आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी आवाज ही पहचान है...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांचा आवाज ऐकून क्षणभर काळही थबकतो... आणि स्वर्गीय अनुभूतीच्या स्वरांगणाभोवती रुंजी घालतो, त्या स्वराचे नावच लता मंगेशकर! ज्या अलौकिक आवाजाने विश्वाला मोहिनी घातली आणि सिद्ध केले... ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है!’ 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर, मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या लताजींनी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे कवी प्रदीप यांचे गीत प्रभावी गायनाने अजरामर केले आहे. हे गीत भारत-चीन युद्धाच्या वेळी तमाम भारतीय सैनिकांना आणि भारतीय नागरिकांना प्रेरणादायी ठरले; आजही हे गीत प्रेरणेची मशाल आहे.


लतादीदींची गानकीर्ती भारतापुरती मर्यादित न राहता जगभर पसरली, ती त्यांच्या स्वरमाधुर्यामुळे व अप्रतिम स्वरांगणामुळे...! लता मंगेशकरांनी पहिले पार्श्वगायन केले ते 1942 मध्ये ‘किती हसाल’ या चित्रपटासाठी. संगीतकार होते सदाशिव नेवरेकर. मास्टर दीनानाथ मंगेशकर हेच लताजींचे पहिले गुरू. ते सांगलीतील बळवंत संगीत मंडळीत संघर्षमय स्थितीत गायनकलेची सेवा करीत होते. उस्ताद अमानत अली खाँ, भेंडीबाजारवाले, पंडित तुलसीदास वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लताजींनी हिंदुस्थानी गायनशैली आत्मसात केली. कालांतराने मास्टर दीनानाथ मंगेशकर दु:खद परिस्थितीत कालवश झाले, पण त्यांनी कुटुंबीयांना गायनकलेचा अपूर्व वारसा दिला होता. बिकट परिस्थितीतही लताजींनी गाणे हेच जीवन मानले. या गायन-संगीत साधनेची भरभराट लतादीदी, आशाताई, उषाताई, मीना खळीकर आणि पं. हृदयनाथांनी केली. हिंदुस्थानी गायनशैलीस लताजींच्या स्वरमाधुर्याने आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या संगीत साधनेने जगभर कीर्ती मिळाली.


हिंदुस्थानी संगीतातील भारतीय भाषांतील लता मंगेशकरांनी गायिलेल्या गीतांची लोकप्रियता व कीर्ती सातासमुद्रापार पसरली. चलचित्रांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता कमी होत गेली. चित्रपटांचे युग अवतरले. लताजींनी अगदी सुरुवातीच्या काळात चित्रपटांतून भूमिकाही केल्या. 1942 ते 1969 या लतादीदींनी ‘पहिली मंगळागौर’, ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’, ‘गजाभाऊ’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘बडी माँ’, ‘जीवन यात्रा’, ‘सुभद्रा’, ‘मंदिर’ अशा अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. ‘आनंदघन’ या टोपणनावाने संगीत दिग्दर्शन केले. ‘मोहित्यांची मंजुळा’ (1963), ‘मराठा तितुका मेळवावा’ (1964), ‘साधी माणसं’ (1965), ‘तांबडी माती’ (1969) या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन लताजींनी केले. तसेच त्यांनी 1953 मध्ये ‘वादळ’ आणि 1988 मध्ये ‘लेकिन’ या चित्रपटांची निर्मिती केली. लतादीदींच्या सुरुवातीच्या काळात नूरजहाँ या नायिकेचा व गायिकेच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली) त्या काळी चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या गायिका होत्या. एकलव्याप्रमाणे लता मंगेशकरांनी स्वरसाधना केली. आवाजातील शुद्धता, माधुर्य आणि सुयोग स्वर उच्चारणावर अधिक भर दिला. यामुळेच एका महान गायिकेचे सुवर्णयुग आले.


