आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagesh Kesari Article About Karnataka Politics, Divya Marathi

कर्नाटक..! इतिहास बदलणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेत राजकीय चित्र नेहमीच भिन्न असते. संपूर्ण देशात एका पक्षाची लाट असेल, तर कर्नाटकमध्ये सातत्याने वेगळी भूमिका घेतली जाते. कर्नाटकात लिंगायत, वक्कलिगा, ब्राह्मण, मुस्लिम यांसह अठरापगड जातीचे लोक आहेत. राजकारणात लिंगायत, वक्कलिगा व ब्राह्मणांचा प्रभाव आहे. दलित मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचेही प्रमाण बर्‍यापैकी आहे. त्यामुळे या भागात प्रत्येक वेळी वेगळे समीकरण तयार होते. 1977 मध्ये आणीबाणी संपल्यानंतर जनता दलाची लाट आली, त्याचा येथे परिणाम झाला नाही. त्या वेळी काँग्रेसची सत्ता तेथे राहिली, काँग्रेसमध्येही फाटाफूट झाली, पुढे भारतात इंदिरा लाट आली आणि कर्नाटकात जनता दलाची लाट आली, असे उलटेसुलटे गणित या राज्यात झाले आहे. प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्येही फाटाफूट झाली, तेव्हा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे विभाजन झाले आणि इंडिकेट-सिंडिकेट काँग्रेस निर्माण झाली. या काळात एस. निजलिंगप्पा हे एक मान्यवर नेते म्हणून राहिलेत. काँग्रेसच्या आर्थिक धोरणाचा पायाही इंदिरा गांधींनी कर्नाटकात वेगळ्या पद्धतीने रोवला होता, म्हणजेच बंगळुरू येथे झालेले पक्षाचे महाअधिवेशन ही चिरंतन लक्षात राहणारी बाब आहे. त्यामुळे ही राज्ये नजरेआड करून भागत नाही.

या राज्यातील राजकीय बदल हे भिन्न पद्धतीने होत असतात. आताही भाजपने दक्षिण दिग्विजय म्हणून कर्नाटकाचे कौतुक केले. रा. स्व. संघाच्या मुशीत असलेल्या बी. एस. येदियुरप्पांनी त्या राज्यात भाजपला निर्विवाद बहुमत प्राप्त करून कर्नाटकात सत्ता स्थापन केली. देशभर त्यांचे कौतुक झाले, पक्षाची व त्यांच्या नावाची दवंडी पिटवली गेली आणि त्याच येदियुरप्पांनी पक्षाला सत्तेबाहेर केले. आज महाराष्ट्रात अशोक चव्हाणांवर टीका होत असताना याच येदियुरप्पांना पुन्हा पक्षात घेऊन पावन करण्यात आले. या अगोदर त्यांच्यावरील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे येदियुरप्पा यांनी पक्षांतर केले होते, आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता व विधानसभा निवडणूक लढवली, त्यांच्या या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार आले. या निवडणुकीत येदियुरप्पा यांना फारच कमी जागा मिळाल्या. भाजपचेही यामुळे नुकसान झाले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला बर्‍यापैकी जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे भाजपने आता कर्नाटकात प्रवेश केला आहे, तो असाच कायम राहणार आहे. आंध्र प्रदेश आणि अन्य भागात आम्ही जाऊ अशी खात्री देणार्‍यांना येदियुरप्पा यांनी तोंडघशी पाडले आणि मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे नुकसान झाले.

येदियुरप्पा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोपपत्रही ठेवले गेले. न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. महाराष्ट्रात अशोक चव्हाणांवर आदर्शप्रकरणी चौकशी झाली. न्यायालयातही हे प्रकरण आहे, पण चव्हाणांनी पक्ष सोडला नाही, पक्षावर आरोप केले नाहीत आणि कोणत्याही प्रकारची पक्षशिस्त धुडकावली नाही आणि न्यायालयानेही त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली नाही.

कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर) यांचा प्रभाव आहे. 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत एच.डी. देवेगौडा पंतप्रधान झाले होते. कर्नाटकात जनता दलाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यावेळी त्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान झाले. कर्नाटकात जनता दलाची लाट ही आली, अवघी दीड-दोन वर्षे ते पंतप्रधान राहिले आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले. 1977 नंतर केंद्रात या पक्षाचे सरकार आले होते. त्यापूर्वी विश्वनाथ प्रतापसिंह, चंद्रशेखर यांनीही राज्य केले, ती परिस्थिती भिन्न होती. हे दोघेही राष्ट्रीय नेते होते, उत्तर भारतातील होते. देवेगौडा यांच्याबाबतची परिस्थिती भिन्न होती. त्यामुळे 1996 मध्ये मिळालेले यश हे लक्षात राहणारे ठरले, आताही या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत देवेगौडा यांच्या पक्षाने बर्‍यापैकी जागा मिळविल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा पक्ष दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला त्यांच्यात आणि भाजपमध्ये कमी अंतर होते. हा सगळा इतिहास पाहिला म्हणजे कर्नाटकात आताच्या लोकसभा निवडणुकीचे निश्चित चित्र कसे उभे राहील हे सांगणे तेवढे शक्य नाही. पण आज तरी या राज्यात भाजपची लाट आली आहे, अशी परिस्थिती नाही.

