आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई वाहतुकीत भारत अव्वल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्ता, रेल्वे आणि जलवाहतुकीच्या अनेक पायऱ्या अजून आपल्याला चढायच्या असताना हवाई वाहतूक हा भारतासारख्या विकसनशील देशाचा प्राधान्यक्रम होऊ शकतो का, या मुद्द्याची अशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, हे ठरविणे अवघड आहे. 
 
मात्र, आधुनिक जगात वेगवान प्रवासाचे नवे-नवे मार्ग शोधले जात असून या नव्या जगात भारताला मागे राहता येणार नाही. त्यामुळेच ज्यांच्या दृष्टीने हवाई प्रवास ही आमबात झालेली नाही, ते कोट्यवधी भारतीय नागरिक विमान प्रवासाचे आज स्वप्न पाहतात आणि ती संधी आली तर हरखून जातात. 
 
नोटाबंदी आणि अर्थक्रांतीच्या सादरीकरणाच्या निमित्ताने गेले तीन महिने दिल्ली, मुंबई, पणजी, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, इंदूर असा विमानप्रवास करताना भारतातील हवाई वाहतुकीचे अतिशय आशादायी चित्र समोर आले.
 
देशात होणारा हा बदल एरवी लक्षात येत नाही; पण क्रयशक्ती असलेल्या भारतीय नागरिकांना मार्केट कसे जवळ करते आहे आणि विमानप्रवास हा फक्त अतिश्रीमंतांनी करावा, अशी जी धारणा होती, तीही या देशाने कशी मोडून काढली आहे, याची प्रचिती या प्रवासात आली. 
 
याचदरम्यान एक बातमी वाचनात आली. त्या बातमीत भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. देशात ज्या वेगाने हवाई वाहतूक वाढते आहे, त्या वेगाने पायाभूत सुविधा वाढत नाहीत, अशी चिंता प्रत्यक्ष मुंबई विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी व्यक्त केली होती.
 
 ही चिंता मुंबई आणि दिल्लीपुरती असती तर ते समजण्यासारखे होते, पण ती होती नव्याने पुढे येणाऱ्या गुवाहाटी आणि मदुराई अशा विमानतळांविषयी! याचा अर्थ विमानप्रवास हा काही मेट्रो शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो वेगाने मध्यम शहरांपर्यंत पोहोचू लागला आहे. म्हणूनच प्रादेशिक सेवा देणाऱ्या विमान कंपन्या वाढू लागल्या आहेत. 
 
इंडिगो, स्पाइसजेट, गो एअर, जेट एअरवेज, एअर इंडिया, विस्टारा अशा अनेक कंपन्या असताना गेल्या १५ फेब्रुवारीला झूम एअर नावाच्या कंपनीने या क्षेत्रात प्रवेश केला असून अशा किमान पाच कंपन्या रांगेत आहेत. या कंपन्यांकडे सध्या ४५० विमाने असून त्यात ८८० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे एवढी विमाने पार्क कोठे करायची याची चिंता आताच व्यक्त केली जाते आहे.  
 
युरोप - अमेरिकेत विमान कंपन्या आपला पुरेसा व्यवसाय व्हावा म्हणून धडपडत असताना भारतात हवाई वाहतूक २३ टक्क्यांनी म्हणजे जगात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. भारतात सप्टेंबर २०१५ मध्ये ६६ लाखांवर नागरिकांनी प्रवास केला होता, तर या सप्टेंबर २०१६ मध्ये ८२ लाख नागरिकांनी हवाई प्रवास केला. अशी वाढ जगात सध्या कोठेच पाहायला मिळत नाही. 
 
हवाई वाहतुकीसंबंधीचे काही आकडे जाणून घेतले की ही वाढ किती आहे, हे लक्षात येते. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कमी पडू लागल्याने नव्या मुंबईत जे विमानतळ होते आहे, त्यावर तब्बल १६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
 
भारतीय विमान कंपन्यांनी पुढील २० वर्षांत २६२ अब्ज डॉलरच्या विमाने खरेदीच्या ऑर्डर बुक केल्या आहेत. एकेकाळी भारतीय विमानतळ कसे रेल्वेस्थानके किंवा बसस्थानकांसारखी आहेत, अशी टिप्पणी केली जात होती, पण आता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जगातल्या उत्कृष्ट विमानतळांत समावेश होतो. 
 
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता लंडनच्या हीथ्रो विमानतळाइतकेच कार्यक्षम विमानतळ असल्याचा गौरव झाला आहे, तर अडीच ते चार कोटी प्रवाशांची ये-जा असणाऱ्या विमानतळांच्या निकषांत दिल्लीचे विमानतळ जगात दुसऱ्या क्रमांकाचे असल्याचा गौरव एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने केला आहे. 
 
आपल्या देशात सर्वात जास्त वाहतूक असलेले विमानतळ दिल्लीचे असून त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. दिल्लीत एका दिवसात ८०० वर विमानांची ये-जा होते. गेल्या २४ जानेवारी २०१३ या दिवशी, तर एका तासात तब्बल ७३ विमानांची ये-जा झाली, जो आपल्या देशातील एक विक्रम आहे.  २०१० मध्ये पाच कोटी भारतीय नागरिकांनी विमान प्रवास केला. २०१६ मध्ये हा आकडा १० कोटींच्या घरात गेला. याचा अर्थ सहा वर्षांत देशांतर्गत हवाई वाहतूक दुप्पट झाली आहे. 
  
जगात आता जागतिकीकरण स्थिरावले आहे. त्याचा सर्वात पहिला स्वीकार करावा लागला तो हवाई वाहतूक क्षेत्राला. कारण सुरक्षिततेसाठी जगाने केलेले नियम सर्वच देशांना पाळावेच लागतात.
 
विमान उड्डाण आणि विमान उतरण्याचे, हवाईपट्टीची लांबी आणि दर्जाचे, विमानात दिल्या जाणाऱ्या सूचनांचे, विमानतळावर फिरणाऱ्या मोटार वाहतुकीचे, विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांचे आणि विमानतळावर वापरले जाणारे ते विशिष्ट सांकेतिक शब्द आणि भाषेचे जगभर सारखेच निकष आहेत. ते इतके सारखे आहेत की कोणत्याही विमानात दिले जाणारे आवाज एकाच स्त्री-पुरुषाचे वाटतात! पण त्याला पर्याय नाही. 
 
हा बदल आपल्याला स्वीकारावाच लागतो. जागतिकीकरण म्हणजे सर्व चांगले, असे कोणी म्हणणार नाही, पण काही कोटींच्या संख्येने ज्या वेळी माणसे आकाशात उडू लागतात, तेव्हा हे सपाटीकरण स्वीकारावेच लागते.
 
भारताने जागतिकीकरणाच्या बुटात पाय बसविण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, तो हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात (अजूनही काही त्रुटी असल्या तरी) यशस्वीच झाला आहे, असे म्हटले पाहिजे आणि त्याचा सार्थ अभिमानही असला पाहिजे.

(ymalkar@gmail.com ) 
बातम्या आणखी आहेत...