कात्रजचा घाट! (अग्रलेख) / कात्रजचा घाट! (अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 20,2012 10:28:46 PM IST

‘रुसू बाई रुसू कोप-यात बसू, तिकडून आला नवरा खुदकन हसू...’ ही शिशुवर्गामधील कविता आज अचानक अनेकांना आठवली असेल. गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीतील राजकीय पत्रकारांनी आदरणीय पवारसाहेब काँग्रेसवर रुसल्याच्या बातम्या सुरू केल्या. मात्र, शुक्रवारी सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली आणि मग आदरणीय साहेब अचानक खुदकन हसू लागले. पवारसाहेबांच्या चेह-यावरची कुठली रेष किती कोनात बदलली याचे निरीक्षण करणारे अनेक पत्रकार आहेत. तसेच त्यांच्या रुसण्या-हसण्यामुळे आणि आता पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असल्यामुळे, देशाच्या कोणत्या कोप-यात कसा राजकीय भूकंप होणार आहे, याचे भविष्य वर्तवणारेही दिग्गज मीडियावाले आहेत. राष्ट्रपतिपदाचे मतदान संपले आणि बरोबर वेळ (नेम) साधून पवारसाहेब रुसले. आता पवारसाहेब खरेच रुसले आहेत का, हे त्यांच्या चेह-यावरून ताडलेले किती राजकीय विश्लेषक आहेत, हे खुद्द पवारसाहेबच जाणोत! मात्र, ते रुसले असल्याच्या बातम्या त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून वा-याच्या वेगाने चहूबाजूंना पसरवल्या गेल्या. गुरुवारी सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीला पवारसाहेब व त्यांचे शिलेदार प्रफुल्ल पटेल या दोघांनीही दांडी मारली. प्रफुल्ल पटेल यांचे जाऊ द्या; पण पवारसाहेबांना उगाचच दांड्या मारून टाइमपास करण्याची सवय नाही. त्यामुळे साहजिकच काय झाले, काय झाले, अशा चिंताग्रस्त सुरात बातम्या बहाद्दरांनी चौकशा सुरू केल्या. तर म्हणे केंद्रीय मंत्रिमंडळात दुस-या क्रमांकाचे मंत्री असलेले प्रणव मुखर्जी हे मंत्रिमंडळातून गेल्यानंतर तिस-या क्रमांकावर असलेल्या शरद पवार यांना दुस-या क्रमांकाच्या खुर्चीवर बसवण्याऐवजी तोपर्यंत चौथ्या क्रमांकावरील अँटनींना तो मान दिला गेला. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने छत्रपतींना दिल्ली दरबारात अपमानित करण्यात आल्यावर त्यांनी थेट दिल्लीपतींना काय हिसका दाखवला होता, ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र, फरक इतकाच, त्या रयतेच्या राजामागे संपूर्ण समाज एकसंधपणे उभा होता. दिल्लीत काहीही झाले तरी महाराष्ट्रात त्या जाणत्या राजाने दाखवलेल्या मार्गावरून प्राणपणाने मार्गक्रमण करण्यास येथील समाज मनापासून तयार होता. कारण जनतेला पहिल्यांदाच स्वत:साठी नव्हे, तर रयतेसाठी राज्य करणारा राजा दिसला होता. आदरणीय साहेबांचा जनाधार किंवा त्यांचे विश्वासू शिलेदार दिल्लीने सत्ता हिसकावून घेतली तर किती वेळ बरोबर राहतील, हे आपल्याला माहीत नसले तरी साहेबांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच रुसूबाईचा रुसवा कशामुळे होता, मुळात हा रुसवा होता की दुसराच काही तरी ‘गेम’ यामध्ये होता, याचा विचार काँग्रेसमधील धुरीणांना करावा लागणार आहे. संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हे सर्वात महत्त्वाचे पद असते. आपल्याकडील खात्यांची जबाबदारी पंतप्रधान संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना देत असतात. मात्र, त्या सर्व खात्यांना अंतिमत: जबाबदार पंतप्रधानच असतात. त्यामुळेच पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. अशा संसदीय लोकशाहीत मंत्रिमंडळातील क्रमांक दोन किंवा क्रमांक तीनचे पद ही फक्त राजशिष्टाचाराच्या परिभाषेतील पदे आहेत. बैठकीत कुणी कुठे बसायचे, कुणी दरवाजातून आधी आत जायचे वगैरे ब्रिटिशकालीन राजशिष्टाचाराच्या परंपरांपुरताच या दुस-या व तिस-या क्रमांकाला खरे तर अर्थ असतो. मग इतक्या सामान्य व