आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील पर्यटनाच्या विकासाचा अभ्यास केल्यास आपणास असे दिसून येते की, औरंगाबाद, नांदेड आणि उस्मानाबाद असे तीनच जिल्हे असे आहेत की, या ठिकाणी पर्यटकांची येण्याची व मुक्काम करण्याची संख्या जास्त आहे. ही तीन ठिकाणे ‘मराठवाडा पर्यटन सुवर्ण त्रिकोण’ जाहीर करावीत. तसेच ती रेल्वे आणि जमिनीमार्गे व्यवस्थित जोडण्यात यावीत. पर्यटकांसाठी सुविधा म्हणून रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात पर्यटन एक खिडकी योजना सुरू करावी. ज्याद्वारे मराठवाडा सुवर्ण त्रिकोणाची संपूर्ण माहिती, प्रमुख पर्यटनस्थळे, प्रमुख पर्यटन मार्ग, या मार्गावरील नैसर्गिक स्थळे, तीर्थस्थळे यांची माहिती, निवास आणि भोजनाच्या सोयी याचीही माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच पर्यटकांची नोंदणी करावी.
मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यास मराठवाडा पर्यटन विकास व प्रसार कार्यालय स्थापण्यात यावे. ते जिल्ह्यास व मराठवाडा सुवर्ण त्रिकोणास जोडण्यात यावे. कृषी आणि ग्रामीण पर्यटन योजनेस सर्वतोपरी मदत करावी. तसेच कृषी व ग्रामीण पर्यटन हे शेतकरी, महिला बचत गट, ग्रामीण भागातील नागरिक यांच्याशी संबंध असल्याकारणाने नाबार्ड संस्थेस पुढाकार घेण्यास सांगून शेतक-यांना आर्थिक मदत व अनुदान देण्यात यावे. या माध्यमातून पर्यटकांना कमी खर्चात निवासाची व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र हा शेतीस पूरक असा जोड व्यवसाय होऊ शकतो. मराठवाड्यामध्ये कायम दुष्काळच असतो, हा गैरसमज संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात झालेला आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मराठवाड्यातील हवामान हे बारा महिने पर्यटनासाठी पोषक आहे. कोकण, केरळ किंवा काश्मीर या ठिकाणी फक्त सहा महिन्यांचाच पर्यटन काळ आहे. उन्हाळ्यात मराठवाडयात धार्मिक पर्यटनात वाढ होते. विविध धार्मिक यात्राही भरत असतात. मराठवाडा पर्यटन सुवर्ण त्रिकोण प्रमुख पर्यटन मार्गावर पर्यटनस्थळे, धरणाजवळ, नदीकिनारी नैसर्गिक पर्यटनस्थळी किंवा दुर्लक्षित पर्यटनस्थळे, किल्ले इत्यादी ठिकाणी पर्यटन केंद्रे उभारण्यात यावीत. त्यासाठी खालील गोष्टींचा समावेश करावा.
1. पर्यटकांसाठी विश्राम कक्ष (ग्रामीण पद्धतीमध्ये), 2. प्रसाधनगृहे, 3. भोजनकक्ष, 4. निवासाची व्यवस्था, 5. कृषी विषयावर माहिती दालने/ संग्रहालय, 6 . ग्रामीण संस्कृती माहिती दालने/ संग्रहालय, 7. शेतीमाल विक्री केंद्रे, 8. महिला बचत गट- माल विक्री केंद्र, 9. जवळील पर्यटनस्थळे आणि माहिती दालन, 10. प्रथमोपचार व्यवस्था, 11. महाराष्ट्रीयन आयुर्वेदिक मसाज केंद्र, 12. निसर्गोपचार केंद्र.
पर्यटन केंद्राजवळील पर्यटनस्थळाची माहिती, स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे, पर्यटकांच्या निवासाची व ग्रामीण भोजनाची व्यवस्था करणे, कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी संस्थांनी जिल्हा व तालुका विभागीय ‘मराठवाडा पर्यटन विकास व प्रसार’ सांभाळणे, विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार आणि पर्यटकांना मार्गदर्शन करणे, पर्यटकांना त्यांचे निवासस्थान किंवा जवळील बस-रेल्वेस्थानक, विमानतळ इत्यादी ठिकाणापासून पर्यटन कें द्र ते पर्यटन स्थळांपर्यंत वाहनाची व्यवस्था करणे आदी कार्य कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राकडून करता येण्याजोगी आहेत.
सदरील पर्यटन केंद्रापर्यंत व्यवस्थित रस्ते तयार करणे, पर्यटन कें द्रास तत्काळ आणि अखंड वीजपुरवठा देणे, सदरील पर्यटन केंद्रास विविध परवानगी तत्काळ मिळवून देणे, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँकांकडून वित्तपुरवठा मंजूर करण्यास साहाय्य करणे ही शासनाची कार्ये आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेले गणेशवाडी कृषी व ग्रामीण पर्यटन कें द्र हे दुर्लक्षित किल्ले पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाच्या मदतीशिवाय प्रयत्न करत आहे. गणेशवाडी पर्यटन केंद्राद्वारे कृषी व ग्रामीण पर्यटनाची यात्रा-गणेशवाडीची यात्रा तीन दिवसांसाठी भरवण्यात आली होती. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्था उंडणगाव यांच्या सहकार्याने ही यात्रा संपूर्णपणे यशस्वी झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.