आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Political Environment Of Maharashtra Politics By Nikhil Wagle

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे असं मानलं जातं. पण राजकारण्यांच्या दृष्टीने उत्सव म्हणजे केवळ शिमगा असावा. महाराष्ट्र विधानसभेच्या सध्याच्या निवडणुकीकडे पाहून तरी यापेक्षा वेगळं काही वाटत नाही. विचारांची होळी आणि भावनात्मक मुद्द्यांची बोंबाबोंब असा सगळा शिमगा चालला आहे. देशातल्या प्रत्येक निवडणुकीत राजकारणाची अधोगती होते आहे. महाराष्ट्र याला अपवाद कसा असेल? राज्याच्या निर्मितीनंतरची ही सगळ्यात निसरडी निवडणूक असावी. घाऊक प्रमाणात झालेली पक्षांतरं, गुन्हेगार आणि कोट्यधीशांना मिळालेली प्रतिष्ठा, पैशाचा नंगानाच या निवडणुकीत सर्वत्र दिसतो आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, ज्या माध्यमांनी या सगळ्यांवर अंकुश ठेवायचा तीही पेड न्यूजच्या रूपाने या शिमग्यात सामील झाली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला येनकेनप्रकारे सत्ता टिकवायची आहे, तर शिवसेना, भाजप, मनसेला ती मिळवायची आहे. त्यासाठी साध्य-साधनविवेक कोणताही राहिलेला नाही. भाजपच्याच जाहिरातीतील ओळ वापरून म्हणावंसं वाटतं - खरोखरच, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
निवडणुकीच्या काळात स्थलांतरित पाखरांना पेव फुटतं. ज्या झाडाला यशाचं फळ लागणार आहे त्या झाडावर या पाखरांचा डोळा असतो. साहजिकच या वेळी या पक्षबदलूंची पसंती भाजपला आहे. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे की भारतीय जनता पक्षाने या पक्षबदलूंना मोठ्या प्रमाणावर उमेदवारीही दिली आहे. भाजप लढवत असलेल्या २५६ जागांपैकी ५९ जागांवर आयात केलेले उमेदवार रिंगणात आहेत. यातले एक तृतीयांशाहून अधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या झाडावरून भाजपच्या झाडावर येऊन बसले आहेत. अर्थात, काँग्रेस, शिवसेना, मनसे वगैरे पक्षांतूनही ही आयात झाली आहे, पण तिचं प्रमाण कमी आहे. उद्या भाजप हा विधिमंडळातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला तर त्याचे किमान एक तृतीयांश उमेदवार पक्षाच्या विचारसरणीशी बांधिलकी मानणारे नसतील. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानीला काँग्रेसचं तिकीट देताना इलेक्टिव्ह मेरिट-निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष शरद पवारांनी लावला होता. त्या वेळी भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी महाराष्ट्रात एकच गदारोळ केला होता.
आज चोवीस वर्षांनंतर भाजप शरद पवारांच्याच या ‘खात्रीलायक’ मार्गाने चाललेला दिसतो आहे. ज्यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले ते राष्ट्रवादीचे माजी मंत्री विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देऊन भाजपने आपला हा ‘वेगळा’ मार्ग अधोरेखित केला. आयात केलेल्या या उमेदवारांत ७० टक्क्यांहून अधिक कोट्यधीश आहेत. म्हणजे ते भरपूर पैसे खर्च करतील याची खात्री करूनच त्यांना तिकिटे देण्यात आली आहेत.
पण भाजपला एकट्यालाच दोष का द्या? शिवसेनेनेही उदय सामंत, दीपक केसरकर, प्रकाश सुर्वे, रवींद्र फाटक, अनिल बाबर अशा काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. सांगलीमध्ये तर पृथ्वीराज पवार हे भाजपचे नेते शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमध्ये पक्षबदलूंचं प्रमाण कमी असण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची विजयाची शक्यता कमी आहे एवढंच. अन्यथा विचार आणि कार्याशी त्यांनाही काही देणंघेणं आहे अशातला प्रकार नाही.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा विषय पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजला होता. अण्णा हजारे आणि गो. रा. खैरनार यांच्या आंदोलनांमधून जनतेचा असंतोष उग्रपणे व्यक्त झाला होता. शरद पवारांना सत्ताही गमवावी लागली होती. पण आता याचा सगळ्या पक्षांना विसर पडलेला दिसतो आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने राज्यातल्या २०३६ उमेदवारांची शपथपत्रं तपासली. त्यापैकी ७९८ म्हणजे ३४ टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. यातल्या २३ टक्के उमेदवारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जातीय तणाव निर्माण करणे, महिलांना त्रास देणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातही शिवसेना आणि भाजप आघाडीवर दिसतात. भाजपने तर या वेळी कमालच केली आहे. तेलगी घोटाळ्यामध्ये तुरुंगवास भोगून आलेल्या अनिल गोटेंना, खुनाचा आरोप असलेल्या माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंना त्यांनी उमेदवारी दिली आहे. छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे त्यांच्या मित्रपक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढतो आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे कलंकित उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर सन्मानाने उपस्थित होते.
जळगावच्या घरकुल घोटाळ्यात अडकलेले सुरेशदादा जैन शिवसेनेच्या तिकिटावर तर गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर थेट तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत. तडीपार झालेला नाशिकचा सुहास कांदे शिवसेनेचा उमेदवार बनला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे आद्य जनक. त्यामुळे त्यांच्या आणि खळ खट्याकवर विश्वास ठेवणा-या मनसेच्या उमेदवारांवर गुन्हे नसतील तरच नवल. उद्या हेच आरोपी उमेदवार राज्याच्या विधानसभेत जाऊन आपल्यासाठी कायदे बनवणार आहेत!