प्रतीकात्मक गोष्टींसाठी पवारांसारख्या प्रगल्भ राजकीय नेत्याने असला रुसवा-फुगवा केला असेल का, तर याचे उत्तर अर्थातच ‘नाही’ हेच असेल. पवारांच्या राजकीय खेळ्या या नेहमीच शत्रूला कात्रजचा घाट दाखवणा-या असतात, असे मानले जाते. त्यामुळे सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना दुस-या क्रमांकाचे पद देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला, हे जसे त्यांच्या रुसव्यामागील खरे कारण असू शकत नाही, तसेच आज रुसवा गेल्यानंतर यूपीएच्या कार्यपद्धतीविषयी त्यांचे काही आक्षेप होते व त्याबाबत यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे समाधान झाले, हेही तितकेसे खरे नाही. यूपीएतील कार्यपद्धतीविषयी पवारांची असलेली नाराजी ही काही आजची नाही. ती त्यांनी अनेकदा पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारतानाही बोलून दाखवली आहे. अनेक पक्षांचे कडबोळे एकत्र झाले की घेतलेले निर्णय व ते घेण्याची पद्धती सगळ्यांनाच मान्य होण्याची शक्यता नसते व ते पवारांनाही चांगले माहीत आहे. मग नेमकी ती आताच अशा पद्धतीने व्यक्त करण्याची गरज काय होती, हा प्रश्न उरतोच. राहुल गांधी यांच्यावर आता पक्ष आणखी मोठी जबाबदारी देणार असल्याच्या बातम्याही गुरुवारी दुपारपासूनच सुरू झाल्या होत्या. आपल्या देशात गांधी कुटुंबीयांविषयी कमालीची कटुता असणारा एक वर्ग आहे. या वर्गाला शरद पवारांचे का कुणास ठाऊक, विशेष प्रेम आणि अप्रूप वाटते व तेही त्यांच्या पुतण्या व मुलीसह! तर राहुल गांधी हे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यास वा पक्षात त्यांनी अधिक मोठी जबाबदारी घेतल्यास त्यांच्या देशभरातील काँग्रेसमधील तरुण टीमचा राजकारणातील प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसमधीलही अनेक ढुढ्ढाचार्य नाराज आहेत. या ढुढ्ढाचार्यांच्या नाराजीला पवारांनी तोंड फोडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी हे 2014च्या निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान झाले नाहीत, तरी ते विरोधी पक्षनेते तर नक्कीच होणार आहेत! त्यानंतरच्या निवडणुका येतील तेव्हा राहुल गांधी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील हे स्फटिकाइतके स्पष्ट आहे. गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती पंतप्रधानपदी बसू नये, यासाठी कार्यरत असलेली एक मोठी लॉबी आपल्या देशात कायम कार्यरत असते. सोनिया गांधी यांना कधीही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडली नव्हती, हे आता फेसबुकी कुजबुजकार ब्रिगेडच्या गळ्यातील ताईत असलेल्या अब्दुल कलाम यांनीच स्पष्ट केले आहे, तर अशा सोनिया गांधी पंतप्रधान होतील की काय, या भीतीने शाहू-फुले-आंबेडकरांचे पाईक असलेल्या शरद पवारांनी त्यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलून धरला होता. ज्या सोनियांनी सक्रिय राजकारणात यावे म्हणून पवारांनीच साकडे घातले होते, त्यांनीच आपल्या अस्सल प्रतिगामी विचारांची साक्ष तेव्हा देशाला दिली होती. राहुल यांना काँग्रेस मोठ्या भूमिकेत पाहू इच्छिते, या गुरुवार दुपारपासून सुरू झालेल्या बातम्यांनंतर लगेचच संध्याकाळी साहेब रुसल्याच्या बातम्या येणे, हा केवळ योगायोग त्यामुळेच असू शकत नाही. तसेच सोनिया गांधींशी भेट झाल्यावर रुसूबाई जणू काही नवरा आल्यासारखी खुदकन हसूही शकत नाही. या भेटीनंतर जर त्यांच्या चेह-यावर हसू आलेच असेल तर ते निरागसपणे आलेले खुदकन हसू असणार नाही, त्यात भविष्यात काँग्रेस कात्रजच्या घाटात कशी फसणार आहे, या कल्पनेने आलेले विकट हास्यच असणार, यात शंकाच नाही! पण कात्रजच्या घाटात इतरांना पाठवू पाहणाºयांनी स्वत:च त्या घाटात आपण सापडत नाही ना, हेही पाहायला हवे!

X
COMMENT