आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पिढीत व्यवस्था बदलण्याची धमक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. खरेच आहे. पण या गरजा भागल्या की मग मात्र माणसाची करमणुकीची भूक प्रकर्षाने जागी होते. काळानुसार करमणुकीची साधनेही झपाट्याने बदलत असतात. विसाव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1955 च्या आसपासच्या काळापासून जवळजवळ या शतकाच्या अखेरीपर्यंत नाटक हेच मुख्यत्वे मराठी मध्यमवर्गीयांच्या करमणुकीचे साधन होते. त्याच्या जोडीला मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन हे नव्याने अस्तित्वात आलेले कलाप्रकारही करमणुकीच्या साधनांमध्ये समाविष्ट झाले होते. पण नव्या महाराष्टÑात कालचा हा मध्यमवर्ग खूपच बदलला आहे. आता काहीसा जातपातविरहित असा नवा मध्यमवर्ग समाजात निर्माण होतो आहे, झाला आहे. हा नवा मध्यमवर्ग म्हणजे केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला वर्ग नव्हे, तर नवे ऐकणारा, नवे पाहणारा, जुनाटपणाला आव्हान देत नव्या विचाराचे स्वागत करणारा असा हा प्रेक्षकवर्ग आहे. आजमितीस 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्टÑामध्ये आज हा वर्ग खरोखरीच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढलेल्या प्रेक्षकवर्गामुळेच नाट्यकलेच्या संदर्भामध्ये खूपच आशादायक असे काही घडते आहे. घडणार आहे. मराठी नाट्यलेखनाच्या इतिहासामध्ये जसा किर्लोस्कर, गडकरी, कोल्हटकर, देवल यांच्यापासून पु.ल देशपांडे, शिरवाडकर, कानेटकर, कालेलकर, बाळ कोल्हटकर, विजय तेंडुलकर यांनी आपला एक ठसा अलीकडील काळावर उमटवला तसेच मतकरी, सुरेश खरे यांच्यापासून ते आजचा लेखक थेट योगेश सोमण, शफाअत खान, गिरीश जोशी, जयंत पवार, केदार शिंदे यांच्यापर्यंत प्रत्येकाने आपल्या स्वतंत्र शैलीने अनेक स्पर्श विषयांना समर्थपणे हाताळले आहे. स्त्री भ्रूणहत्येवरील ‘स्त्रीसूक्त’ हे योगेश सोमण यांचे पथनाट्य या प्रकाराचे आधुनिक उदाहरण ठरेल आणि हे व अशी काही नवीन नाटके हेच मराठी नाट्यविषयातील नवे बलस्थान आहे असे मला वाटते. नाटक या माध्यमामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक ‘नाटककार’ हाच होय . म्हणूनच माझे पूर्वसुरी मास्टर दत्ताराम, परशराम सामंत, नानासाहेब फाटक आदी श्रेष्ठ मंडळी नाटककारांच्या संदर्भात बोलताना त्यांना कवी असेच आदराने ओथंबून संबोधीत असत. अत्यंत नेमक्या आणि मोजक्या शब्दांत ज्यामध्ये खूप आशय सामावलेला आहे असा विषय मांडणारा तो कवी असतो.
शब्दांत नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते
एक मोठा निबंध लिहूनही जो आशय उलगडणार नाही तो अशा नेमक्या शब्दांत लिहिणारा तोच खरा कवी. नाटकाचेही असेच आहे. केवळ 18 वर्षे वयाच्या भीष्मापासून ते थेट शंभरी ओलांडलेल्या भीष्माचा प्रदीर्घ काळ केवळ तीन-साडेतीन तासांत नेमक्या शब्दांमध्ये ‘मत्स्यगंधा’ या नाटकात वसंत कानेटकरांनी मांडून दाखवला आहे. हे केवळ एक प्रतिभावंत नाटककाराचेच सामर्थ्य होय. शिरवाडकरांचा नटसम्राट, मतकरींचे अश्वमेध, कानेटकरांचे हिमालयाची सावली अशा नाटकांची अनेक उदाहारणे वानगीदाखल आपल्याला आठवतील. अशा अस्सल नाटकात प्राण फुंकून ते रंगभूमीवर जिवंत उभे करणे हीच नटाची आणि दिग्दर्शकाची खरीखुरी कसोटी असते. हिंदीमध्ये ज्याला गागर में सागर असे म्हणतात, त्याचेच हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय. कलानिर्मितीच्या क्षेत्रात, विशेषत: नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात मराठी माणूस आज जगात अग्रेसर आहे अशी माझी पक्की धारणा आहे. मराठी माणूस नाटकावर विलक्षण प्रेम करतो आणि असे अनेक प्रतिभावान नाटककार महाराष्टÑाने दिले आहेत. याचे कारण मराठी माणसाचा एक स्वभावविशेष. अंथरूण पाहून पाय पसरावे अशी आपली वृत्ती आहे. पण त्यामुळेच कमीत कमी खर्चात पण अत्यंत आशयसंपन्न अशी कलाकृती सादर करणे