आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटीएल’ जाहिरातींचे नवीन प्रवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नको असलेल्या जाहिरातींमुळे सामान्य लोक वैतागले असले तरी देशातील कोणतीही जागा वा प्रसारमाध्यम शिल्लक नाही की जिथे जाहिरातींचे अतिक्रमण पाहायला मिळणार नाही. म्हणजेच जाहिरात जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या आहेत. सामाजिक जबाबदारीची बांधिलकी असणारी वृत्तपत्रे, नभोवाणी किंवा दूरचित्रवाहिन्यांसारख्या प्रसारमाध्यमांनासुद्धा आता जाहिरातींना प्राधान्य द्यावे लागते (पत्रकारितेला दुय्यम स्थान द्यावे लागत आहे) हे नव्याने सांगायला नको. त्याचे कारणही तसेच आहे. वृत्तपत्राचा निर्मिती खर्च आणि वृत्तवाहिन्यांना 24 तास रवंथ करायचे असेल तर जाहिरातींशिवाय महसूल उभे करण्यासाठी दुसरा पर्यायच नाही. या माध्यमांत जाहिराती देणे हे सर्वसामान्य जाहिरातदारांना परवडणारे नाही म्हणून स्वस्त पर्याय शोधण्याचे काम निरंतर चालू आहे. अनेक अपारंपरिक जाहिरात माध्यमे उपलब्धसुद्धा झाली आहेत व पुढेही होत राहणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जाहिराती एटीएल आणि बीटीएल अशा दोन प्रकारात घेतल्या जातात. रेषेवरील म्हणजेच ‘अबव्ह द लाइन’ (एटीएल) जाहिराती, ज्या वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ या तिन्ही माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचत असतात. दुसरा प्रकार आहे रेषेखालील म्हणजेच ‘बिलो द लाइन’ (बीटीएल) जाहिराती, ज्या इतर अपारंपरिक माध्यमांद्वारे आज गाजत आहेत. साधारणपणे एटीएल जाहिरातीच्या मुख्य कार्यांपैकी उत्पादनाच्या ब्रँडची निर्मिती करणे हे प्रमुख कार्यसुद्वा असते, तर बीटीएल जाहिराती आपले टार्गेट उपभोक्ते बनवण्यावर भर देतात. मार्केटिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते एटीएल आणि बीटीएल या संकल्पना अकाउंट आणि जाहिरात एजन्सीमार्फत उदयास आलेल्या आहेत. एटीएलमुळे एजन्सीच्या खात्यात पैसे वाढतात म्हणून ‘अबव्ह द लाइन’ व अपारंपरिक माध्यमांद्वारा प्रसारित जाहिरातींवर कमिशन किंवा टक्केवारी मिळत नसल्यामुळे ‘बिलो द लाइन’ असे म्हटले जाते.
प्रख्यात मार्केटिंग तज्ज्ञ कपिल तनेजा म्हणतात, काही वेळा बजेट कमी आल्यानेही बीटीएलला प्राधान्यक्रम द्यावा लागतो. एकदिवसीय क्रिकेट, टी -20 तसेच आयपीएलसारख्या क्रिकेटच्या महाकुंभात मैदानावर असणार्‍या खेळाडूंकडे बारकाईने पाहा, किती कंपन्यांनी त्यांना तुकड्या-तुकड्यांत करारबद्ध केलेले आहे. त्यांच्या गणवेशावर तसेच मैदानावर जागोजागी जाहिरातीच असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच निवृत्ती घेतली. त्याच्यामुळेच क्रिकेटला पैसा मिळवण्याचे निमित्त वाढीस लागले, असे क्रिकेटच्या दिग्गजांना वाटते.
बीटीएलमधील नवीन प्रवाह- बीटीएल जाहिरातींचे विविध प्रकार लोकप्रिय होऊ पाहत आहेत. यात पुढील प्रकारांचा प्रामुख्याने समावेश होतो- 1) स्काय रायटिंग, बलून जाहिराती. 2) हेलिकॉप्टरचा वापर करून आकाशात मोठमोठे बॅनर फडकावणे. 3) मोठमोठ्या पतंगांच्या माध्यमातून जााहिरात करणे (जायंट काइट्स). 4) चित्रपटातील गाण्यांचा वापर. 5) रोड शोज, प्रदर्शन, सेल. 6) विविध वाहनांवरील जाहिराती. 7) टेलिमार्केटिंग. 8) एसएमएस, ई-मेलद्वारे. 9) मोबाइलवरून संपर्क. 10) इंटरनेट साइट्सवर. 11) डाऊनलोड केलेल्या सॉफ्टवेअरसोबत, सिग्नेचर ट्यूनचे रिंग टोन. 12) दूरचित्रवाहिन्या. 13) एसटीचे तिकीट, लाइट बिल, फोन बिल, काडेपेटीवर, वह्या, रजिस्टर, भिंती आदींवर जाहिराती देणे. याशिवाय विक्रीची ठिकाणे निर्मिती करणे, प्रमोशन्स, विक्री मोहिमा, फिरत्या वाहनातून लोकांशी संवाद साधणे, फ्री व डिस्काउंट अशा सवलतीतून उत्पादने विकणे, शहरात ठिकठिकाणी प्रदर्शनीय ठिकाणी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक बोर्डवरील हलत्या जाहिराती सर्व बीटीएल प्रकारात मोडतात. याच प्रकारे मुद्रित माध्यमाचा भाग असलेले पोस्टर्स, बॅनर्स, घडी पुस्तिका (फोल्डर्स), पॅम्प्लेट्स, माहिती पुस्तिका, हस्तपत्रे (हँड बिल्स), होर्डिंग्ज, फ्लेक्स बोडर््स, ग्लो साइन बोर्ड्ससुद्धा बीटीएल जाहिरातीत मोडतात. यातील माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून केल्या जाणार्‍या जवळपास सर्वच जाहिराती मोफतच असतात व त्यामार्फतच संपूर्ण जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचता येते हेही या जाहिरातींच्या लोकप्रियतेमागील एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारच्या जाहिरातींमुळे जगभरातील टार्गेट उपभोक्त्यापर्यंत इतरांना त्रास न देता संपर्क करता येतो. हे सर्व फंडे नवीन असल्याने लोक याकडे आकर्षित होतात आणि याचाच फायदा जाहिरातदारांना होतो. कोणत्याही जुन्या वस्तू विकण्यासाठी आमच्या पोर्टलवर मोफत जाहिराती द्या, असे सांगणारे ओएलएक्स, क्विकरसारखे अनेक व्यावसायिक पोर्टल्स आहेत, ज्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. हल्ली जाहिरातीचे मुख्य कार्य उत्पादनांची विक्री करणे नव्हे, तर लोकांना (ग्राहक नव्हे) विक्रेत्यांपर्यंत पाठवणे असल्याचे दिसून येते. कारण जर जाहिराती लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत असतील तर त्याचा सकारात्मक परिणाम उत्पादन किंवा सेवेवर होतो. उत्पादनाची गुणवत्ता येथे कुचकामी ठरते.