आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोफायनान्सच्या साहाय्याने महिला व्यवसायात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला उद्योजकता हा बोलण्या-लिहिण्याचा खूप चांगला विषय आहे. खरे तर महिलांची उद्योजकता याला काळाचे, युगाचे बंधन नाही. पुरातन काळापासून स्त्री ही घरात, घराबाहेर, समाजात वावरताना अनेक क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत होती. मग ते रणांगण असेल, कला असेल किंवा शेती वा उद्योगधंदा. भारतात कुटुंबसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे भारतीय स्त्रीला तिच्यातील प्रजनन या दैवी देणगीमुळे मधल्या काळात मर्यादा आल्या. स्त्री शिक्षणाचे प्रमाण तेव्हा अत्यल्प होते. स्त्र ीशिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर मुली शिक्षिका, नर्स, पोस्ट, बँकेत नोकरी हाच पर्याय निवडत. मात्र आता उद्योग-व्यवसायात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. आता महिलांना पोषक वातावरण असल्यामुळे म्हणा की परिस्थितीशी त्यांचा लढा असो, महिला धोका पत्करण्यास तयार झाल्या आहेत. त्यांच्या निर्णयक्षमतेमध्ये अफाट वाढ झाली आहे. मार्केटिंगची कला जन्मजात अवगत असल्याने त्याचा वापर उद्योगाच्या वाढीसाठी ती करत आहे. अार्थिक ताळेबंद मांडताना तिचा घरचा अनुभव तिच्या कामी येत आहे. शिक्षण, वैचारिक स्वातंत्र्यामुळे मागच्या पिढीमध्ये जे बदल झाले त्याचा परिणाम महिला सक्षमीकरण, स्वतंत्र उद्योग, सगळीकडे समानतेच्या तत्त्वामुळे महिलांच्या उद्योगवाढीला चालना मिळाली. महिलांच्या मताला किंमत आली. कायद्यामध्ये झालेल्या बदलामुळे स्त्री स्वातंत्र्य समजायला लागले. समाजातील काही वाईट घटना, काही ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचारांमुळे काही महिलांनी पुढे येऊन जे आदर्श निर्माण केले त्यातून बोध घेऊन महिला उभ्या राहिल्या. राज्य असो की केंद्र सरकार, स्त्री सबलीकरणाच्या नवनवीन योजना उभ्या राहिल्या. त्याचा फायदा महिलांना निश्चितच झाला. महिला बचत गटातून तर त्याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लघुउद्याेगाच्या माध्यमातून घेतलेली भरारी खूप मोठी आहे. मायक्रो फायनान्सच्या मदतीने खूप महिलांना जागतिक बँकेकडून वेगवेगळा निधी मिळाला. त्यातून उद्योग सुरू झाले. महिलांना या ताकदीचा अंदाज आला आहे. त्यातून नवीन उद्योगांचा जन्म झाला. हे उद्योग सांभाळताना येणाऱ्या अडचणींना त्या सामोरे जात आहेत. आपण महिला उद्योगाचा व्याप बघितला तर तो फक्त पापड- कुरडया, लोणचे इथपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. उलट इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, आयात आणि निर्यात, केमिकल अशा सगळ्या क्षेत्रांत महिला उद्योग करत आहेत. स्वत:च्या आवडीने काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण यामध्ये मोठे आहे. परिस्थितीने आलेल्या उद्योगात अशा महिलांची संख्या आता कमी आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित अशा महिलांचे प्रमाण कमी आहे. पण त्यासुद्धा आता उद्योगाचा विचार करत आहेत. गावागावातील महिला उद्याेगाकडे वळत आहेत. शहरातील महिला आकाशाकडे झेप घेत आहेत. महिला उद्योजकांवर बँकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत महिला यशस्वी व्यवसाय करत आहेत. या सगळ्या प्लॅटफाॅर्मवर महिला प्रोफेशनल झाल्या आहेत. मुळात त्या एकत्र आल्या आहेत. व्यक्तिगत हेवेदावे विसरून एकमेकांचे पाय न खेचता एकत्रित पुढे जाण्यावर या महिलांचे प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धेला सामोरे जाताना, व्यवसाय करताना आपण कोणत्याही पुरुषाबरोबर स्पर्धा करत नाही तर आपण व्यावसायिक आहोत, हे समजून त्या व्यवसाय करत आहेत. त्या आता या स्पर्धेमध्ये उतरल्या आहेत. स्पर्धात्मक जगात त्या निश्चितच यशस्वी होतील. पुढचा काळ हा महिला उद्योजकांचा असेल. आज सेवा क्षेत्रात, प्रशासकीय विभागात महिलांचा हिस्सा मोठा आहे. महिला उपजतच उद्योजक आहेत. आता त्यांना संपूर्ण विश्व खुले झाले आहे. साहजिकच त्यामुळे सगळीकडे महिलांचे अधिराज्य आहे.
नेहा खरे
चेअरमन यंग आंत्रप्रिन्योर्स विंग, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर
बातम्या आणखी आहेत...