आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडमध्ये नव्या सिलिकॉन व्हॅलीचा उदय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९७० च्या दशकात एका वर्तमानपत्राच्या हेडलाइननंतर ‘सिलिकॉन व्हॅली’ या शब्दाची उत्पत्ती झाली होती. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोतील एका विस्तृत परिसरात आयटी कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक देशांनी ‘सिलिकॉन व्हॅली’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र ते अपयशी ठरले. जग बदलत गेले आणि त्यानुसार राजकीय परिस्थिती बदलत आहे. परिणामी आता न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आणि ऑकलंडमध्ये सिलिकॉन व्हॅली बनू पाहतेय. हळूहळू ती फुलतसुद्धा आहे. पूर्वी अमेरिकेत असलेल्या काही कंपन्या येथे सुरू होत आहेत. अमेरिकेतील वातावरण आणि किचकट व्हिसा नियमांमुळे आयटी तज्ज्ञांचा मोर्चा न्यूझीलंडकडे वळत आहे. अनेकजण सिलिकॉन व्हॅलीतून ऑकलंडमध्ये स्थलांतरित झाले असून तेथे नवी कंपनीही सुरू केली आहे.  
 
काही दशकांपूर्वी न्यूझीलंडला सॉफ्टवेअर उद्योगांची फार गरज नव्हती, पण आता आयटी तज्ज्ञांचा आसरा म्हणून या देशाची नवी ओळख बनू पाहतेय. ब्रेग्झिटमुळे लंडनकडे असणारा ओढाही कमी झाला आहे. त्यामुळे आयटी उद्योजकांमध्ये कुठे तरी अस्थिरतेची भावना होती. पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये १०० विकसकांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ‘वाइन देम, डाइन देम अँड ऑफर देम जॉब’ असा प्रचार सुरू आहे. यासाठी कमीत कमी २,५०० अर्ज येतील, अशी आशा होती. मात्र ‘लुक सी वेलिंग्टन’ उपक्रमाअंतर्गतच ४८,००० अर्ज आले. त्यात गुगल, अॅमेझॉन, फेसबुक, एमआयटी आणि नासाशी संबंधित लोकांचा अधिक समावेश आहे.  

न्यूझीलंडने स्वत:ला अशा प्रकारे विकसित केले आहे की, जगभरातील प्रतिभावान आपोआपच या देशाकडे वळू लागले आहेत. राहण्याचा खर्च, हेदेखील यामागील मोठे कारण आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहण्यासाठी खूप खर्च होतो, पण वेलिंग्टन आणि ऑकलंडमध्ये कमी पैसे लागतात. वेलिंग्टन रिजनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एजन्सीचे जीएम डेव्हिड जोन्स म्हणतात, आता ग्रह बदलले आहेत. नव्या लोकांमुळे न्यूझीलंडला नवी ओळख मिळत आहे. ते या देशातील वातावरण आणखी अनुकूल बनवतील.  

सॅन फ्रान्सिस्को सोडून न्यूझीलंडमध्ये दोन कंपन्या स्थापन करणारी एलना इरविंग (३३) म्हणते, ‘मला अमेरिकेत खूप तुटल्यासारखे जाणवत होते. आजूबाजूला अनेक गोष्टी घडत होत्या, पण त्यांच्याशी मी सहमत होते की नाही, हे कळत नव्हते.’
 
सिलिकॉन व्हॅली स्थापन करण्याचे स्वप्न न्यूझीलंडने यापूर्वीही पाहिले होते. पहिल्या प्रयत्नात या देशाने मोठमोठी आश्वासने दिली होती. पण ती पूर्ण केली नाहीत. तो काळ वेगळा होता, पण या वेळी बऱ्याच गोष्टी नव्या आहेत. न्यूझीलंडचे नागरिकत्व मिळण्यासाठी पाच वर्षांतील ७० टक्के वेळ इथे घालवणे आवश्यक आहे. भविष्यात आपण इथेच राहणार आहोत, अशी हमी द्यावी लागते. पे-पाल आणि फेसबुकमध्ये गुंतवणूक करणारे अमेरिकन उद्योगपती पीटर थियल यांनी काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये व्यवसाय सुरू केला होता. त्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेत सहभागी व्हायचे होते. फेब्रुवारी २०११ मध्ये क्राइस्ट चर्च शहरात भूकंप झाल्यानंतर थियल यांनी ५ कोटी २७ लाख रुपयांचा मदतनिधी दिला. त्यानंतर थियल यांना नागरिकत्व मिळाले. आपल्यासाठी मोठा गौरवास्पद क्षण यापेक्षा अन्य कोणताही नसेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली. थियल यांना न्यूझीलंडमध्ये गुंतवणूक केल्याचा लाभ झाला. मात्र त्यांचे व्यावसायिक हितसंबंध इतरही अनेक देशांशी आहेत.  
 
न्यूझीलंडमधील स्थानिक मार्केटमध्ये शेळ्या-मेंढ्यांचे दूध व दुग्धजन्य उत्पादनांची निर्यात अधिक होते. ‘वलार व्हेंचर्स’ ही इन्व्हेस्टमेंट फर्म सुरू झाल्यानंतर या फर्मने तेथील ‘झीरो’ या ऑनलाइन अकाउंटिंग सॉफ्टवेअर फर्ममध्ये ३ दशलक्ष डॉलर्स गुंतवले. १४०० कर्मचाऱ्यांच्या झीरो फर्ममध्ये १८० देशांमध्ये क्लाएंट आहेत. ही न्यूझीलंडमधील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग यांच्याप्रमाणेच झीरोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्थान आहे.  
अमेरिकेतील सॉफ्टवेअर अभियंत्यांना आकर्षित करण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘लुक सी वेलिंग्टन’ या उपक्रमाची सुरुवात झाली होती. मात्र अमेरिकनांप्रमाणेच भारतीयांवरही याचा प्रभाव पडला आहे. न्यूझीलंडमध्ये आलेल्या अर्जांच्या संख्येत अमेरिकेपेक्षा भारतीयांची
संख्या अधिक आहे. अमेरिकेने यापूर्वी ज्याप्रमाणे विदेशी प्रतिभेचे स्वागत केले होते, तीच भूमिका आता न्यूझीलंडची आहे. आज या देशातील मोठे भांडवल असलेल्या ५० टक्के कंपन्या विदेशी नागरिकांनी स्थापन केलेल्या आहेत.
 
जॅकलीन विल्यम्स (सिडने) , डेव्हिड स्ट्रेटफेल्ड (सिलिकॉन व्हॅली प्रतिनिधी- पुलित्झर पुरस्कार विजेता)
बातम्या आणखी आहेत...