आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘टॅम’चे स्कॅम (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या आमच्या घरात 24 ७ 7 तास चालणा-या टीव्हीवर कुणाचे नियंत्रण असते? काही जण म्हणतील आपल्या हातात रिमोट कंट्रोल असल्याने आपलेच त्यावर नियंत्रण असते. काहींना वाटते की ज्या कंपनीचे चॅनल असते त्या कंपनीचे टीव्हीवर नियंत्रण असते. काहींचा असा दावा असेल की चॅनलच्या जाहिरातदारांकडून अदृश्यपणे चॅनल चालवले जाते. पण वास्तव अगदी वेगळेच आहे. एनडीटीव्ही या देशातील एका बड्या टीव्ही उद्योग समूहाने भारतीय टीव्ही इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवणा-या ‘टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट’(टॅम) या कंपनीवर खोटी प्रेक्षक संख्या दाखवल्याचा आरोप करत लक्षावधी डॉलरचा नुकसानभरपाईचा दावा न्यूयॉर्क येथील सुप्रीम कोर्टात ठोकला आहे. म्हणजे टेलिकॉम नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये घोटाळा झाला आहे. ‘टॅम’ ही आपल्या देशातील टेलिव्हिजन जगतातील प्रेक्षकसंख्या दाखवणारी आंतरराष्ट्रीय खासगी संस्था असून या संस्थेचे भारतातील काम नेल्सन आणि कंतार मीडिया रिसर्च या दोन संस्थांकडे आहे. भारतात केबल आणि सॅटेलाइट टीव्ही संच वाढल्यापासून टीव्ही चॅनल्सनी कसा धंदा करावा, मार्केट कसे शोधावे, प्रेक्षकांचा कल कोणते टीव्ही शो, मालिका पाहण्याकडे आहे, त्यांना एकता कपूरची ‘क’कारी मालिका पाहायची आहे की ‘बालिका वधू’; प्रेक्षकांना टीम अण्णांचे आंदोलन पाहण्यात रस आहे की आयपीएल वा ऑलिम्पिक, याचे दिशादर्शन करण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. सध्या आपल्या देशातील 23 कोटी 10 लाख कुटुंबांपैकी 14 कोटी 80 लाख कुटुंबांमध्ये टीव्ही संच आहे. या कुटुंबांपैकी 12 कोटी 60 लाख कुटुंबांकडे केबल आणि सॅटेलाइट कनेक्शन असून 2 कोटी 10 लाख कुटुंबांमध्ये फक्त दूरदर्शन हे सरकारी चॅनल दिसते. या सर्वदूर पसरलेल्या टीव्ही उद्योगात दरवर्षी 2 अब्ज 10 कोटी रुपयांची जाहिरातींची उलाढाल होत असते. अशा बलाढ्य टीव्ही उद्योगाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘टॅम’चा सहारा देशातील 400 हून अधिक चॅनल्सना घ्यावा लागतो. आता गंमत अशी की, ‘टॅम’कडून घेतले जाणारे सॅम्पल सर्व्हे हे देशातील केवळ 155 शहरांपुरते मर्यादित असून हा सर्व्हे घेण्यासाठी या संस्थेकडून उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि निम्न उत्पन्न गटातील 8160 घरांमध्ये पीपल्स मीटर बसवले जाते. या घरांमधील लोक कोणते कार्यक्रम कोणत्या वेळेत किती वेळ पाहतात, त्यांचा रिमोट कोणत्या चॅनलला वगळून कोणत्या चॅनलवर अधिक काळ स्थिरावतो, याची आकडेवारी पीपल्स मीटरच्या माध्यमातून ही संस्था दर बुधवारी संबंधित चॅनल्सना पाठवते व तेथून टीआरपीचे युद्ध सुरू होते. एनडीटीव्हीचे असे म्हणणे आहे की त्यांचे स्पर्धक असलेल्या एका इंग्रजी न्यूज चॅनलचा प्रेक्षकवर्ग टॅमच्या आकडेवारीनुसार 50 हजार असताना तो एका दिवशी एकाच कार्यक्रमात काही मिनिटांत दीड लाख ते अडीच लाखांच्या घरात गेला व हे चॅनल बघणा-या प्रेक्षकांचा रिमोट कंट्रोल या चॅनलवर सुमारे दोन तास स्थिरावला. वास्तविक कोणतेही न्यूज चॅनल बघण्याची प्रेक्षकांची सहनशीलता दोन मिनिटांपेक्षा अधिक असत नाही. पण टॅमने दाखवलेली ही प्रेक्षकसंख्या म्हणजे एक मोठा आर्थिक घोटाळा असून लाचलुचपतीच्या माध्यमातून