आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमाड-स्थान (अग्रलेख )

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘लेखक समाजापासून वेगळा नसतो. तो समाजाच्या अबोध मनात बुडी मारून जे मिळवतो ते लिहितो. समाजमनात जो अस्वस्थपणा आहे तो लेखकाने टिपला पाहिजे,’ अशी भालचंद्र नेमाडे यांची साहित्याविषयीची भूमिका आहे. नेमाडे यांनी याच भूमिकेतून गेली 50 वर्षे मराठी साहित्यामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 1960 पर्यंत मराठी साहित्यात मुरलेली स्वप्नरंजकता व पलायनवाद यांच्यावर जोरदार प्रहार नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीने केला. या प्रहारामुळे मराठी साहित्याचे आयाम बदलले व तिचे क्षितिज अधिक विस्तारले. साहित्याची शैली आणि लय यांच्या प्रस्थापित समजुतीला त्यांनी आपल्या लेखनातून धक्के दिले. नेमाडे यांना मानणारे, त्यांच्या शैलीचा अनुनय करणारे ‘नेमाडपंथीय’ असा नवा साहित्यप्रवाह जन्माला आला. शिवाय ‘देशीवाद’ हे नवसाहित्य मूल्य पुढे मराठी साहित्यात दिसून आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठेच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्कारासाठी यंदा भालचंद्र नेमाडे यांची निवड झाली आहे.

ही निवड सर्वार्थाने त्यांच्या साहित्याची गौरवास्पद दखल आहे. नेमाडे यांची ‘कोसलाकार’ अशी जरी ओळख असली तरी त्यांनी त्यांच्या साहित्यप्रवासाची सुरुवात कवितेच्या माध्यमातून केली होती, हे विशेष. त्यांचे ‘मेलडी’ आणि ‘देखणी’ हे दोन काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय झाले ते त्यांनी व्यवहारी जगावर, वास्तवावर उपरोधिक भाष्य करणा-या कविता लिहिल्यामुळे. नेमाडे हे कविता आणि कादंबरी हे दोनच साहित्यप्रकार मानतात. या भूमिकेवर ते आजही कायम आहेत. 60 च्या दशकात अनियतकालिकांच्या चळवळीत नेमाडे यांनी यासंबंधात लेखन (‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो, तो का?’) करून प्रस्थापितांच्या विरोधात शड्डू ठोकले होते. पुढे ‘कोसला’, ‘बिढार’, ‘झूल’, ‘जरीला’ आणि ‘हिंदू..’ अशा प्रदीर्घ पटाच्या कादंबरीतून त्यांनी मराठी माती, मराठी समाज, जातव्यवस्था, राजकारण, पाश्चात्त्य परंपरा-मूल्यांची चिकित्सा, देशीवाद, मराठी साहित्य अशा जाणिवांवर टोकदार भाष्य केले. त्यांच्या सडेतोड, बुद्धिभेदी, संपूर्ण मानवी संस्कृतीला कवेत घेणा-या भूमिकेमुळे ते टीकेला जेवढे पात्र ठरले; तसे त्यांचा स्वत:चा दबदबा, दहशतवाद मराठी साहित्य वर्तुळात निर्माण झाला. नेमाडेंच्या साहित्यातील नायक हा आक्रमक आहे. कारण आक्रमकता हे मानवजातीचे वैशिष्ट्य असून माणसातल्या आक्रमकतेला वळण देण्याचे काम समाजाचे असते, असे नेमाडे म्हणतात. त्यामुळे नेमाडे यांचा नायक स्वत:च्या सांस्कृतिक संचिताचा शोध घेत गौरवशाली (?) इतिहासाशी तादात्म्य पाहू इच्छितो.

