आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसंस्कृततेच्या चिंधड्या (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव राज्य विधानसभेत अराजकी वातावरणात संमत झाला खरा; पण सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील अंतर्गत वादाबरोबरच या पक्षाच्या विरोधात असलेल्या द्रमुक पक्षाबरोबरचा संघर्ष आणखी चिघळणार हे नक्की. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये शशिकला व पन्नीरसेल्वम यांनी पक्ष आपल्या कब्जात ठेवण्यासाठी परस्परांविरुद्ध जी घनघोर लढाई सुरू केली होती त्यात शशिकला गटाचे पारडे वरचढ ठरले. 
 
पन्नीरसेल्वम यांची पक्षातूनच हकालपट्टी करून शशिकला मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत असतानाच बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकलांना थेट तुरुंगातच धाडले. साहजिकच शशिकलांच्या समर्थक आमदारांनी मुख्यमंत्रिपदी  इडापडी पलानीस्वामी यांची निवड केली. पन्नीरसेल्वम यांच्यामागे अतिशय नगण्य संख्येने आमदार आहेत. तेही भविष्यात त्यांची साथ सोडू शकतात. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणातून पन्नीरसेल्वम आता हळूहळू हद्दपारच होतील.
 
 पलानीस्वामी यांनाही मुख्यमंत्री म्हणून सुखाने राज्यकारभार करता येईल अशी परिस्थिती तामिळनाडूमध्ये सध्यातरी नाही. तामिळनाडूमध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर अण्णा द्रमुकच्या जयललिता व द्रमुकचे करुणानिधी यांच्याभोवतीच गेली तीन दशके राज्यातील राजकारण फिरत होते. आता त्यातील जयललिता नाहीत. करुणानिधी थकले आहेत. 
 
तामिळनाडूसह दाक्षिणात्य राज्यांमध्ये राजकारण तसेच सामाजिक अाविर्भाव अतिशय भडकपणे करण्याची पद्धत असल्याने जयललितांचे राजकीय वारसदार तसेच करुणानिधींचे वारसदार गोंधळ घालतील हीच अपेक्षा होती. पलानीस्वामी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घ्यावे, ही मागणी विधानसभेच्या अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर द्रमुक सदस्यांनी सभागृहात जे प्रचंड अराजकीय वातावरण निर्माण केले, त्याला त्या पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांची फूस होती. 

आपले नाव स्टॅलिन असल्याने मार्शल स्टॅलिनप्रमाणे आपणही हुकूमशहा आहोत असा या एम. के. स्टॅलिन यांचा अाविर्भाव आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या निषेधार्थ द्रमुक सदस्यांनी सभागृहात जो धुमाकूळ घातला, विधानसभा अध्यक्षांची खुर्चीच ताब्यात घेण्याचा अश्लाघ्य प्रकार केला, त्याचे स्टॅलिन यांनी एक प्रकारे निर्लज्ज समर्थनच केले.
  
देशात एकूणच राजकीय संस्कृतीचे जे धिंडवडे निघत आहेत त्याचाच मुक्त अाविष्कार तामिळनाडूमध्ये वेळोवेळी दिसत आला आहे. १९८७ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जयललितांना  मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी मुख्यमंत्री  एम. करुणानिधी यांच्या कारकीर्दीत द्रमुकच्या आमदारांची मजल तामिळनाडू विधानसभेतच तत्कालीन विरोधी पक्षनेत्या जयललिता यांची साडी फाडण्यापर्यंत गेली होती. त्याचा बदला जयललिता पुढे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी घेतला. 
 
१२ कोटी रुपयांच्या फ्लायओव्हर बांधकाम घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याचे निमित्त करून २००१ मध्ये एम. करुणानिधी यांना त्यांच्या निवासस्थानातून  पोलिसांनी मध्यरात्री अक्षरश: खेचून नेले व अटक केली होती. हे सारे जयललितांच्या आदेशावरूनच झाले हे उघड सत्य होते.
 
 
 आपल्या फाडण्यात आलेल्या साडीची दर्दभरी कहाणी प्रसारमाध्यमांद्वारे मतदारांसमोर आणून त्यांची सहानुभूती मिळविण्याची जी धूर्त खेळी जयललितांनी केली होती, तशीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न शनिवारी तामिळनाडू विधानसभेच्या गदारोळात आपला फाडण्यात आलेला शर्ट प्रसारमाध्यमांसमोर दाखवून एम. के. स्टॅलिन यांनी केला! 
 
 पण त्याचा मतदारांवर फार प्रभाव पडेल असे दिसत नाही. तामिळनाडूत मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांच्यावरील विश्वास ठराव संमत झाला असला तरी तामिळनाडूच्या मागे लागलेली  राजकीय अस्थिरतेची इडापिडा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत.
 
तामिळनाडूइतका नसेल, परंतु महाराष्ट्रात होत असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका तसेच उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांतही विविध पक्षांनी  प्रचारादरम्यान राजकीय संस्कृतीची नीचतम पातळी गाठल्याची उदाहरणे समोर आलीच. 
 
परस्परांवर आरोपांची चिखलफेक करण्यातच या पक्षांच्या नेत्यांनी धन्यता मानली. देशाला आज व्यक्तिकेंद्री नव्हे, तर जनहिताच्या ठोस मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्यांची खरी गरज आहे. तामिळनाडूच्या नावे नाक मुरडतानाच आपल्याही पायाशी काय जळते आहे, हे प्रत्येक राजकीय नेत्याने पाहावे. तशी नजर राखणे हीच सुसंस्कृत राजकारणाची बूज राखण्याची पहिली पायरी असेल!
 
बातम्या आणखी आहेत...