इंदूरच्या वास्तव्यात पं. कुमार गंधर्वांनी लतादीदींचे गायन ऐकले आणि ‘एक अद्वितीय स्वर चमत्काराचा आविष्कार’ या शब्दांनी लता मंगेशकरांचा गौरव केला. त्यानंतर लतादीदींनी सुरेल पिक्चर म्हणून चित्रपट कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे कॅमेरामन वसंत शिंदे लतादीदींबद्दल सांगतात, ‘सहका-यांची काळजी घेणा-या लता मंगेशकर, त्यांच्या कुटुंबवत्सल स्वभावामुळेच सर्वांच्या लतादीदी झाल्या!’ अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटांसाठी शेकडो गीते त्यांनी रसिकप्रिय केली. भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते व चित्रपटगीतांनी देश-विदेशात लोकप्रियतेचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. किशोरकुमार, मोहंमद रफी, मन्ना डे, मुकेश, शैलेंद्रसिंग, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, भूपेंद्र, जगजितसिंग या आघाडीच्या गायकांच्या सोबतची द्वंद्वगीते रसिकांच्या ओठी सतत फुलत असतात.
शंकर- जयकिशन, नौशाद, एस.डी. व आर. डी. बर्मन, सी. रामचंद्र, खय्याम, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, मदन मोहन, सलील चौधरी, लक्ष्मीकांत- प्यारेलाल, राम-लक्ष्मण या दिग्गज संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली अनेक चित्रपट गाणी अजरामर झाली, तसेच त्यांची चित्रपटबाह्य गीते, भजने, गझला लोकप्रिय झाल्या आहेत.


कविवर्य ना. धों. महानोर, सुरेश भट, शांताबाई शेळके या बिनीच्या मराठी गीतकारांची गाणी लताबार्इंच्या स्वरांगणाने अविस्मरणीय ठरली आहेत. मृदुल, तरल कवितांच्या कवयित्री स्व. शांताबाई शेळके आणि लता मंगेशकरांचे संबंध खूपच जिव्हाळ्याचे होते. शांताबार्इंनी लतादीदींबद्दल लिहून ठेवले आहे - ‘लताबाई या माझ्या आवडत्या संगीतकार, नुसत्या संगीतकारच नव्हेत, तर इतरही ब-याच काही. त्यांच्याबरोबर काम करणे हा एक प्रसन्न अनुभव एक आनंदोत्सव असतो! ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटाची गाणी मी त्यांच्यासोबत करीत होते, तो काळ इतका सुखात गेला की त्याचे स्मरण ही मनात हुरहूर जागी करते. प्रारंभी मला त्यांची भीती वाटे, पण त्यांनी अतिशय सौजन्याने मला वागवले आणि माझ्या मनावर कसलाही ताण येऊ न देता माझ्याकडून सहजपणे गाणी लिहून घेतली. त्यांच्या चालींना खास मराठीपण असते. तसेच पारंपरिक गोडव्याने त्या नटलेल्या असतात!’ कवी ग्रेस यांच्या कवितांनीही लतादीदींना भुरळ घातली. आजवर लता मंगेशकरांना विविध सन्मान देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यांना 2001 मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्या राज्यसभेच्या खासदारही होत्या.


त्यांच्या लोकप्रिय गाण्यांची यादी करणे हे जगातील अवघड काम आहे. ‘आग’, ‘आह’, श्री 420’, ‘चोरी चोरी’, ‘मधुमती’ या हिंदी चित्रपटातील लता मंगेशकरांची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. तरीही ‘मेरे नैना सावन भादो’(मेहबूबा), ‘इस मोड से जाते हैं’(आँधी), ‘आँखों में हमने आपके सपने सजाये हैं’(थोडीसी बेवफाई), ‘नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा’(किनारा), ‘आपकी आँखों में कुछ महके हुए से राज हैं’(घर), ‘आ लौट के आजा मेरे मीत’(रानी रूपमती), ‘मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी कभी’(आँखें), ‘रैना बीती जाये’(अमरप्रेम), तर मराठीत ‘मालवून टाक दीप’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘मोगरा फुलला’, ‘ये रे घना ये रे घना’, ‘चांद मातला मातला’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘गगन सदन तेजोमय’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘मी सोडुनी सारी लाज’, ‘विसरू नको श्रीरामा मला...’ अशी एक ना अनेक शेकडो गाणी लता मंगेशकर नाव उच्चारताच रसिकांच्या ओठांवर दरवळतात! विश्वरत्न स्वरलतेस अगणित सलाम!