आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाती देशांत मंदी (मुजफ्फर हुसेन)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्टरवाद हा शब्द कानी पडताच डोळ्यांसमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर दाढी आणि हाती तलवार. यातून दहशतवादाला विशिष्ट धर्माशी जोडले जाते. परंतु, जगातील दोन्ही महायुद्धांच्या मुळाशी तर मुसलमान नव्हते. अणुबाॅम्ब किंवा हायड्रोजन बाॅम्बच्या निर्मितीशीही कोणा मुसलमानाचा संबंध नाही. जगातील विविध देशांवर राज्य करणारे शासक सर्वच धर्मांमध्ये होऊन गेले. पण मुस्लिमांनाच कट्टरतेशी का जोडले जाते? यामागे केवळ आणि केवळ खनिज तेलाचे राजकारण आहे.

आता खनिज तेलाचे साठे अनेक देशांमध्ये आढळले आहेत. एक काळ असा होता की, केवळ आखाती देशांमध्येच तेलाचे साठे उपलब्ध होते. आजही या देशांमध्ये हे काळे सोने मुबलक आहे. काळाच्या ओघात हा साठा कमी होत चालला आहे आणि ऊर्जेचे इतर पर्याय समोर येत आहेत. मध्ययुगीन काळात इस्लामच्या नावावर मुसलमानांनी अनेक देशांवर ताबा मिळवला. ते धर्माच्या बाबत अतिशय कडवे होते. इतकेच काय, तेथील वातावरणच इतके रुक्ष आहे की त्या वातावरणानेच त्यांना कडवे बनण्यास भाग पाडले. इस्लामच्या आधी जगातील दोन मोठ्या धर्मांचा जन्मही याच भूमीत झालेला. यहुदी आणि ख्रिश्चन यांच्यातही धार्मिक कडवेपणा होताच. कदाचित यामुळेच मुस्लिमांना कट्टरवादाकडे ढकलले गेले. धर्म प्रसार आणि प्रचाराला राजकारणाशी जोडून त्यांनी आपल्या साम्राज्याला एक अभेद्य किल्ल्याचे रूप दिले, इतकेच.
पुढे अनेक घटना अशा घडत गेल्या की त्यातून कट्टरता हा तेथील लोकांचा स्वभाव बनला. ते अधिक संघटित अन् कडवे बनले. खनिज तेलाचा साठा हाती लागल्याने स्वाभाविकच त्याचा त्यांना सर्वाधिक लाभ झाला. तेल साठ्यांवरील मुस्लिमांच्या मक्तेदारीवर हल्ला चढवण्यासाठी इतर देशांनी आणि तेथील सभ्यतांनी मुस्लिमांच्या सुरक्षिततेच्या भावनेला कट्टरतेचे लेबल लावून टाकले. आजच्या परिप्रेक्ष्यात बोलायचे तर खनिज तेलाला इस्लामशी जोडण्यात आले. आता तर असाही प्रचार सुरू आहे की, "खनिज तेल वाचले तरच इस्लाम वाचेल.’ उद्या समजा पर्यायी ऊर्जास्रोतांमुळे खनिज तेल कालबाह्य झाले तर त्याकडे कसे पाहिले जाईल?
खनिज तेलाचे साठे सापडण्यापूर्वी इस्लामवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की तो अधिक प्रभावी अन् लोकप्रिय होता. खनिज तेल नव्हते तेव्हाही इस्लाम आजच्यापेक्षा अधिक प्रसारित झालेला होता. त्यामुळे इस्लामसारख्या महान धर्माला खनिज तेलासारख्या वस्तूंशी जोडणे योग्य होणार नाही. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे जगभरातील खनिज तेलाची मागणी घटत आहे. तेलाची मागणी कमी झाल्याने तेलाच्या नावाने होणारे राजकारण समाप्त होणार काय, या मुद्द्यावर यानिमित्ताने चर्चा झडत आहेत.

एक गोष्ट तर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की आता ऊर्जेचे नवनवीन पर्याय समोर येत आहेत. ऊर्जेच्या प्रांतातील खनिज तेलाचा कालपर्यंत असलेला दबदबा आता राहिलेला नाही. तेलाचे साठेही संपत चालले आहेत. खनिज तेलाच्या तुलनेत अनेक स्वस्त पर्याय पुढे येत आहेत. खनिज तेलाच्या मर्यादित साठ्यांचा परिणाम तेलाच्या राजकारणावर होईलच. परंतु, यामुळे एखाद्या धर्माची मान्यता, तत्त्वज्ञान कालबाह्य होईल असे कसे म्हणता येईल? तेलामुळे निर्माण झालेल्या इस्लामी देशांच्या दबदब्याला घरघर लागेल हे मात्र नक्की.
उद्या खनिज तेल असणार नाही. त्यामुळे अरबस्तानातील मुस्लिम देशांनी तेल साठ्याच्या आधारे निर्माण केलेले आर्थिक साम्राज्य लगेच उद्ध्वस्त होईल असे नाही. परंतु, वर्तमानात तेलापासून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे. याचे परिणाम आज नाही तर उद्या त्या देशांत पाहण्यास मिळणारच. उत्पन्न कमी झाले की त्या देशांची मिजास आणि दादागिरी आपोआप कमी होईल.

सौदी अरब हा जगात सर्वाधिक तेल विकणारा देश आहे. तो रोज ११ दशलक्ष बॅरल तेलाची निर्यात करतो. २०१५ हे तेल विक्रीबाबत आखाती देशांच्या मक्तेदारीचे शेवटचे वर्ष ठरले. मध्य पूर्वेतील या देशांना खुश ठेवून सारे जग आपल्या तेलाची गरज भागवत होते. तसे पाहिले तर मध्य पूर्वेतील देशांची एकूण लोकसंख्या १७ कोटी आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटी. जगासमोर आखाती देशांची लोकसंख्या नगण्य आहे. पण तरी या देशाचा रुबाब तेलामुळे वाढला होता.
आज जमिनीतून सर्वाधिक तेल काढण्याची अत्याधुनिक यंत्रणा केवळ अमेरिकेकडे आहे. अमेरिकेतील जमिनीत मिळणारे तेल शेल आॅइल नावाने प्रसिद्ध आहे. बाजारात अधिक तेल आले तेव्हा बाजार कोसळणे स्वाभाविकच होते. तेल उत्पादक देशांत मोठी स्पर्धा आहे. सौदी अरब या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. आजवर इराणवर अनेक बंधने होती. ती हटवली गेल्याने जागतिक तेल बाजारात इराणनेही मोठी मजल मारली आहे. इराण रोज ५ लाख बॅरल तेल बाजारात आणत आहे. या साऱ्याचा परिणाम होऊन तेलाचे दर उतरले आहेत.

एकीकडे तेलाची मोठी आवक आहे आणि खप मात्र कमी. रशियातून काढण्यात येणाऱ्या तेलाचा खपही कमी झाला आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेत तेल उत्पादनाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेत मंदी येणे ठरलेलेच आहे. एकेकाळी सौदी अरब हा देश आपल्या तेलविक्रीवर अनुदान देत होता. आज त्या देशाने तेलविक्रीवर कर आकारण्यास सुरुवात केली आहे. आखाती देशांत मंदीची लाट आली आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मात्र अनुकूल परिणाम होताना दिसत आहे.