हे त्यातल्या त्यात रंगभूमीवरच शक्य असते आणि म्हणून जीवनाला सर्वांगीण स्पर्श करणा-या अशा अनेक कलाकृती मराठी रंगभूमीवर सादर करण्यात आल्या आहेत आणि कदाचित म्हणूनच असेल, तेंडुलकरांच्या मराठी नाटकांचा महोत्सव अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीत साजरा झाला. मराठी रंगभूमीवर मिरवावे अशीच ही घटना मला वाटते. मराठी नाट्यचळवळीमध्ये आजमितीस नव्याने उदयास येत असलेल्या नव्या पिढीवर माझा खूप विश्वास आहे. अनेक ज्वलंत विषयांना तोंड फोडून मनातली खदखद ही मुले शब्दांकित, अभिनयांकित करीत आहेत. त्यांना उपलब्ध असणा-या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचा अत्यंत जागरूकपणे उपयोग करून घेताना ही मुले मला दिसत आहेत. अनेक प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभे आहेत हे खरे आहे. सामान्य माणसाच्या तोंडी ज्याच्यामुळे अन्नाचा घास पडतो त्या शेतक-यांनी दारिद्र्याला कंटाळून विदर्भात शेकडोच्या संख्येने आत्महत्या केल्या आहेत, तर मुंबईतल्या गिरण्यांमागून गिरण्या बंद पडल्यामुळे लाखो कुटुंबे, मुख्यत्वे मराठी कुटुंबे अक्षरश: उघड्यावर पडली. आपल्याच सरकारचे राज्य चालू असतानाही याउलट अनेक धनवंत याच काळात थेट आकाशास भिडण्याएवढे धनवंत झाले आहेत. पण पदार्थ पूर्ण सडल्याशिवाय ‘पेनिसिलिन’ तयार होत नाही. हे सगळे खरोखरीच बदलायचे असेल तर ते तुम्हीच बदलणार आहात.
उदासीनता आणि शिथिलता विरघळून जाणार कधी, चैतन्याची सुप्त अस्मिता सळसळून उठणार कधी
तुमच्यापुढे पडणारे हे सारे प्रश्न खरेच आहेत. पण माझा विश्वास आहे, त्याची उत्तरेही तुम्हीच शोधणार आहात. तुम्हाला ती नक्की सापडणार आहेत. कारण भारत हा आजचा सर्वात तरुण देश आहे. 125 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशातील तरुण पिढीने मनावर घेतले तर हे सर्व बदलणे खरोखरच अशक्य आहे का? नक्कीच नाही. मात्र त्यासाठी एकसंध राष्टÑ उभे राहणे आवश्यक आहे.
आशयसंपन्न असे नवे नाटक तुमच्याकडूनच मला मिळेल, अशी माझी खात्री आहे. मराठी नाटक आता समुद्रापार पोचले आहे. तरीही आपल्या स्वत:च्या भूमीत मात्र या क्षेत्रात अनेक त्रुटी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला जाणवत राहतात. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’चा आक्रोश होता, कोणी घर देता का घर? एका वादळाला कोणी घर देता का घर?’ आज जागोजाग सरकारतर्फे नाट्यगृहे उभारली गेली आहेत. पण योग्य व्यवस्थेअभावी त्यांची अवस्था खूपच दयनीय म्हणावी अशी असते, दिसते. विशेषत: स्वच्छतागृहे ही अस्वच्छतेचा नमुना दाखवावी अशी असतात. हे सर्व आपल्याला कसे चालते? की आपल्याला याचीच सवय आहे? असो! ध्वनियंत्रणाही अनेक ठिकाणी सदोष असते. खरे तर नाटक हा ‘स्पोकन वर्ड’चा प्रकार. प्रेक्षकांपर्यंत शब्दच पोचले नाहीत तर ते का आणि कसे खपवून घ्यायचे?
11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्टÑातील व्यावसायिक रंगभूमी तौलनिकदृष्ट्या सुस्थितीत दिसत असली तरी अनेक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नाट्यचळवळीला खरे बरे दिवस आले ते कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्या कारकिर्दीत. त्यांच्यामुळेच. त्यांच्या नाटक या विषयावरील प्रेमामुळेच. नाट्यव्यवसायाला आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा विचार आणि त्याची अंमलबजावणी यशवंतरावजींनी सर्वप्रथम केली. मराठी नाटक ही एकसंध, भारतीयत्वाचा सन्मान करणारी अशीच मूलगामी चळवळ आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणा-या शिवप्रतिभेचा गौरव करणारी अशी ही चळवळ आहे. नवी पिढी आता दंड थोपटून या चळवळीत उतरू पाहते आहे.
जुने जाऊ द्या मरणालागून
जाळून किंवा पुरून टाका
सडत न एक्या ठाई ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवून ’’
अशी प्रतिज्ञा करून ही नवी पिढी या चळवळीत सामील होईल, अशी मला खात्री आहे.