आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमाडेंचा देशीवाद आणि जातिव्यवस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनिक फीचर्सतर्फे वेबसाइटवरील तिसर्‍या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन 20 मार्च रोजी मुंबईत झाले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी जागतिकीकरण व देशीवाद यांच्यातील परस्पर संबंधाबाबत आणि आजकालच्या मराठी साहित्याबद्दल काही विचार व्यक्त केले. तशा आशयाचा त्यांचा लेख ‘जागतिकीकरण आणि देशीवाद’ या शीर्षकाखाली ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केला आहे. मात्र, नेमाडेंनी त्यात व्यक्त केलेली जातिव्यवस्थेची मते आम्हाला योग्य वाटत नाहीत. त्यांची विचारधारा खोडून काढण्यासाठी आम्ही काही मते मांडण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.
मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे हे अभ्यासू लेखक आहेत. त्यांनी देशीवादावर स्वतंत्र मते मांडलेली आहेत. त्यांचे मराठी साहित्याबद्दलचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. जागतिकीकरण आणि देशीवाद अशा विषयावर त्यांनी आतापर्यंत अनेकदा आपली मते व्यक्त केली आहेत. जागतिकीकरणाच्या जाणिवेतूनच देशीवादाचा जन्म झाला, असे सागताना ते म्हणतात की, ‘आपण आपल्या गोष्टी गमावतोय. आपल्या गोष्टी सुंदर आहेत. त्या टिकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपली ग्रामसंस्था होती. ती सुंदर पद्धतीची होती. तिच्यात अंतर्गत सुधारणा करणं शक्य होतं; पण सर्वच समाजाकडून आक्रस्ताळे निर्णय झाले. अगदी संत मंडळी असतील, आंबेडकरी चळवळ किंवा शेतकरी चळवळीनेही आधीचे टाकाऊ होत चाललेले आणि आपल्याला काहीतरी नवीन सेक्युलर आणावं लागेल, अशी भूमिका घेतली. खेडी सोडून शहराकडे जावं लागेल, असं त्यांचं म्हणणं होतं आणि पुढे ते ‘जातिव्यवस्था मोडणं शक्य नाही. कारण आपली व्यवस्थाच तशी आहे,’ असे सांगून देशीवादामध्ये त्यांच्या या मताचं आणि समाजातील जुनाट, अन्यायी परंपरांचं समर्थन करताना दिसतात.
जागतिकीकरणात आपलं काहीतरी गमावलं जाणार, हे खरं आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अनेक विचारवंतांनी आतापर्यंत विरोध केलेला आहेच; परंतु येथे एक महत्त्वाचा फरक स्पष्टपणे लक्षात घेतला पाहिजे आणि तो हा की, डॉ. नेमाडे हे जागतिकीकरणात आपण काय गमावणार आहोत, हे सांगताना ग्रामसंस्थेचा उल्लेख करत आहेत. ग्रामसंस्था टिकवताना जातिव्यवस्था टिकेल आणि म्हणून मग ते अंतिम निष्कर्ष काढतात की, ‘जातिव्यवस्था मोडणं शक्य नाही.’ डॉ. भालचंद्र नेमाडे हे आमच्याच खान्देशातील एका खेड्यात राहत होते; परंतु सधन शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना जातीचे आणि गरिबीचे दाहक चटके बसले नाहीत. या व्यवस्थेचा तर त्यांना लाभच झालेला आहे. त्यामुळे ग्रामसंस्था टिकावी, असा त्यांचा विचार ‘सरंजामदारी’ पद्धतीचा निदर्शक आहे. आतापर्यंत अनेक जागी त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. देशीवादाच्या नावाखाली जातिव्यवस्थेचं समर्थन होत आहे, हे ते मान्य करणार नाहीत. सरळ, स्पष्ट प्रश्न विचारला तर ते जातीचं समर्थन करत नाहीत; पण त्यांच्या लेखन व भाषणात हा मुद्दा स्पष्टपणे ते मांडत नाहीत. त्यांची पुस्तके वाचताना आतापर्यंत मी हा मुद्दा टाळत होतो, पण अजूनही सातत्याने ते जातिव्यवस्था टिकावी, अशा प्रकारे देशीवादाची मांडणी करताना दिसतात. साहित्य अकादमीतर्फे पणजी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डॉ. नेमाडे म्हणतात, ‘जातिव्यवस्थेने या उपखंडातील बहुविविधतेला सांभाळून तर ठेवलं आहेच; परंतु सामाजिक स्थैर्य न बिघडवता हजारो आतल्या व बाहेरच्या, नाना वंशाच्या समूहांना युगानुयुगे आपली स्वायत्तता अबाधित ठेवून एकत्र नांदवलं आहे.’ भारतीय राज्यघटनेने जातिव्यवस्थेला मूठमाती दिली आहे; पण दुर्दैवाने ती अस्तित्वात आहे. मग डॉ.नेमाडे राज्यघटनेला विसरले की काय? जातिव्यवस्थेबद्दलची त्यांची ही विधाने आजच्या घडीला आमच्यासारख्याच नव्हे तर समस्त समतावादी जनतेला क्लेशदायक वाटत आहेत. संकुचित आणि सनातनी, शोषित परंपरांना नाकारणारे डॉ.नेमाडे या बाबतीत आपली मते अशी का मांडतात, असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज प्रथमच त्यांच्या या मतांचा विरोध करावासा वाटतो. मानवी जीवनाच्या विकासक्रमात अनेक गोष्टी बदलत आहेत. त्यामध्ये ज्यांना जातीच्या माध्यमातून समाजामध्ये उपेक्षित ठेवून घोर दारिद्र्यात ढकलून दिले आणि जातिव्यवस्थेसारख्या अंधारकोठडीत बंदिस्त करून ठेवले, अशा या यातनामय जीवनातून प्रकाशाचा अंधुकसा कवडसा शोधत आता कुठे स्वातंत्र्याचा जरासा मोकळा श्वास मिळायला सुरुवात झाली आहे. त्याचेच डॉ.नेमाडेंना हे दु:ख वाटते की काय, असा प्रश्न मला पडला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तर संपूर्ण आयुष्य याच लढ्यासाठी समर्पित झाले आहे. त्यांनी जाती या विषयावर आपला प्रबंधच लिहिला आहे. ते म्हणतात की, ‘जातिव्यवस्थेने भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचे काम केले आहे,’ असे स्पष्ट करून ते पुढे म्हणतात की, ‘मला जर कोणी प्रश्न विचारला की, आदर्श समाज कोणता? तर मी सांगेन, स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर आधारलेला समाज.’ त्यांचे हे विचार डॉ. नेमाडेंना माहीत नसतील असे कसे म्हणता येईल? तरीही ते देशीवादाच्या आधाराने हा विषय पुन:पुन्हा का मांडतात, हे समजायला मार्ग नाही.