नेमाडे यांची देशीवाद किंवा हिंदू हे भूसांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, असे सांगणारी भूमिका समीक्षकांना ‘नेमाडे विरुद्ध इतर मराठी साहित्य’ अशी विभागणी करण्यास भाग पाडते. पण मराठी साहित्यात अरुण साधू, विलास सारंग, मेघना पेठे, श्याम मनोहर अशा लेखकांनी कमालीची उंची गाठून सकस साहित्याची निर्मिती केली आहे. तरीही नेमाडे हे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत का, या विषयावर चर्चा होताना दिसते. अशा साहित्यिक वादातून लेखकाच्या समग्र मानवी जीवनाविषयीच्या भूमिकेची मीमांसा होते व लेखकाची विचारधारा स्पष्ट होते. नेमाडे त्यांच्या वादग्रस्त (!) भूमिकेमुळे अनेक वेळा हिंदुत्ववादाच्या विरोधी वाटतात, पण दुसरीकडे गौरवशाली देशी (हिंदू) संस्कृतीविषयी ममत्व दाखवणारे वाटतात. त्यांची जागतिकीकरणासंदर्भातील भूमिका नव्या जगाचा स्वीकार करणा-यांना पटत नाही. त्याचबरोबर ‘शेक्सपिअरला समजून घेण्याअगोदर भवभूती वाचा’ असे त्यांचे विधान पाश्चात्त्य संस्कृतीच्या विरोधातील ठाम विधान वाटते. या विरोधामुळे संस्कृतिपूजकांना नेमाडे जवळचे वाटतात, तर आधुनिकवाद्यांना ते प्रतिगामी वाटतात. नेमाडे देशीवाद किंवा जागतिकीकरणाची भूमिका मांडतानाही इंग्रजी राजवटीला थोडे श्रेय देतात आणि उरलेले श्रेय स्वत:कडे घेतात. पण तरीही एकंदरीत साहित्याच्या अंगाने विचार केल्यास नेमाडेंचा नायक बदलती खेडी, बदलते समाजजीवन, तंत्रज्ञान, कृषिव्यवस्था यांचा समग्र विचार करतो. त्यांच्या मुळाशी जातो. इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. तो कष्टाळू आहे, त्याला लौकिक अर्थाने जीवन जगायचे नाही. त्याची मानवी व्यवहारांविषयीची मते थेट आहेत. तो बंडखोर आहे. हा नायक एका अर्थाने प्रचंड बुद्धिवान आहे, संवेदनशील आहे. तो स्वत्वाच्या शोधात आहे. संस्कृती नामक समृद्ध अडगळ त्याला पुढील पिढीकडे संक्रमित करायची आहे. उद्याचे संघर्ष हे धर्मा-धर्मात, देशा-देशात नसून ते संस्कृतीत असतील, असे भाकीत त्यांचा नायक करत असतो. मानवी जीवनाला जगण्यासाठी धर्माची गरज आहे; म्हणून माणूस धर्माचे जोखड स्वीकारतो, असा मोठा साहित्य व्यवहार नेमाडे गेली 50 वर्षे आपल्या साहित्यातून मांडत आहेत. साहित्याशी त्यांची बांधिलकी या कालावधीत कधीही ढळलेली नाही. त्यामुळे या देशात प्रस्थापितांविरोधात जी काही राजकीय आंदोलने, निदर्शने, चळवळी झाल्या तरीही साहित्यिक बांधिलकी जपणे त्यांनी अधिक श्रेयस्कर मानले. नेमाडेंची राजकीय विचारसरणी कोणती आहे? किंवा असेही विचारता येईल की त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान काय आहे? त्यांच्या लेखनावरून असा भास होतो की ते ‘बंडखोर’ आहेत; परंतु ‘बंडखोरी’ हा मराठी साहित्यातील तसा प्रचलित प्रवाह आहे - अगदी केशवसुतांपासून आचार्य अत्र्यांपर्यंत आणि भाऊ पाध्यांपासून दलित पॅँथर्सपर्यंत. नेमाडे या प्रवाहांनाही समांतर आहेत-आणि तरीही त्यांच्या बंडखोरीची राजकीय-वैचारिक चौकट त्यांनी कधीही स्पष्ट केलेली नाही.

राम मनोहर लोहिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी अलीकडे अण्णा हजारे-अरविंद केजरीवाल हे सर्व बंडखोरांचेच निशाण घेऊन राजकीय जंतरमंतर करत होते. नेमाडे या सर्वच साहित्यिक व राजकीय बंडखोरीपासून दूर राहिलेले दिसतात. त्यांचे टीकाकार याला नेमाडेंचा संधिसाधूपणा असे संबोधतात. तसे त्यांना संबोधणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, पण जर त्यांनी त्यांची भूमिका ढोबळ ‘देशीवादा’च्या पलीकडे जाऊन केली तर त्यांच्यावर तसा आरोप कुणी करू शकणार नाही. मग ‘नेमाड-स्थान’ अबाधित राहील आणि नेमाडपंथीयांनासुद्धा त्या ‘स्थाना’वर अधिकार सांगता येणार नाही.