आणखी एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीत राज्यातले ४७ टक्के उमेदवार कोट्यधीश आढळून आले. यापैकी दहा जणांची मालमत्ता शंभर कोटींहून अधिक आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षातले कोट्यधीश उमेदवार वाढलेले दिसतात. राष्ट्रवादीचा आकडा ७६ टक्क्यांहून ८३ टक्क्यांवर गेला आहे, तर भाजप ५४ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर पोहाेचला आहे. काँग्रेसमध्ये २००९ ला ६६ टक्के उमेदवार कोट्यधीश होते, तर आता त्यांचे ८१ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेनेतल्या कोट्यधीशांनीही ४५ टक्क्यांहून ७१ टक्क्यांवर मजल मारली आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान ठिकठिकाणी रोख रकमेच्या गड्ड्या का सापडताहेत याचं उत्तर यातून मिळू शकतं. १५ कोटींहून अधिक रक्कम निवडणूक अधिका-यांनी जप्त केली आहे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आलेली गुंतवणूक आहे, असं हे बहुसंख्य उमेदवार मानतात आणि पुढची पाच वर्षे सरकारी तिजोरी लुटून त्याची भरपाई करतात.

हा मजकूर प्रसिद्ध होईल तेव्हा महाराष्ट्रातली प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात असेल. या प्रचारात शिवाजी महाराजांपासून अफजल खानापर्यंत, ढाण्या वाघापासून उंदरापर्यंत सारे अवतरले आहेत. पण गेली पाच वर्षे ज्या विषयांवर विधिमंडळात आणि बाहेर वारंवार चर्चा झाली ते विषय गायब झालेले दिसतात. सिंचन घोटाळा असो की राज्याची आर्थिक अवस्था, शेतक-यांच्या आत्महत्या असोत की औद्योगिक प्रगती, रोजगार निर्मिती असो की महिलांचे प्रश्न, एकाही मुद्द्याची धड चर्चा झालेली दिसत नाही. मनसेची ब्ल्यूप्रिंट असो किंवा इतर पक्षांचे जाहीरनामेही दुर्लक्षितच राहिले आहेत. अत्यंत खालच्या दर्जाच्या कोट्या करणं किंवा दोन्ही हात पसरून दणदणाटी भाषणं करणं एवढाच प्रकार या तथाकथित पुरोगामी राज्याने या वेळी मख्खपणे पाहिला आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे माध्यमंही यात वाहवत गेली आहेत. फार थोड्या माध्यमांनी या संदर्भात राजकारण्यांचे कान ओढलेले दिसतात. एरवी पेड न्यूजच्या नशेत यापैकी बहुसंख्य माध्यमं तर्र आहेत.

हे सगळं चित्र पाहून मन उद्विग्न होतं. प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्र का सांगतो असा प्रश्न पुन्हा एकदा पडतो. १९ ऑक्टोबरला या निवडणुकीचे निकाल लागतील. आतापर्यंतच्या सर्व्हेनुसार भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हं आहेत. भाजपला स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळालं तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरची ती ऐतिहासिक घटना ठरेल. अर्थात, हे भाजपपेक्षा नरेंद्र मोदींचं श्रेय अधिक असेल. विरोधी पक्षाला एवढं मोठं बहुमत या राज्यात कधीही मिळालेलं नाही. पण प्रश्न तो नाही. जो कोणी सत्ताधारी बनेल तो महाराष्ट्रातल्या राजकारणाचीही गटारगंगा साफ करण्याचा प्रयत्न तरी करणार आहे का, हा खरा सवाल आहे. नाही तर पुन्हा पुढच्या शिमग्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल!