आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाचे संघटन गरजेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्रामध्ये धनगर समाज विखुरलेला आहे. आजही दुष्काळी भागातील पारंपरिक मेंढपाळ धनगर समाज पोटासाठी भटकंती करताना दिसतो. रामदास आठवले, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे यांनी आपापल्या समाजामध्ये स्वकर्तृत्वाने आपली स्वत:ची एकमुखी नेतृत्वाची दखलपात्र ओळख निर्माण केली. हे सर्वजण आपल्या समाजाचे अस्तित्व महाराष्‍ट्राच्या राजकारणात निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला, पक्षप्रमुखांना त्यांची वेळोवेळी दखल ही घ्यावीच लागते.


महाराष्‍ट्रातील विखुरलेल्या धनगर समाजाला प्रथम एकसंघ होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी राज्यपातळीवर एकमुखी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकीचे अनेक असे मतदारसंघ आहेत, जिथे धनगर समाजाची मतदार संख्या लक्षणीय आहे. तिथे हा समाज परिवर्तन घडवू शकतो. त्यानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातून धनगर समाजाचे सर्वपक्षीय किमान पाच खासदार व तीस ते चाळीस आमदार निवडून आले पाहिजेत. त्यासाठीच धनगर समाजाची बांधणी आतातरी व आतापासूनच होण्याची गरज आहे.


महाराष्‍ट्राच्या राजकारणात समाजाची अवहेलना आपणच थांबवली पाहिजे. राजकारणातील आपल्याबद्दलचा ‘यूज अँड थ्रो’ हा दृष्टिकोन इतरांना बदलवण्यास आपणच भाग पाडले पाहिजे. कित्येक वर्षे झाली, आपण ‘धनगड’ या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचितच आहोत. आज अनेक समाजांचे सर्व स्तरांवर गट समूह म्हणजे लॉबी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांच्या समाजासाठी सक्रिय असतात. धनगर समाजात आता याचीही जागृती होण्याची आवश्यकता आहे.


अडाणी समाज, शेळ्या-मेंढ्यांच्या कळपांप्रमाणे मागे येणारा समाज, हा धनगर समाजाबद्दल इतरांचा असलेला दृष्टिकोन अथवा गैरसमज आता धनगर समाजातील सुशिक्षित पिढीमुळे बदलत चाललेला आहे. आज धनगर समाजातील असंख्य मुले-मुली उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, तंत्रज्ञ होत असून सर्वच क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. या समाजाची इथून पुढची पिढी ही सुरक्षित म्हणून गणली जाणार आहे. समाजाबद्दल इतरांचा असणारा दृष्टिकोन बदलून टाकण्याची जबाबदारी या पिढीवर आलेली आहे.


धनगर समाजाची बांधणी करावयाची म्हणजे अन्य समाजाशी तुलना किंवा स्पर्धा करायची नाही. समाजाला त्यांच्या हक्काबद्दल, कर्तव्याबद्दल प्रबोधनाच्या माध्यमातून सतर्क करावयाचे आहे. यासाठी समाजातील सुशिक्षित बांधवांनी अगदी ग्रामीण पातळीपासून बांधणी करावयाची आहे. पंधरा दिवसांतून एकदा तरी अगदी महिलांसह एकत्र जमून चर्चा व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाची नि:स्वार्थी बांधणी करावयाची आहे. लोकवर्गणीतून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला पाहिजे. कारण शंभर टक्के सुशिक्षित समाज हे आपले ध्येय असले पाहिजे. उच्चपदस्थ सुशिक्षित युवकांनीही गरिबांच्या सुशिक्षित मुली स्वीकारून अन्य समाजासमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे. अनुरूप वधू-वरांसाठी तालुका पातळीवर वधू-वर सूचक मंडळे निर्माण झाली पाहिजेत. राज्याची व देशाची बांधणी हा विचार मनात ठेवताना संकुचित भावना बाजूला ठेवणे महत्त्वाचे आहे.


आपली समाजव्यवस्था ही सत्ताकेंद्रित आहे. या सत्तास्थानात समाजाला उचित स्थान मिळाल्याखेरीज विकास होणार नाही. आता राजकारणाच्या मैदानात दुस-यांचे कपडे सांभाळण्यापेक्षा पहिलवानकी करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत शक्तिप्रदर्शनासाठी समाजाचा वापर करणारांना यापुढे धनगर समाज कधीही पाठीशी घालणार नाही. सर्वच क्षेत्रे चांगलीच असतात. ती आपल्या कर्तृत्वाने चांगली अथवा वाईट ठरत असतात. धनगर समाजाने आता राजकारणात उतरण्याची वेळ आली आहे. यासाठी कोणाची वाट पाहण्याची गरज नाही. स्वकर्तृत्वाने हक्क मिळवण्याची गरज आहे.