येदियुरप्पा, रेड्डी बंधू आणि तत्कालीन सर्व राजकीय घटनांचा मागोवा घेतला तर अद्याप तरी या राज्यातील भाजपच्या बाजूने उत्तम परिस्थिती निर्माण झाली आहे असे म्हणता येणार नाही, पण हा पक्ष रसातळाला गेला आहे, असेही म्हणता येणार नाही. जातीपातीच्या राजकारणाचा विचार करता या राज्यातील स्थिती समसमान राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीवर अनेक गोष्टी संभवतात. या राज्यात दलितांचे प्रमाण बर्‍यापैकी असल्याने काँग्रेसने दलित नेतृत्वाला साथ दिल्यामुळे निकालही भिन्न येऊ शकतात. तिकीट वाटपात सर्वच पक्ष जातीपातीचा विचार करून उमेदवारी देतो. त्यामुळे या सगळ्याचे गणित त्या त्या मतदारसंघातील त्यांची क्षमता, डावपेच या सर्वाची मांडणी पक्षाने केली आहे. आंध्रमध्ये दोन राज्ये झाल्यामुळे तेथे राष्ट्रीय पक्ष चाचपडत आहेत. प्रादेशिक पक्ष आपल्या अस्मितेप्रमाणे मांडणी करत आहेत. त्यामुळे त्या राज्यावर सध्यातरी राष्ट्रीय पक्षाचे लक्ष केंद्रित झालेले नाही. तामिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना गेल्या चार पाच दशकापासून स्थानच नाही. पण आता राहिला तो कर्नाटक, या राज्यात काँग्रेस, जनता दल (सेक्युलर), भाजप आणि काही प्रमाणात आप यांचे प्राबल्य आहे. आप हा पक्ष नवा आहे काही बुद्धिवंतांनी या पक्षात प्रवेश केल्याने या पक्षाला या राज्यात थोडी बहुत भूमिका घेता येण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु खरी लढाई काँग्रेस, भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यामध्ये होणार आहे.

कर्नाटकाची स्वतंत्र प्रतिमा आहे. देवराज अर्स 1977 नंतर मुख्यमंत्री होते. त्यांनी आपली स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. राष्ट्रीय राजकारणात बदल होत असताना त्याचे परिणाम या राज्यावर झाले. गुंडूराव मुख्यमंत्री झाले, रामकृष्ण हेगडेही मुख्यमंत्री झाले त्यांनी एक वेगळी प्रतिमा कर्नाटकात निर्माण केली. या राज्याला वैचारिक स्थान आहे, बंगळुरू ही जरी कर्नाटकची राजधानी असली तरीही राष्ट्रीय पातळीवर त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, येथील राजकीय हवामानही चांगले आहे व राजकीय दृष्ट्या याचे प्रयोगही चांगले झाले आहेत. काँग्रेसमधील फूट, जनता पक्षातील फूट, जनता दल (सेक्युलर) मधील फूट, भाजपमधील फूट या सगळ्याच्या फुटीचा परिणाम केवळ राज्यात नाही तर देशात झाला आणि त्यातून नवे संदेशही गेले. या राज्यातून इंदिरा गांधीनीही निवडणूक लढविली होती, सोनिया गांधीनीही निवडणूक लढविली होती. विश्वनाथ प्रतापसिंग यांनी जनता दलात नवे चैतन्य येथे निर्माण केले, रामकृष्ण हेगडे यांनी पक्षाची प्रतिमा उंचावली. भाजपच्या येदियुरप्पानी प्रारंभीचा काळ गाजवला.

वैचारिक भिन्नता असलेले दोन पक्ष, जनता दल (सेक्युलर) व भाजपने संयुक्त सरकार स्थापन केले, पित्यांविरुद्ध चिरंजीवाने पक्षात बंड केले (देवेगौडा व कुमारस्वामी पितापुत्र) त्यांचे बंड वेगळ्या अर्थाने गाजले, पक्ष फुटल्याचे दर्शविले गेले, भाजपला उपमुख्यमंत्री पद दिले आणि राजकीय कराराप्रमाणे नंतरची टर्म (पाळी) भाजपला देण्यास कुमारस्वामींनी विरोध केला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार सत्तेवर आले. असा हा सगळा इतिहास पाहिला म्हणजे या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तरेच्या लाटेचा प्रभाव दक्षिणेत पडेल याची शाश्वती देता येत नाही. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळातील सिद्धरामय्या पक्षातून फुटले होते आणि त्यांनी पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची स्वच्छ चारित्र्यवान प्रतिमा आहे. राज्यात कार्यक्षम मंत्री म्हणूनही ते नावाजलेले आहेत. भाजपचे सरकार असताना ते विरोधी पक्षात नेते होते. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला हैराण केले. रेड्डी बंधूचे खाण प्रकरण, देवेगौडांचा पाठिंबा, त्यानंतर झालेले राजकारण आणि भाजपचे नेते जगदीश शेट्टर हे मुख्यमंत्री होणे. या सगळ्याचा व्यवस्थित विचार केला म्हणजे हे राज्य निश्चित कोणा एकाकडे झुकेलच याची खात्री देता येत नाही.