आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ता आणि अभिनेत्यातला माणूस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि. 13 जुलै. सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांचा आज तिसरा स्मृतिदिन. त्यांचे विचार व कार्य, त्यांना जाऊन तीन वर्षे झाल्याचे वाटू देत नाही. नाव जरी निळू फुले असले तरी लहानांचे आणि थोरामोठ्यांचेही शेवटपर्यंत ते निळूभाऊच राहिले. सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेला रगेल, रंगेल, टगेगिरी करणारा गावगुंड, कारस्थानी पाटील, बेरकी सरपंच, मुरलेला राजकारणी, बिलंदर पुढारी, सचोटीचा पत्रकार, साखर कारखानदारीतला भ्रष्टाचारी चेअरमन, इत्यादी लोकांना माहीत आहेत; पण एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्षात विविध चळवळींमध्ये असलेले त्यांचे योगदान लोकांना माहीत असण्याची शक्यता खूप कमी आहे.
स्थळ- के. सी. कॉलेजचे सभागृह, चर्चगेट, मुंबई. प्रसंग- महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार वितरणाचा. या कार्यक्रमात धुळ्याच्या महिला कार्यकर्त्या विजया चौक यांना निळू फुले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात निळूभाऊ म्हणाले, ‘माझ्यासारख्या माणसाच्या हस्ते विजयातार्इंना पुरस्कार देणे हे मला काही बरोबर वाटत नाही. कारण, आतापर्यंत मी किमान सव्वाशे चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यातील निम्म्यांहून अधिक चित्रपटांमध्ये मी स्त्रियांवर बलात्कार केले आहेत. तेव्हा, तुम्ही समजता तेवढा काही मी चांगला माणूस नाही.’
दि. 26, 27, 28 डिसेंबर 1998. स्थळ- सातारा. प्रसंग- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मेळावा. मेळाव्यातील एका परिसंवादाचा विषय- ईश्वर नावाची संकल्पना आणि तिचा समाजात होत गेलेला विकास. या परिसंवादाचे वक्ते फक्त दोनच. कट्टर नास्तिक असलेले मानवतावादाचे पुरस्कर्ते बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे आणि टोकाचे आस्तिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. परिसंवादाचे अध्यक्ष निळूभाऊ. दोन्ही वक्त्यांनी आपापली भूमिका अतिशय प्रभावीपणे मांडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यवर्तीच्या कार्यकारिणीला आले की ते आम्हाला हमखास सांगायचे, तुमच्यासमोर भाषण करायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. चळवळीसाठी माझी भूमिका ‘ढोलकीवाल्याची’ आहे, असं मी समजतो. त्यामुळे प्रत्येक सभेत माझं भाषण शेवटी असतं. आलेल्या लोकांनी उठून जाऊ नये हा उद्देश! चित्रपट दुनियेत काम करताना सारखे एकमेकांचे हेवेदावे ऐकावे, पाहावे, अनुभवावे लागतात. दोन दिवस तुमच्यात आलं की असं वाटतं, बरं झालं, दोन दिवस अंघोळ झाली.
सामाजिक कृतज्ञता निधी जमवण्यासाठी अमेरिकेच्या दौ-यावर असतानाचा त्यांनी सांगितलेला एक प्रसंग. अमेरिकेतल्या एका बार्इंनी मला विचारले, ‘स्वत:ला समाजवादी व झोपडपट्टी निर्मूलन कार्यकर्ता म्हणवून घेणारा तुमचा समाजवादी कार्यकर्ता एअर कंडिशनच्या ऑफिसमध्ये बसून झोपडपट्टी निर्मूलन कसं करणार?’ मी त्या बार्इंना म्हणालो, ‘बाई, त्याचं काय आहे की आमच्याकडे ‘भेसळ’ लवकर होते. जरा दाढीचं खुंट वाढवलं, जीनची पँट व खादीचा कुर्ता घातला आणि काखेत एखादं झोळकं अडकवलं, की झाला समाजवादी कार्यकर्ता तयार! तुमची गाठ बहुतेक अशाच कुठल्याशा एखाद्या रेडिमेड समाजवादी कार्यकर्त्याशी पडली असावी.’
लातूरला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. विकास आमटे (भामरागड), डॉ. ना. य. डोळे (पुणे), दत्ता देसाई (गारगोटी), प्रा. पुष्पा भावे (मुंबई), कॉ. गोविंद पानसरे (कोल्हापूर), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), डॉ. रावसाहेब कसबे (संगमनेर), डॉ. यशवंत सुमंत (पुणे), डॉ. बाबा आढाव (पुणे), प्रा. जनार्दन वाघमारे (औरंगाबाद), प्रा. एन. डी. पाटील (सांगली), डॉ. श्रीराम लागू (पुणे) असे नामांकित व त्या त्या क्षेत्रातील मातब्बर वक्ते या परिषदेला लाभले होते. कदाचित त्यामुळे ही परिषद वेळेत आटोपण्याऐवजी लांबली. परिषदेची ठरलेली वेळ संपली तेव्हा प्रा. एन. डी. पाटील आणि अध्यक्ष म्हणून निळूभाऊ यांची भाषणे शिल्लक होती. दुपारचे दोन वाजून गेलेले होते. जोरदार भूक लागली होती. काहींना सकाळचा नाष्टाही मिळालेला नव्हता. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लोक आलेले, त्यामुळे परतीच्या प्रवासाची तगमग. या सगळ्याच गोष्टींची परिणती प्रा. एन. डी. पाटील यांचे भाषण चालू असतानाच श्रोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुळबूळ सुरू झाली होती. तितक्यात समारोपाच्या अध्यक्षीय भाषणासाठी निळूभाऊंचे नाव पुकारण्यात आले. उपस्थित श्रोत्यांच्या नाराजीचा व वैतागाचा अगदी अचूक धागा पकडून निळूभाऊ जरा उपरोधिक, पण अतिशय विनोदी ढंगात म्हणाले, कालपासून तुम्ही सर्वांनी तहान-भुकेची पर्वा न करता इथे येऊन सर्वांची भाषणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी शांतपणे मन लावून ऐकली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो. तिस-या स्मृतिदिनानिमित्ताने निळूभाऊंना विनम्र अभिवादन.