आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या राष्ट्रालाही स्वत:ची राष्ट्रीय दिनदर्शिका असावी, याची जाणीव आपल्या नेत्यांना 1952 मध्ये झाली आणि यासाठी सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक ‘पंचांग सुधारणा समिती’ नेमली गेली. या समितीने कालगणनेच्या तेव्हा अस्तित्वात असलेल्या विविध पद्धतींचा सखोल अभ्यास केला. जगातील प्रचलित कालगणनेतील गुणदोषांचा अभ्यास व विश्लेषण केले. सूर्य-चंद्राचे वार्षिक भ्रमण, धार्मिक सण, उत्सव, खगोलशास्त्रीय सिद्धांत इत्यादींना सखोल अभ्यास करून ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ तयार केली. भारत सरकारने ती दि. 22 मार्च 1957 या दिवसापासून स्वीकारल्याचे अधिकृतपणे घोषित केले. भारतीय दिनदर्शिकेनुसार तो दिवस होता 1 चैत्र 1879. महिन्यांची कालगणना चांद्रमासावरून केली, तर बारा महिन्यांच्या एका वर्षातील एकूण दिवसांची संख्या 354 होते. त्यामुळे चांद्रमासांचा ऋतूंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत व म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेतलेली दिनदर्शिका व्यवहारात सोयीची पडते. आपले दैनंदिन व्यवहार दिवस-रात्र यांच्या अनुषंगाने घडत असल्याने सरासरी 24 तासांचा दिवस ही कल्पनाही सोयीची होते. सणांसाठी आपण चंद्राची दिनदर्शिका विचारात घेत असलो, तरी दैनंदिन व्यवहारात मात्र सूर्याचीच दिनदर्शिका वापरतो. डॉ. मेघनाथ साहा समितीनेही सध्या प्रचलित असलेल्या इंग्रजी (ग्रेगेरियन) दिनदशर््िाकेपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण पण सौर दिनदर्शिकाच सुचवली आहे. आपल्या राष्ट्रीय कालगणनेची जमेची बाजू.
सध्या आपल्या व्यवहारात असलेल्या इंग्रजी किंवा ग्रेगेरियन कालगणनेत शास्त्रीयदृष्ट्या अनेक उणिवा आहेत. यातील महिने व भौतिकदृष्ट्या होणारे हवामानातील बदल यांचा परस्परांशी मेळ बसत नाही. बारा महिन्यांची नावेही अशास्त्रीय आहेत. काही महिन्यांची नावे राजांच्या नावावरून रूढ झालेली आहेत. या सर्व दोषांचा विचार करून भारतीय सौर कालगणनेत वर्षारंभ 22 मार्च या दिवशी ठरवण्यात आला आहे. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका 1 चैत्र या नावाने संबोधते. 22 मार्च हाच वर्षाचा प्रथम दिवस का? कारण 22 मार्चला दिवस व रात्र समसमान म्हणजे 12-12 तासांचे असतात. तसेच दर तिमाहीची सुरुवातही महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.
आषाढ 1 = 22 जून. दक्षिणायन प्रारंभ
आश्विन 1 = 23 सप्टेंबर. दिवस-रात्री समान (12 तासांचे)
पौष 1 = 22 डिसेंबर. उत्तरायण प्रारंभ.
राष्ट्रीय दिनदर्शिका 22 मार्च 1957 पासून शासनाने स्वीकारली असली, तरी सुमारे 54 वर्षे होऊनही ती अजून दैनंदिन व्यवहारात वापरली जात नाही, ही खेदाची गोष्ट आहे. फक्त शासकीय व्यवहारात, राजपत्रात, वृत्तपत्रात, आकाशवाणी, आंतरराष्ट्रीय करार अशा शासकीय व्यवहारात एक उपचार म्हणून तिचा वापर केला जातो. जनमानसात ती रुजावी म्हणून प्रयत्न केले गेले नाहीत. भारतीयांच्या मनातील सुप्त राष्ट्रीय अस्मितेला आवाहन केले गेले नाही. त्यामुळे जनतेने ती आपल्या रोजच्या व्यवहारासाठी स्वीकारलीच नाही. किंबहुना अशी काही आपली राष्ट्रीय दिनदर्शिका आहे, याचे बहुतेकांना ज्ञान नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यावरून आपल्यात राष्ट्रीय अस्मितेचा किंवा राष्ट्रीय स्वाभिमानाचा अभाव असल्यामुळे आपण ती अमलात आणली नाही, असे म्हणण्यापेक्षा पर्याय उपलब्ध असल्याने आपले दुर्लक्ष झाले. सार्वभौम संसदेत पारित केल्यानंतरही ती कार्यवाहीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे आवश्यक होते.
ते झाले नाहीत हे खरे, परंतु ते उगाळत बसण्यापेक्षा पुनश्च हरिओम करायला काय हरकत आहे? आता संगणक प्रणालीच्या अंगीकारामुळे काम खूपच सोपे झाले आहे. संगणक जागृत असलेली नवी पिढी ते झटकन स्वीकारेल. देशपातळीवर संसद सदस्यांनी आणि राज्यपातळीवर विधिमंडळ सदस्यांनी प्रशासनाला विश्वासात घेऊन आपली इच्छाशक्ती प्रकट केल्यास लवकरच आपली राष्ट्रीय दिनदर्शका जनमानसात रुजेल. राष्ट्रीय कालगणना दैनंदिन जीवनात वापरली जायला हवी असेल, तर पुढील काही गोष्टी सुचवता येतील.
1) इंग्रजी दिनदर्शिकांत भारतीय महिने व तारखा ठळक अक्षरात व इंग्रजी महिने व तारखा लहान अक्षरात छापाव्यात. 2) बँक व्यवहार, चेक इ.वर राष्ट्रीय दिनांक घालावा. 3) बँका, संस्था, कंपन्या इ. स्वत:च्या दिनदर्शिका छापतात, त्यांनी राष्ट्रीय दिनदर्शिकाच छापाव्यात. 4) जनतेचे प्रबोधन करावे. 5) शाळा, महाविद्यालयांतील कामकाज राष्ट्रीय दिनांकानुसारच व्हावे, म्हणजे भावी नागरिकांना लहानपणापासूनच सवय होईल. 6) जन्म, मृत्यूचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार द्यावेत. 7) पत्रव्यवहार, लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका इ.सह सर्व दैनंदिन व्यवहारांसाठी त्वरित राष्ट्रीय कालगणना म्हणजेच राष्ट्रीय दिनदर्शिका वापरावी. प्रथम काही वर्षे राष्ट्रीय दिनदर्शिकांसह प्रचलित इंग्रजी दिनदर्शिकाही संयुक्त वापरायला हरकत नसावी. उदा. सौर 23 कार्तिक शके 1933 (14 नोव्हेंबर 2011) नागरिकांतील औदासीन्य नष्ट करून समाजाची मनोभूमिका तयार केली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.