आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींचे ‘कहीं पे निगाहें...’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवरायांनी सुरतेचा खजिना लुटला असे म्हणणे इतिहासाचा विपर्यास आहे, असे नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले. मुळात त्यांचे हे विधान म्हणजे ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ यातलाच प्रकार आहे. या विधानातून त्यांना एकीकडे शिवभक्त हिंदू मतदारांना आकर्षित करायचे आहे, तर दुसरीकडे नेहरूंनाही लक्ष्य करायचे आहे. भाजप आणि संघ परिवाराने गेल्या काही महिन्यांपासून कधी उघडपणे, तर कधी छुप्या पद्धतीने नेहरूंवर हल्ला चढवला आहे. नेहरूंविषयी लोकमत कलुषित करण्याचा धंदा संघ परिवार सहा दशकांपासून करत आहे. पण यंदा त्यांच्या नेहरूविरोधाला धार प्राप्त झाली आहे. संघ परिवाराचा नेहरूविरोध व्यक्तिविरोधापुरता मर्यादित असता, तर तो दुर्लक्षित करण्याजोगा होता. मात्र, त्यांचा नेहरूविरोध व्यक्तिविरोधापुरता मर्यादित नसून तो नेहरूंच्या धर्मनिरपेक्षता, लोकशाही, पुरोगामी विचार, समाजवाद या विचारांना आहे. त्यामुळेच नेहरू यांच्याखेरीज संघ परिवार स्वातंत्र्यानंतर सत्तेत असता तर हा देश कुठे असता, याची मोदी समर्थकांनी एकदा कल्पना करून नक्कीच पाहावी.


स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या आग्रहामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेबांमुळे देशाला लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये मिळाली. बाबासाहेबांच्या नावाला सुरुवातीला नेहरूंचा विरोध होता. मात्र, हळूहळू त्यांचा विरोध मावळला आणि वैविध्य असतानाही देश एक ठेवू शकणारी घटना अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर देशात जनसंघासारखा पक्ष सत्तेत आला असता, तर जात्यंध संघाने या कामासाठी बाबासाहेबांची नियुक्ती केली असती का? त्या वेळी या कार्यासाठी बाबासाहेबांसारखी दुसरी विद्वान व्यक्ती भारतात नाही, हे वास्तव मान्य करून बाबासाहेबांना हा सन्मान दिला असता का? काँग्रेसने बाबासाहेबांवर अन्याय केला, असं आज सोयीने म्हणणा-या संघाने सदैव चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. तेव्हा, या संघाने महार जातीतील व्यक्तीला न्याय दिला असता का? आज भारतात जे परिवर्तन झालेलं दिसतंय, त्याचं मुख्य कारण नेहरू आणि आंबेडकर यांची दूरदृष्टी हेच होय. किंबहुना, ओबीसी समाजातील मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करणं, हेदेखील या द्वयींचंच यश म्हटलं पाहिजे. यासाठी मोदींनी नेहरूंचं कायम ऋणी असलं पाहिजे.


भारतात अठरापगड जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. या सर्वांना आजवर एकत्र बांधून ठेवलंय ते ‘विविधतेत एकता’ या सूत्राने. मात्र, संघाचा या विविधतेला कायमच विरोध राहिला आहे. हिंदी भाषेबद्दलचा टोकाचा आग्रह असो की हिंदू राष्‍ट्राबद्दलचा विद्वेषी विचार असो; मुळात संघाला ‘हिंदू पाकिस्तान’ हवा होता. असे झाले असते तर भारतातून एक नव्हे, तर कैक ‘बांगलादेश’ निर्माण झाले असते. काही बांगलादेश धर्माच्या आधारावर, काही जातीच्या आधारावर, तर काही प्रदेश हिंदूंमधील जातीय संघर्षामुळे सदैव धुमसत राहिले असते. या देशाने दक्षिणेतील हिंदीविरोधी आंदोलन अनुभवले आहे. उत्तर आणि दक्षिण हा संघर्ष भारतासाठी नवा नाही. संघाने हिंदी लादण्याचा प्रयत्न केला असता, तर स्वातंत्र्याच्या काही वर्षांतच देशाची किती तरी शकले पडली असती. सत्तेत आल्यावर हीच टोकाची नीती काश्मिरात लागू करण्याचं सूतोवाच भाजपने केलंय. असं प्रत्यक्षात घडल्यास त्याची मोठी किंमत या देशाला मोजावी लागेल, याबाबत शंका नाही.


संघाने नेहरूंवर टीका करणं म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. पण तो आज खपवून घेतला जातोय; कारण देशातील गरीब हिंदूंचं ब्रेन वॉशिंग करण्यात संघाला ब-यापैकी आलेलं यश आणि मध्यमवर्गाची लबाड वृत्ती. नेहरूंवर टीका करणं ही गोष्ट सध्या भाजपच नव्हे, तर मध्यमवर्गासाठीही फॅशन बनली आहे. मात्र, नेहरूंमुळेच आजचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण उपभोगतोय, हे वास्तव ही मंडळी सोयीस्करपणे विसरत आहेत. मुळात, ही मध्यमवर्गाची जुनीच खोड म्हटली पाहिजे. प्रत्येक विषयाची स्वत:ला सोयीस्कर अशी मांडणी करणं आणि त्यातच अखिल मानवजातीचं हित आहे असं भासवत राहणं, हा मध्यमवर्गाचा ‘गुण’ आहे.


1950 चा संघ आणि 2014 चा संघ वेगळा आहे किंवा मोदी आणि संघ वेगळा आहे, असा युक्तिवाद काही मोदी समर्थक करत आहेत; पण तो फसवा आहे. गेल्या 75 वर्षांच्या इतिहासात संघाचा एकही सरसंघचालक गैर-ब्राह्मण नसावा, त्यांना अधूनमधून हिंदू राष्‍ट्रवादाच्या हुक्क्या याव्यात, स्त्रियांनी काय वस्त्र परिधान करावं आणि हिंदूंनी किती पोरं जन्माला घालावीत, याविषयी उफराटे सल्ले द्यावेत, यावरून त्यांची विकृत मनोवृत्ती समोर येते. मोदींचे 2002 मधील कृत्य, सद्भावना कार्यक्रमात त्यांनी दाखवलेला असद्भाव आणि मुजफ्फरनगरमधील आरोपींचा त्यांच्या सभेत झालेला सत्कार, या सर्व घटना त्यांचा खरा चेहरा उघड करतात. मोदी ओबीसी असूनही त्यांना उमेदवार केले गेले. संघाची बदललेली मानसिकता दिसते, असं काही जण म्हणतील; पण निवडणुका जिंकण्यासाठी संघाने केलेली ती तडजोड आहे.