आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिनाभरातले मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी यांचे सर्वात ठळक जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानपद मिळणे हे त्यांच्यासाठी अंतिम ध्येय नव्हते आणि नाही. ती त्यांच्यासाठी एक सुरुवात आहे. त्यांना देशात जे काही घडवून आणायचे आहे त्यासाठी पंतप्रधानपद हे एक साधन आहे, याची स्पष्ट जाणीव मोदी यांच्यात आहे. किंबहुना पदावर आल्यावर काय करायचे याचा एक निश्चित आराखडा त्यांच्या डोक्यात आहे.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी येऊन आता एक महिना होत आहे. या एका महिन्याच्या काळात मोदी यांच्या नेतृत्वाची आणि व्यक्तित्वाची काही वैशिष्ट्ये दिसून आली. ती नोंदणे उद्बोधक ठरावे. या नोंदी म्हणजे निरीक्षणे आहेत. त्यांच्यावर किंवा त्यांच्या सरकारबाबतची टीकाटिप्पणी नव्हे, हे लक्षात ठेवायला हवे.

मोदी यांचे सर्वात ठळक जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानपद मिळणे हे त्यांच्यासाठी अंतिम ध्येय नव्हते आणि नाही. ती त्यांच्यासाठी एक सुरुवात आहे. त्यांना देशात जे काही घडवून आणायचे आहे त्यासाठी पंतप्रधानपद हे एक साधन आहे, याची स्पष्ट जाणीव मोदी यांच्यात आहे. किंबहुना पदावर आल्यावर काय करायचे याचा एक निश्चित आराखडा त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे इतके अभूतपूर्व यश मिळवून पद खेचून आणल्यानंतरही मोदी यांनी आपला धीरगंभीरपणा सोडलेला नाही. इतकी मोठी कामगिरी पार पाडल्यानंतर वागण्या-बोलण्यात सैलावलेपणा वा खेळकरपणा येणे स्वाभाविक असते. पण मोदींच्या बाबतीत ते घडलेले नाही.
इथे काही उदाहरणे देऊनच बोलता येईल. अशी कल्पना करा की यंदाच्या निवडणुकांनंतर समजा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे पंतप्रधान झाले असते तर काय झाले असते? पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र पंतप्रधान झाला म्हणून महिनाभरच नव्हे, तर पुढची पाच वर्षे कौतुकाच्या नद्याच नद्या महाराष्ट्रात वाहत राहिल्या असत्या. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांचे जेवढे म्हणून शक्य आहेत तितक्या लोकांनी आणि संस्थांनी महाराष्ट्रात जागोजागी सत्कार केले असते. शिंद्यांनीही सर्वत्र हजेरी लावून हास्यविनोदाचे फवारे उडवले असते. सोलापूर जिल्ह्यातल्या बुद्रुक ग्रामपंचायतींच्या सरपंचांपासून ते पत्रकार संघांच्या अध्यक्षांपर्यंत ज्याला शक्य आहे तो दिल्लीत जाऊन शिंद्यांना भेटला असता. मग पंतप्रधान होऊनही शिंदे कसे आत्मीयतेने वागवतात याच्या कहाण्या पुढे कित्येक वर्षे अनेकांनी सांगितल्या असत्या.
शिंदे यांच्या जागी शरद पवार असते तरीही थोड्या फार फरकाने हेच झाले असते. फार काय, खुद्द भाजपचे नितीन गडकरी असते तरीही हे असेच घडले असते. भाजपमध्ये मोदी यांच्याऐवजी सुषमा स्वराज किंवा राजनाथसिंह किंवा अगदी लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान झाले असते तरीही वेगळ्या रीतीने हाच प्रकार घडला असता. मोदी यांच्या बाबतीत मात्र असे प्रकार घडताना दिसत नाहीत. हे यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक लोकप्रिय नेते असले तरी लोकांना सहजी उपलब्ध असलेले नेते नाहीत. तसे त्यांना व्हायचेदेखील नाही. (सहज जाता जाता.. मोदी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार करणार्‍यांमध्ये बहुसंख्य मराठी लोक होते. मोदी यांच्या जागी दुसरा कोणी नेता असता तर त्यांनी या आपल्या गुरूंबद्दल भावपूर्ण भाषणे करून आणि आपल्या मराठी कनेक्शनचा उल्लेख करून महाराष्ट्रात जागोजागी टाळ्या मिळवल्या असत्या. मोदी यांनी आजवर एकदाही तसे केलेले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.)

पंतप्रधानपद हे एक असाध्य शिखर आहे आणि तिथे येऊन पोहोचलो यातच कृतकृत्य झालो, अशी भावना या सर्व नेतेमंडळींमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अगदी पत्रकारांमध्येही दिसली असती. मोदी यांनी शपथ घेतली त्या दिवशी त्यांच्याबाबतही ही भावना दिसली. पण मोदी यांनी अक्षरश: दुसर्‍या दिवसापासून ती भावना पुसून टाकली आहे. पंतप्रधान तर मी होणारच होतो, पण आता पंतप्रधान म्हणून मला अमुक एक छाप टाकायची आहे, असा निर्धार आता त्यांच्या वागण्यातून दिसतो आहे.

