आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या दहशतीचे पडसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- मुस्लिम मानस - ताझिकिस्तानात नमाज, दाढी अन् बुरख्यावर बंदी आली.

ताझिकिस्तान सरकारने हजारो पुरुषांची दाढी काढली असून शेकडो महिलांचे बुरखे काढून घेतले आहेत. सरकारी आकड्यानुसार एकूण १३ हजार पुरुषांच्या चेहऱ्यावरील दाढी साफ केली आहे.

विसाव्या शतकात मध्य आशियातील ६ मुस्लिम देशांना रशियाने गिळंकृत केले. नंतर उदारीकरणाला सुरुवात झाली अन् रशियाने अर्मेनिया, अझरबैजान, उझबेकिस्तान, ताझिकिस्तान, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांना मुक्त केले. या देशांवर आपली साम्यवादी विचारधारा थोपवणे रशियाला शक्य झाले नाही. आज या देशांमध्ये अल बगदादीच्या दहशतीचे पडसाद उमटत आहेत. ही राष्ट्रे मुस्लिमबहुल असल्यामुळे आपण सहज ताबा मिळवू, असे दहशतवाद्यांना वाटत आहे. बगदादी आणि त्याचे हस्तक इस्लामला माध्यम बनवून तेथील युवकांना आपल्या सेनेत ओढत आहेत. त्यामुळे शेजारील इराण, अफगाणिस्तानातील सरकारेही भयभीत झाली आहेत. हे वारे आपल्या देशातही वाहू लागेल, अशी भीती त्यांना सतावत आहे. मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकार मिळवण्याच्या शर्यतीत इस्लामला माध्यम बनवून बगदादीचे हस्तक प्रत्येक देशात आधार शोधत आहेत. नवख्या तरुण-तरुणींना इस्लामच्या नावाखाली हवी ती लालूच दाखवून धडाक्यात भरती करण्यात येत आहे. यासाठी इस्लाममधील प्रतीकांचा वापर होत आहे. जगातील अनेक देशांत याची लागण झाली आहे. कालपर्यंत रशियाच्या छायेखाली असलेल्या देशांतील तरुणांपर्यंत पोहोचण्यात बगदादीचे अतिरेकी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे इस्लामच्या प्रतीकांवरच म्हणजे दाढी आणि बुरख्यावरच बंदी घालण्याचा निर्णय ताझिकिस्तानचे राष्ट्रपती इमाम अली रेहमान यांनी घेतला आहे.

ताझिकस्तान सरकार एवढ्यावरच थांबले नाही. हजारो पुरुषांची दाढी काढण्यात आली आहे. शेकडो महिलांचे बुरखे काढून घेतले आहेत. बुरखे विकणारी दुकाने सील केली आहेत. सरकारी आकड्यानुसार १३ हजार पुरुषांच्या चेहऱ्यावरील दाढी साफ केली आहे. खलतून शहराचे पोलिस अधीक्षक यांनी मीडियाला अनेक छायाचित्रे पुरवली आहेत. पूर्वी दाढी होती, आता चेहरा साफ आहे, असे त्या छायाचित्रांतून दिसते. सरकारचे म्हणणे आहे की, "इस्लामी ओळख दिसताच अतिरेक्यांना चेव चढतो. त्यामुळे ती प्रतीकेच संपवली तर प्रश्नच उरणार नाही. मुसलमानांची इस्लामी ओळख पाहूनच बगदादी उड्या मारतो. त्यामुळे ही प्रतीके नष्ट करण्यावाचून दुसरा पर्यायच नाही.’

