आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तटस्थ’ मैदानाच्या शोधात !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याला शाळेत शिकताना बसायला अजून बाकडी मिळत नाहीत, त्याने वातानुकूलित वर्गात बसलेल्या मुलांशी स्पर्धा कशी करायची? ज्याच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटलेला नाही, त्याने आधुनिक जगात कशी तग धरायची, ज्याच्याकडे अशी काही कला आहे की जणू जादूच; पण त्याला कधी संधीच मिळाली नाही तर करणार काय, तो किंवा ती, शुद्ध खेळ म्हणून पाहाल तर त्यांचा हात कोणी धरू शकणार नाहीत; पण जगाने घालून दिलेले नवे नियमच तेथपर्यंत पोहोचले नाहीत, तर त्यात त्यांची चूक काय? शरीरकष्टाच्या कामात तो कधी मागे हटला नाही, पण नवे जग त्या कष्टाला ओळखतच नाही, तर अशा वेळी काय करायचे? जीवन जगण्यासाठी सर्वांना ‘सारखे मैदान’ (लेव्हल प्लेइंग फील्ड) मिळाले पाहिजे, असे म्हटले जाते खरे; पण मानवी समाजाचा तो प्रवास अजून फार लांबचा पल्ला आहे, याची शेकडो नव्हे, हजारो उदाहरणे वर्तमान जगात उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहेत. असे असताना ‘नेट न्यूट्रॅलिटी’ किंवा नेट तटस्थतेचा प्रश्न ऐरणीवर यावा? जीवन जगतानाच्या जीवनावश्यक, प्राथमिक गरजांच्या संदर्भात अजून ही तटस्थता माणूस प्रस्थापित करू शकला नाही, मात्र कालपरवा आलेले नेट ती तटस्थता मागते आहे, ही विसंगती खरी, पण कदाचित त्यातूनच जीवनातील ही अतिशय महत्त्वाची तटस्थता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न वेग घेतील. ‘नेट न्यूट्रॅलिटी’बाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा गुरुवारी प्रकाशित झालेला अहवाल या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, तो त्यासाठी. हा अहवाल दूरसंचार विभागाचा नसला तरी त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे, असे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. हुशारी आणि भांडवलाच्या आधारावर समाजाचे व्यवहार विकत घेण्याचे किंवा त्यांची मने काबीज करण्याचे प्रयत्न जगात धुमाकूळ घालत आहेत. तुम्ही कोठे जावे, कशाने जावे, काय विकत घ्यावे, कोणते कपडे घालावेत, कोणते अन्न खावे, कोणती यंत्रे वापरावीत, कोणत्या सेवा घ्याव्यात, कशाविषयीचा अभिमान बाळगावा, एवढेच नव्हे, तर कशाला चांगले म्हणावे आणि कशाला वाईट म्हणावे, याचे नियंत्रण आधुनिक जाळे करते आहे. आवडीनिवडीचा हा प्रांत ज्याचा-त्याचा आहे आणि तो ज्या नेत्याने त्याला पाहिजे तसा वापरला पाहिजे, याचेही भान या जाळ्याने हिरावून घेतले आहे.
वाढत्या महागाईत जवळजवळ फुकट वापरायला मिळालेल्या फेसबुक, स्काइप, व्हॉट्सअॅप, वायबर आणि अशा शेकडो सेवांवर समाजाच्या उड्या पडत आहेत. काही अपवाद सोडले तर मानवी व्यवहारांची एक निरर्थक साखळी त्यातून तयार होते आहे. मात्र, या निरर्थक साखळीचे विश्लेषण करून त्यात व्यापाराच्या संधी शोधल्या जात आहेत. हाही माणूस आणि तोही माणूसच! काही तरी चुकते आहे, हे तर सर्वांनाच पटते आहे, मात्र जे चुकते आहे, ते आपण दुरुस्त करू शकत नाही, याची खंतही आहे. अशा सामूहिक विचाराचे संकलन आणि विश्लेषण कोणी तरी शहाण्या आणि अधिकार असलेल्या माणसांनी केले पाहिजे. तेच काम या समितीने केले आहे. त्यामुळे भविष्यात फेसबुक, स्काइप, व्हॉट्सअॅप, वायबरसारखी साधने फुकट वापरायला मिळणार नाहीत. ही साधने फुकट वापरायला देऊन मनावर राज्य करणाऱ्या कंपन्यांवर काही बंधने येतील. प्रत्येक देश त्यासंबंधीचे आपले स्वतंत्र धोरण तयार करील आणि देशाची सुरक्षितता अबाधित ठेवील. अतिआधुनिक साधने समाजाच्या हातात देण्याचे ईप्सित बऱ्याच प्रमाणात आम्ही साध्य केले आहे, असे जगातील तंत्रज्ञ आणि भांडवलदार म्हणू शकतील, मात्र ते वापरण्याचा विवेक समाजालाच तयार करावा लागेल, हेच ए. के. भार्गव यांच्या नेतृत्वाखालील समितीने म्हटले आहे. ‘लेव्हल प्लेइंग फील्ड’ तत्त्वाचा अशा फुकटच्या सेवांमुळे भंग होतो, असा उल्लेख या समितीने केला आहे, तो अर्थात सध्याच्या टेलिकॉम कंपन्या आणि त्यांच्या पोटात घुसून सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात. पण हा विचार समाजाच्या सर्वच क्षेत्रांत झाला पाहिजे, असे म्हणण्यात वावगे ते काय? जसे की शेतकरी धान्य पिकवतो आणि तेच अन्न खाणारा समाज मात्र त्याला लुटतो, मग येथेही का नको लेव्हल प्लेइंग फील्ड? तसे ते कामगार-मालकाच्या संबंधात का नको? देशांच्या चलनांच्या संदर्भात का नको? शहर आणि ग्रामीण भागासाठी का नको? अन्नपाणी, शिक्षण, आरोग्य, निवास आणि नैसर्गिक संपत्तीच्या वाटपात का नको? लेव्हल प्लेइंग फील्ड न देता काही माणसे आज मुजोर झाली आहेत आणि ज्यांना ते मिळत नाही, ती लाचार. तोच प्रश्न या समितीने नेट या एकासंदर्भात विचारला आहे. समितीला धन्यवाद दिले पाहिजेत की, त्यांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वाचा उल्लेख करून त्या दिशेने विवेकी वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली आहे. ती विवेकी वाटचाल सर्वच क्षेत्रांत होईल तेव्हा समाजाला फक्त ‘नेट न्यूट्रॅलिटी’ची चर्चा करण्याची गरज पडणार नाही!
बातम्या आणखी आहेत...