आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Niranjan Welankar's Artical On Searchin Of Sachin Tendulkar

शोध एका सचिनचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या चोवीस-पंचवीस वर्षांमध्ये जगामध्ये असंख्य बदल झाले. राजकीय उलथापालथी झाल्या. पेरेस्राइका आणि ग्लास्तनोस्तपासून इजिप्तमधील युवा क्रांती आणि इतरही असंख्य घडामोडी झाल्या. संगणकाच्या जगतामध्ये अक्षरश: अनेक क्रांतिकारी बदल झाले; संगणकाच्या किमान पाच पिढ्या येऊन गेल्या. जागतिकीकरणाने आणि खुल्या व्यापाराने जगाचं रूपांतर एखाद्या खेडेगावात करून टाकलं. सामाजिक क्षेत्रामध्ये शेकडो शहरे नव्याने उभी राहिली. हे सर्व सतत होत असताना आणि सतत बदलत असताना एक गोष्ट स्थिर राहिली. एक गोष्ट अखंड राहिली आणि त्या गोष्टीने असंख्य कमतरता आणि उणिवा किमान तात्पुरत्या झाकल्या. ती गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर हा प्रेरणास्रोत! हार आणि जीत होत असते; जुने जात असतात आणि नवीन येत असतात; परंतु या सर्व वादळांमध्ये जो दीपस्तंभ अविरत उभा असतो; तो शाश्वततेचा एक मानदंड असतो. सचिन गेल्या 24 वर्षांमधली शाश्वतता होता. इतर सर्व काही बदललं. जुने साथी जाऊन नवे आले, खेळ खेळण्याची शैली बदलली, त्याचं शरीर बदललं, वय वाढलं; पण तरीही सचिनरूपी प्रेरणास्रोत अखंड प्रज्वलित राहिला.
अँडी फ्लॉवरने म्हटलं होतं की, जगात फक्त दोन प्रकारचे बॅट्समन असतात. सचिन आणि इतर सर्व. 1998 मध्ये एका नियतकालिकाने ‘एका उदास वर्षामध्ये एका माणसाने आपल्याला संजीवनी दिली,’ असं सचिनबद्दल म्हटलं होतं. खरं तर ते फक्त त्या वर्षासाठी नाही, तर गेल्या 25 वर्षांसाठी लागू पडतं. भारतीय क्रीडाक्षेत्रातील महारथी मिल्खासिंग यांनी स्वत: ‘400 मीटर धावण्यामध्ये मला जे स्थान आहे, ते क्रिकेटमध्ये सचिनला आहे,’ असं म्हणून त्याला सर्वात मोठी शाबासकी दिली. सचिन हा इतक्या मोठ्या प्रमाणात जिव्हाळ्याचा आणि हवाहवासा महानायक आहे. अमिताभ बच्चन किंवा रजनीकांत यांचे चाहतेही कोट्यवधी असतील; परंतु त्यांच्यात आणि सचिनमध्ये एक मोठा फरक हा आहे की, सचिनला कोणत्याही गोष्टीसाठी कधी दुसरी संधी-रिटेक मिळत नाही. त्याची कृती ही खरी असते. अशा या सचिनने गेल्या 25 वर्षांमध्ये आपणा सर्वांना आनंदाचा आणि प्रेरणेचा मोठा ठेवा दिला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इतका प्रदीर्घ काळ प्रभाव ठेवते, तेव्हा साहजिकच काही नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येतातच. चाहते किंवा विशेषज्ञ हेसुद्धा माणूसच असतात. त्यामुळे काही बाबतींत नकारात्मक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. आज ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडचे काही खेळाडू जेमतेम काही वर्षे खेळल्यानंतर निवृत्त होताना दिसतात आणि स्वत:हून तरुण रक्तासाठी स्थान रिकामे करतात. मग असं वाटणं स्वाभाविक आहे की, अपयशी ठरत असूनही सचिन तरुण खेळाडंूची जागा अडवत आहे. यात थोडंसं तथ्य आहे; परंतु ही केवळ एक बाजू झाली. सचिन टीममध्ये आणि ड्रेसिंग रूममध्ये असल्यामुळे इतर खेळाडूंना मिळणारी प्रेरणा आणि क्रिकेटमधील अनुभवाचे बोल याचं मूल्य सचिनच्या बॅटमधून निघणा-या धावांच्या आधारे केलं जाऊ शकत नाही. सचिन देशासाठी आंतरराष्‍ट्रीय टी-ट्वेंटी सामना फक्त एकच खेळला; परंतु क्लबसाठी मात्र तो सहा वर्षे टी-ट्वेंटी सामने खेळला, अशी टीका करणं खूप सोपं आहे; परंतु असा विचार करताना दुर्लक्षित राहते ती दुसरी बाजू. आपण निव्वळ प्रेक्षकाच्याच भूमिकेतून विचार करत राहिलो, तर कित्येक गोष्टी आपल्या नजरेतून सुटू शकतात. कोणत्याही गोष्टीच्या इतरही बाजू असतात.
