आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे घराण्याचे पुनरागमनाय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाले. पारतंत्र्याच्या काळापासून हिरे घराण्याकडे सत्तेची सूत्रे राहिली. मालेगावमधील लोकल सेल्फ गव्हर्नमेंटपासून तर राज्याच्या महसूलमंत्र्यापर्यंत डॉ भाऊसाहेब हिरे यांनी नानाविध पदे भूषवली. नाशिक जिल्हा बॅँकेच्या स्थापनेसाठीही हिरे यांनीच हिरीरीने सहभाग घेतला. हिरे याच्यानंतर व्यंकटराव हिरे 1967 ते 1972 मध्ये राज्यमंत्री राहिले. त्यानंतर व्यंकटराव हिरे यांनी चुलतभाऊ डॉ. बळीराम हिरे यांना राजकारणात उतरवले. हीच घटना लक्षणीय ठरली. बळीराम हिरे पाहातापाहाता मंत्री झाले. आरोग्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले. हिरे यांची राजकीय मांड पक्की झाल्यानंतर व्यंकटराव हिरे यांनी पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र व्यंकटरावाचा डॉ. बळीराम हिरे यांच्याकडून पराभव झाला. पुढील निवडणुकीत शरद पवार यांच्याकडून व्यंकटराव हिरे यांनी पत्नी पुष्पाताई यांच्यासाठी एस कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे डॉ. हिरे यांनी पत्नी इंदिराताई यांना रिंगणात उतरवले. दोन जावांमध्ये झालेल्या लढतीत पुष्पाताई विजयी झाल्या. परिवहन राज्यमंत्रीपदही पुष्पाताई यांनी मिळवले. एक दशक आमदारकी भूषवल्यानंतर मात्र मोठा पेच उभा राहिला. महात्मा गांधी विद्या मंदिराच्या माध्यमातून स्वत:ची राजकीय ताकद वाढवणारे पुष्पाताई यांचे पुत्र डॉ. प्रशांत हिरे यांनाच आमदारकीचे वेध लागले. आई विरुद्ध मुलगा असे चित्र निर्माण होण्याची चिन्हे असताना पुष्पाताई यांनी माघार घेतली. प्रशांत हिरे हे आमदार व पाठोपाठच राज्यमंत्री झाले. मात्र या सर्व प्रयत्नात जनतेशी नाळ तुटत गेली. संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सेवकही विरोधात गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून दाभाडी मतदारसंघ हिरे यांच्या ताब्यातून निसटला व प्रथम अपक्ष आणि आता शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. प्रशांत हिरे यांची जादू संपली असे चित्र निर्माण झाले असताना मुलगा अपूर्व हिरे व अद्वैय हिरे यांनी जनराज्य आघाडीच्या माध्यमातून स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरू केली. मालेगाव महापालिका, नाशिक जिल्हा परिषद, मालेगाव पंचायत समिती, नाशिक महापालिका, भगूर येथील जनराज्य आघाडीच्या रूपाने अपूर्व हिरे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे अद्वैय हिरे यांच्यासाठी खुद्द प्रशांत हिरे यांनीच जिल्हा बॅँकेतील नेत्यांची मोट बांधून अध्यक्षपदाची खुर्ची मिळवून दिली.
विधान परिषद निवडणुकीतही हिरे घराण्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सक्रिय हालचाली केल्या. गेल्या दोन ते तीन वर्षात हिरे घराण्याची पकड नाशिक जिल्ह्यावर पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आता तर पाच जिल्हे मिळून बनलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार होण्यासाठी अपूर्व हिरे यांनी कंबर कसली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिराच्या रूपाने हिरे यांची मतदारसंघ आणि मतदारांवर चांगली पकड आहे. दुसरी बाब म्हणजे, या मतदारसंघावर अनेक वर्षांपासून पकड मिळवून असलेल्या शिक्षक लोकशाही आघाडी अर्थातच टीडीएफमधील फूटही हिरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहे. मात्र त्यानंतरही हिरे यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणे वाटते तितके सोपे नाही.
टीडीएफमधील एका गटाला कॉँग्रेस व राष्टÑवादीने पाठिंबा दिला आहे. मूळ टीडीएफची उमेदवारी गतवेळी जळगावला दिलीप सोनवणे यांना होती. यंदा संधी नगरला द्यावी अशी मागणी केली गेली. प्रत्यक्षात टीडीएफने घेतलेल्या परीक्षा प्रक्रियेत नंदुरबारच्या डॉ. डी.एन नांद्रे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नगरमधील टीडीएफच्या गटाने बाहेर पडत राजेंद्र लांडे यांनाच उमेदवार केले. पाठोपाठच लांडे यांनाच कॉँग्रेस व राष्टÑवादीचाही पाठिंबा मिळाला. लांडे यांच्या प्रचारार्थ सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कंबर कसली आहे. हिरे यांचा धोका लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांचीही मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीत हिरे गटाने राष्टÑवादीविरोधात केलेल्या कारवायांचा हिशेब चुकता करण्याचीही संधी आहे. दुसरीकडे शिक्षक परिषदेतर्फे सुनील पंडित व शिवसेनेकडून संजय चव्हाण यांची नावे अग्रक्रमी आहे.याव्यतिरिक्त जवळपास 16 उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी सर्वच उमेदवारांची कसरत होणार आहे. अशा परिस्थितीत दुसºया पसंतीची मते कोणाला मिळवता येतात यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.
टीडीएफमधील फुटीर गटाने एकमेकांविरोधात कारवाया केल्या आणि दुसºया पसंतीची मते अपूर्व हिरे यांच्या पारड्यात टाकली तर विजयाचे गणित जुळू शकते मात्र टीडीएफच्या दोन्ही गटांनी समजूतदारपणे पहिल्या व दुसºया पसंतीची मते अनुक्रमे आपल्या आपल्या धारणेनुसार मूळ व फुटीर उमेदवारांना देऊ केली तर मात्र हिरे यांच्यासारख्या अन्य प्रस्थापितांनाही निवडणूक अवघड जाणार आहे.
भाजपचे खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील मदतीची परतफेड केली आणि धुळ्यातून माजी आमदार रोहिदास पाटील यांनी मदत केली, तर हिरे यांच्या यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो. याबरोबरच याच मतदारसंघातील माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी टीडीएफ एकत्रीकरण
समितीच्या माध्यमातून मदतही निर्णायक ठरू शकते. असे सर्व गणित जुळले तर हिरे घराणे मागच्या दरवाज्याने का होईना मात्र राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय होऊ शकते.