गेल्या काही दिवसांत जवळपास दोन हजार तरुणांना इस्लामच्या नावाने भ्रमित करून अतिरेक्यांनी त्यांच्या सैन्यात भरती करून घेतल्याची अधिकृत आकडेवारी ताझिकिस्तान सरकारकडे आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी इस्लामच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर सरकारने बंदी घातली होती. राष्ट्रपती इमाम अली हे १९९४ पासून सत्तेवर आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, "धर्माचे बाह्य आवरण कट्टरतेला खतपाणी घालत असते. त्यामुळे सर्वात आधी त्यावर बंदी घालणे आवश्यक असते. येणारी पिढी या दूषणापासून मुक्त हवी असेल तर स्थानिक पुरुषांनी दाढी आणि महिलांनी बुरख्यापासून दूर राहिले पाहिजे.’
सरकार इतके सजग आहे तरीही बगदादीचे वारे देशात पोहोचलेच कसे, याचे राष्ट्रपती अली यांना खूप आश्चर्य वाटते. रशियापासून वेगळे झालेल्या या देशांतील सरकारे जाणून आहेत की धार्मिक कट्टरता ही एका वेगळ्या वातावरणातच जन्मास येते. त्यामुळे त्या वातावरणापासून जनतेला दूर ठेवले पाहिजे, असे त्यांना वाटते. इतके सजग राहूनही जिहादी प्रवृत्ती ठेचता आली नाही याचे त्यांना खूप दु:ख आहे. तेथे बुरख्यावर बंदी आहे. इतकेच नाही, तर महिलांना हज यात्रा करण्यासही बंदी आहे. इतकेच काय, जन्मास येणाऱ्या बाळांची नावे अरबी धाटणीची ठेवायलाही बंदी आहे.

बगदादीछाप कट्टरवादाचे परिणाम ताझिकिस्तान सरकारला चांगले माहीत आहेत. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या शिरकावाने भयभीत झालेल्या सरकारने १८ वर्षांखालील मुलांच्या नमाजावरही बंदी घालण्याची तयारी केली आहे; पण तेथील अरबी वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीशिवाय ही समस्या दूर होणार नाही. दाढी काढली नाही म्हणून अटकेत गेलेल्या जावेद अक्रम या नागरिकाला सरकारचे धोरण चुकीचे वाटते. "देशात मागासलेपण आहे. बगदादीची भीती दाखवत लोकांना जास्त काळ मूर्ख बनवता येणार नाही. आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती केली तर दहशतवाद आपोआप पळून जाईल,’ असे अक्रमचे म्हणणे आहे. "इस्लाममुळे कोणी अतिरेकी बनतो किंवा नाही, हे माहीत नाही. पण ताझिकिस्तानचे पोलिस ज्या प्रकारे कारवाई करत आहेत, त्यातून लोकांना अतिरेकी बनण्याची प्रेरणा मिळणार हे नक्की,’ असा संताप अक्रमने व्यक्त केला.

अशा घटना घडत असताना सोशल मीडिया सक्रिय न झाला तरच नवल. दाढी आणि बुरखा काढल्याची छायाचित्रे पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. अशा उपद्व्यापामुळेच लोक बगदादीची बाजू घेत आहेत, असा सूर आळवण्यात येत आहे. मूळ गुन्हेगारांना सोडून जनतेला त्रास दिल्यास लोक विद्रोही होणारच. सरकार सेक्युलर दहशतवाद माजवत आहे, असेही काहींनी म्हटले आहे. कितीही विरोध झाला तरी ताझिकिस्तान सरकार मागे हटण्याची बिलकूल शक्यता दिसत नाही. ताझिकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, “वेळीच जनतेला सजग केले पाहिजे. दहशतवादापासून लोकांना वाचवणे सरकारचा धर्म आहे. चेहऱ्यावर उगवलेले केस आणि डोक्यापासून पायापर्यंत काळ्या कपड्यात झाकलेली महिला म्हणजेच इस्लाम असे बगदादीला वाटत असेल तर इस्लामच्या नावाखाली चालणारा हा अपराध होय. धर्माची ओळख बाह्य आवरण नाही. धर्म ही मन आणि हृदयाला स्पर्श करणारी बाब आहे.’’

कट्टरवाद्यांनी इस्लामला फक्त दाढी आणि बुरख्यापर्यंतच मर्यादित करून टाकले आहे, हे वास्तव आहे. इस्लाम मारण्याचे नाही तर जीवन देण्याचे नाव आहे. इस्लामची ओळख बाह्य नाही, तर आंतरिक आहे, जिथे पाक परवरदिगारचा निवास असतो. धार्मिक कट्टरवाद हा काही माथेफिरूंच्या हातातील शस्त्र झाला आहे. जोवर इस्लामी जगत याचा त्याग करणार नाही तोवर मुसलमान आणि जगातील इतर माणसं सुरक्षित राहणार नाहीत.
m_hussian1945@yahoo.com