. देशभरात छोट्या मोठ्या गोशाळा चालवणाऱ्या मुस्लिमांची भलीमोठी यादी प्रस्तुत लेखकाकडे आहे. जोधपूर येथे मुस्लिमांकडून गोशाळा चालवली जाते. इतकेच नाही तर ग्रामीण भागात जाऊन आजारी गायींवर उपचार करण्यासाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवाही पुरवली जाते. जोधपूरजवळील एक अंजुमन ही सेवा देत आहे. त्यामुळे भारत सरकारने या सकारात्मक परिवर्तनाचीही दखल घेणे आवश्यक आहे.

अल्पसंख्यकांकडून चालवण्यात येणाऱ्या गोशाळांचा इतिहास पाहिल्यास देशातील अनेक भागांत हिंदू - मुस्लिम एकतेचे दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मुस्लिम मते पाहिजे असल्यास गोहत्या केलीच पाहिजे, असा विचार कोणी करत असेल तर ते चूक ठरेल. आपल्या देशातील सेक्युलरवादी आणि राजकारणी मंडळींनी आपल्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे. आपल्या देशातील राजकीय नेत्यांना माहिती असली पाहिजे की, देशात पशूंची संख्या जितकी अधिक असेल तितक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि चामडे उपलब्ध होईल. हाडांपासून अनेक वस्तू (बायप्राॅडक्ट) बनवले जातात. पेट्रोलनंतर सर्वाधिक बायप्राॅडक्ट हाडांपासून मिळतात. याचा संपूर्ण व्यवसाय मुस्लिमांच्या हातात आहे. मृत पशूंचा उपयोग करणारे सर्वाधिक कारखाने मुस्लिमांचे आहेत. यात खोजा हा समाज पुढे आहे. मृत पशूंच्या अनेक अवयवांपासून मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा प्राप्त होते. यात दलित आणि मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या विषयावर निव्वळ राजकारण करता या व्यवसायावर वैज्ञानिक संशोधन करून काही सकारात्मक दिशा दिली गेली पाहिजे. यावर कोणाला राजकारणच करायचे असेल त्यांनी मोदी आणि इतर नेत्यांप्रमाणे बांग द्यावी.

खरे तर मोदीजींसारख्या नेत्यांनी गुरे राखणाऱ्यांना भेटावे. त्यांचे डोळे नक्की उघडतील. गुरे राखणारी मंडळी आपल्या गायी, म्हशी, शेळ्या यांना आपल्या लेकीबाळींच्या नावाने हाक मारतात. सारा, बतूल आणि रबाब यासारखी नावे ठेवली जातात. थोडक्यात, भारतीय मुस्लिम हे गोविरोधी आहेत, असे जर कोणी म्हणत असेल तर तो एक भ्रम आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना रणनीती आखून हा भ्रम पसरवला. यावर अनेक पुरावे उपलब्ध आहेत. पुढे कधी तरी मी यावर विस्तृत लिहीनच. या ठिकाणी मोहम्मद इस्माईल साहेब यांची कविता खूप काही सांगून जाते. हमारी गाय या विश्वप्रसिद्ध कवितेत ते लिहितात, “रब का शुक्र अदा कर भाई, जिस ने हमारी गाय बनाई उस मालिक को क्यों पुकारे, जिस ने पिलाई दूध की धारे ।।’ ही कविता कोणीही वाचेल तर म्हणेल की भारताचे राष्ट्रगीत म्हणून या गीताला मान्यता मिळाली पाहिजे.
- लेखक राजकीय विश्लेषक आहे
m_hussian1945@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...