याचा एक परिणाम म्हणजे मोदी यांनी सत्तेची बरीचशी सूत्रे आपल्या हाती राहतील याचे बेधडक संकेत द्यायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, आपले खासगी सचिव (आयएएस) म्हणून कोणाला नेमावे यासारख्या गोष्टींचे स्वातंत्र्यही त्यांनी आपल्या मंत्र्यांना ठेवलेले नाही. राजनाथसिंह वगैरेंसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी नेमलेले सचिव हे पूर्वीच्या काँग्रेसी मंत्र्यांकडे काम करीत होते या कारणावरून अपात्र ठरवण्यात आले आहेत. मंत्र्यांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात करावी अशासारख्या सूचनाही केल्या गेल्याचे जाणकार लोक सांगतात. त्यामुळे दुपारी उशिरा उठून रात्री उशिरापर्यंत कामे करणार्‍या बहुतेक सर्वच मंत्र्यांचे वांधे झाले आहे, अशा बातम्या आल्या आहेत. थोडक्यात, केंद्र सरकार म्हणून जे जे काही आहे त्यावर आपली छाप असावी, असा मोदी यांचा कटाक्ष दिसतो. जो आपल्या आजवरच्या मोकळ्याचाकळ्या, ढिल्याढाल्या आणि बेरजेच्या राजकीय संकेतांहून वेगळा आहे.

बहुतांश निर्णय स्वत:च घ्यावेत आणि नंतर ते धडाक्याने रेटून न्यावेत, अशी मोदी यांची कार्यशैली राहील, असेही संकेत या महिनाभरात मिळाले आहेत. उदाहरणार्थ, शपथविधीला पाकिस्तानसह अनेक राष्ट्रप्रमुखांना बोलावण्याचा निर्णय घेताना मोदी यांनी पक्षातील इतर कोणाही नेत्यांशी चर्चा केली नव्हती असे जाणकारांचे म्हणणे आहे. नंतरही राष्ट्रप्रमुखांशी चर्चा किंवा भूतानचा दौरा किंवा आगामी अमेरिका दौरा यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काहीच विशेष भूमिका आहे, असे दिसले नाही-दिसत नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्या असतात. संबंधित खात्यांचे मंत्री त्यांचे सदस्य असतात. परंतु तिथेही मोदी यांनी आपले आग्रह स्पष्टपणे दाखवून दिले आहेत. उदाहरणार्थ, अर्थविषयक समितीमध्ये सध्या तरी अन्नमंत्री रामविलास पासवान यांचा समावेशच करण्यात आलेला नाही. म्हणजे देशातील महागाई इत्यादी प्रश्नांबाबत चर्चा होतानाही अन्नपुरवठामंत्री तिथे नसणार. पण हा मोदींचा ठसा आहे. गेल्या वीस वर्षांत सततच्या आघाड्यांच्या राजकारणामुळे सर्व घटक पक्षांचे सर्वच नेते एकसमान अशी एक मनोभूमिका निर्माण झाली होती. याउलट आपण ठरवून देऊ तेवढेच प्रत्येकाचे काम आणि दर्जा राहील (मग त्या सुषमा असोत वा पासवान) ही मोदी यांची स्पष्ट भूमिका दिसते. एकूणच मोदी यांची ही शैली ठायी-ठायी इंदिरा गांधी यांची आठवण करून देणारी आहे.

वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्याबाबतही मोदी यांचे खास धोरण दिसते. गेली दहा वर्षे सरकारात आणि देशात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याचे मत आपल्याला रोज ऐकावे लागत असे. मोदी यांनी हे मतप्रदर्शन बंद करून टाकले आहे. इतकेच काय मंत्र्यांना बोलण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा परिणाम असा की, माध्यमांमध्ये सध्या तरी कमालीची शांतता आहे. उदाहरणार्थ, इराकमध्ये भारतीय अडकल्याच्या प्रश्नी केंद्रात काँग्रेसचे सरकार असते तर भाजपने डॉ. मनमोहनसिंगांवर नाकर्तेपणाची टीका केली असती.

मग तिला उत्तर देण्याच्या नादात परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद काहीतरी आगलावेपणाचे बोलले असते. मग त्यातून एकच धुरळा उडाला असता. सध्या सरकारवर टीका करण्याला काँग्रेस किंवा माध्यमांकडे फारसे तोंडच नाही. आणि असले तरी मोदी सरकारतर्फे याबाबत काहीच प्रतिवाद केला जाणार नसल्याने धुरळा उडण्याचा प्रश्नच नाही. महिनाभरात नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीची जी चुणूक पाहायला मिळाली त्याबाबतचे हे एक निरीक्षण आहे. त्याबाबत आणखी काही निष्कर्ष तूर्तास नको. फार तर इतकेच म्हणून ठेवता येईल की, निवडणुकीपूर्वी टीकाकार करीत असलेल्या वर्णनाशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यशैली बर्‍यापैकी मिळतीजुळती आहे. असो.

satherajendra@gmail.com