ही संस्था टेलिव्हिजन मार्केटवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप एनडीटीव्हीने केला आहे. एनडीटीव्ही टॅमच्या काही निरीक्षणांवर आठ वर्षांपासून नाराज आहे व त्यांनी या संस्थेशी पत्रव्यवहारही केला आहे. काही महिन्यांपासून या चॅनलने सध्याचा 8 हजारांचा सॅम्पल सर्व्हे 30 हजारांपर्यंत वाढवण्यासाठी टॅमकडे आग्रह धरला होता; पण टॅमने आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले नाही. वास्तविक एनडीटीव्ही असो की इतर कोणतेही न्यूज किंवा मनोरंजन चॅनल असो, या सर्वांना टॅम या एकाच संस्थेवर सॅम्पल सर्व्हेसाठी अवलंबून राहावे लागते. त्याचे कारण असे की टॅमची टीव्ही इंडस्ट्रीवरील, खरे तर जाहिरात इंडस्ट्रीवरील पकड मजबूत आहे. देशातील सर्व बड्या जाहिरात कंपन्या व त्यांचे ग्राहक टॅमच्या आकडेवारीवर विसंबून राहून विविध टीव्ही चॅनलच्या मालिकांचे प्रायोजकत्व पत्करतात. प्राइम टाइमच्या वेळी कोणत्या जाहिराती आल्या पाहिजेत, कोणत्या नाहीत हे जाहिरात कंपन्या व त्यांचे ग्राहक ठरवत असतात. चॅनलने प्रचंड खर्च करून नवी मालिका आणली असली तर त्याला बड्या जाहिरातदारांवर अवलंबून राहावेच लागते. जाहिरातदारांना अशा मालिकांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाची विक्री करायची असते व हा सगळ्या व्यापाराचा भाग आहे. काही वेळा टॅमने एखाद्या मालिकेबद्दल किंवा रिअ‍ॅलिटी शोबद्दल मार्केट सर्व्हे नकारात्मक दिला तर संबंधित टीव्ही चॅनलना त्यात एका रात्रीत बदल करावे लागतात. अनेकदा टीव्ही चॅनलवर एकाच साच्यातल्या मालिकांचा भडिमार होत असतो किंवा एकाच कल्पनेवर आधारित मालिका अनेक चॅनलवर एकाच वेळी प्रसारित होत असतात. हा सगळा प्रकार टॅमच्या सॅम्पल सर्व्हेमुळे असतो. थोडक्यात, आपल्या देशात सॅटेलाइट टीव्हीची बाजारपेठ ठरवण्याची मक्तेदारी टॅमकडे नि:संशय आली आहे. टॅमच्या मक्तेदारीला आव्हान देण्याचा प्रयत्न यापूर्वी दक्षिणेतील ई-टीव्हीचे रामोजी राव व सन नेटवर्कचे मारन यांनी केला होता. पण त्यांना टॅमच्या साम्राज्याला सुरुंगही लावता आलेला नाही. अनेकदा टॅमवर असे आरोप केले जातात की त्यांच्या सॅम्पल सर्व्हेमध्ये ग्रामीण भारताला स्थान देण्यात आलेले नाही. त्याचे कारण असे सांगितले जाते की ग्रामीण भारतातील प्रेक्षक वर्ग टीव्हीवरील जाहिरातीचा थेट ग्राहक नसतो तसेच सध्या दाखवल्या जाणा-या विविध मनोरंजन चॅनलवर ग्रामीण भारताचे सामाजिक-आर्थिक जीवन अजिबात दिसत नसते. त्यामुळे जेथे सॅटेलाइट डिश किंवा केबल पोहोचलेली नाही तो प्रेक्षकवर्ग दूरदर्शन बघत असल्याने तो आपल्या जाहिरातीचा ग्राहक नसतो. भारतात सॅटेलाइट चॅनल्स वाढू लागली व त्यांचा प्रेक्षक वर्ग भाषा-संस्कृती-प्रदेशानुरूप बदलत गेला तेव्हा या बाजारपेठेत स्पर्धेमुळे टीव्ही कार्यक्रमांमध्ये दर्जाला महत्त्व येईल व सरकारी दूरदर्शन चॅनलकडे प्रेक्षक पाठ फिरवतील असे वाटत होते. पण असे काहीही घडले नाही. उलट टीव्ही मालिकांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत गेला, कल्पनादारिद्र्य वाढत गेले, प्रेक्षकांची अभिरुची बिघडत गेली आणि सकस असे काहीच निष्पन्न झाले नाही. या सगळ्यांचा दोष टॅमला द्यायचा का, हा प्रश्न आहे. भारतातील टीव्ही इंडस्ट्रीवर टॅमची ही मक्तेदारी अजून तरी शाबूत आहे. पण एनडीटीव्हीने टॅमला न्यायालयात खेचून भारतीय टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ मात्र माजवली आहे.