आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रिया एवढ्या आक्रमक का? (त्र्यंबक कापडे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. गेल्या आठवड्यात खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगावात त्यांची शेतकरी परिषद झाली. या परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा; दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, जशी आघाडी सरकारने दिली होती. राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारने धावून आले पाहिजे. राज्यात शेतकरी सुरक्षित नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत; मग मीच काय, या राज्यातील प्रत्येक महिलेने आक्रमक झाले पाहिजे, असे सुप्रिया सुळेंना वाटते. सुळे या राज्याच्या राजकारणात आल्या तशा शेती आणि शेतकरी या विषयावर नेहमीच बोलत असतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या आहेत. पवारकन्या असल्यामुळे त्यांना त्या जाणून घेणे तसे अवघडही गेले नाही. भुईमुगाला शेंगा खाली येतात की वर? असे त्यांच्याबद्दल कुणी बोलू शकत नाही. त्यांचा वारसा आणि अभ्यास पाहता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचा अधिकारही आहे. त्यामुळेच त्यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकरी परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. या परिषदेत त्या शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना भाजप सरकारवरही तुटून पडत आहेत. कोपर्डी घटनेतील आरोपींवर तत्काळ आरोपपत्र दाखल करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टिप्पणी त्यांना फार लागून गेली आहे. त्यामुळे त्यांनी सध्या मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नादाला लागू नये. त्यांना सुप्रिया कोण आहे? हे दाखवून देऊ, असे स्पष्टपणे ठणकावले आहे. प्रत्येक सभेत त्या सरकार आणि फडणवीसांवर आक्रमक टीका करत आहेत. सुप्रियांची भाषणे यापूर्वी ज्यांनी ऐकली आहेत, त्यांना सध्याच्या सुप्रिया बघून आश्चर्यच वाटत आहे. सुप्रिया एवढ्या आक्रमक का झाल्या? त्यांचे भाषण ऐकून कुणाच्याही मनात हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. प्रश्न एक असला तरी त्याची उत्तरे ही वेगवेगळी समोर येत आहेत. उत्तरे वेगवेगळी असली तरी सर्वच उत्तरांचा सार काढला, तर अर्थ मात्र एकच निघत आहे. सुप्रिया एवढ्या आक्रमक का झाल्या? हा प्रश्न जळगावात पत्रकारांनी त्यांनाच आधी केला. त्यावर त्या म्हणाल्या, भाजप सरकारला संवेदनशील विषयांची जाणीवच नाही. त्यांच्या काळात होत असलेला अन्याय बघून गप्प राहणे योग्य नाही. यापुढे राज्यातील कोणतीही महिला अन्याय सहन करणार नाही. सुळे हे सर्व सांगत असल्या तरी भाजप सरकार खरेच एवढ्या हुकूमशाही पद्धतीने वागत आहे का? शेतकरी आणि महिलांना या सरकारच्या काळात असुरक्षित वाटत आहे का? या गोष्टी जेवढ्या तपासण्यासारख्या आहेत, तेवढेच सुळेंचा महाराष्ट्र दौरा आणि राष्ट्रवादीचे राजकारण बदलत आहे का? हेही तपासण्याला संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष आहे, असे मानले जात आहे. या पक्षाची राज्यात सत्ता नाही म्हणून मराठ्यांचीच सत्ता नाही, असेही समीकरण मांडले जाते. कोपर्डी घटनेच्या अनुषंगाने राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघाले. आरक्षणासह अनेक मुद्दे मोर्चेकऱ्यांनी मांडले आहेत. कोणत्याही नेतृत्वाशिवाय लाखोंच्या संख्येने रस्त्यावर लोक उतरले, हा एक इतिहास घडला आहे. लाखोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चांमुळे राज्यातील मराठा ताकद सरकारला कळली आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. मराठा समाजाची जर एवढी ताकद असेल, तर त्यांनी वारंवार नुसते मोर्चेच काढायचे की सत्तेत यायचे? याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. सत्तेत यायचे असेल तर चेहरा लागतो, हे पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी देशात मोठे उदाहरण आहे. राष्ट्रवादी जर मराठा समाजाचा पक्ष मानला जात असेल, तर तीन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी दिसत आहे. संधी असली तरी चेहरा कोण? अजित पवार आणि तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवणे धाडसाचे ठरेल. कोणताही आरोप नाही; महिला म्हणून एक सहानुभूतीही मिळू शकते. म्हणून सुप्रिया सुळे यांना पवारांनी मैदानात उतरवलेलं दिसतं, असे तर्कही लावले जात आहेत. कारण सुळे या ज्या पद्धतीने महिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत आहेत, त्याचबरोबर त्या पक्षातील अंतर्गत वादविवाद, गटबाजी दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत. सत्तेची फळे चाखण्यासाठी राष्ट्रवादीत जे भाजपच्या वाटेवर आहेत, तेही सध्या सावध विचार करतील व आणखी तीन वर्षे वाट बघू, असा विचारही त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
-निवासी संपादक, जळगाव.
बातम्या आणखी आहेत...