आणि कधी कधी तर टीका ही सचिनबद्दल नव्हे, तर टीका करणा-या व्यक्तीबद्दल अधिक माहिती देत असते. जेव्हा एखादा खेळाडू इतका मोठा स्टार होतो; तेव्हा निश्चितच त्याला प्रचंड पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर मिळतं. फाइव्ह स्टार ट्रीटमेंट सगळीकडे मिळते; परंतु ही फक्त एक बाजू झाली. सचिन होणं म्हणजे फक्तइतकंच नाही. उलट सचिन होणं खरं तर वेगळंच आहे. सचिन होणं म्हणजे विमानात प्रवास करत असताना समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला राग न येऊ देता किंवा त्रासिक चेहरा न करता स्वाक्षरी देणं, वयाच्या 40व्या वर्षीही सर्वांच्या आधी सरावासाठी नेटमध्ये जाणं; सातत्याने उन्हामध्ये घाम गाळणं आणि सर्व नकारात्मक गोष्टी शांतपणे ऐकणं आणि फक्त बॅटने उत्तर देणं. सचिन होणं सोपं नाहीच आणि म्हणून सचिन समजून घेणंही सोपं नाही.
सचिन निवृत्ती घेत असताना सचिनवर कित्येक जण स्तुतीसुमनं उधळतील; अनेक प्रकारे त्याचा मानसन्मान करतील आणि त्याला अत्यंत प्रतिष्ठेने आणि आदराने निरोप देतील; परंतु या निमित्ताने प्रत्येक क्रीडारसिकाने एक विचार अवश्य केला पाहिजे की, आपण सचिनकडून काय शिकलो; आपण सचिनकडून काही शिकण्याचा प्रयत्न तरी केला का; आपण एखादी अत्यंत छोटी, आपल्या पातळीवरची गोष्ट घेऊन त्यामध्ये सचिनची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला का? सचिनसारखा ‘विराट’ खेळाडू सामान्यजनांसाठी एक अजरामर प्रेरणा देऊन जातो. ‘जे मी करू शकत नाही ते आपला सचू करतो आणि जेव्हा तो ते करतो; तेव्हा मीसुद्धा हे का करू शकत नाही?’ अशी अद्भुत प्रेरणा तो देत असतो. मुद्दा हा आहे की, आपण ही प्रेरणा घेऊन स्वत:च्या आयुष्यात- स्वत:च्या क्षेत्रामध्ये काही करू शकतो का? सचिन बनणं अशक्य आहे. शक्यच नाही. शिवाय प्रत्येक जण वेगळा व तरीही विशेष असतो; पण आपण सचिनसारखी प्रेरणा व्यर्थ दवडणेसुद्धा बरोबर नाही. तो योग्य वेळी निवृत्त होतोय असं किंवा त्याने अजून काही वर्षे निवृत्त व्हायला नको, असं म्हणत बसण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे सचिनकडून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये काही साध्य करण्याची. असं झालं नाही, तर मग म्हणावं लागेल की, आपण फक्त सचिनला देव मानून खेळताना बघत राहिलो किंवा त्यावर टीका करत राहिलो; पण त्यापासून घेतलं काहीच नाही. त्या अर्थाने इतका भव्य योद्धा मिळूनसुद्धा आपण रितेच राहिलो; कोरेच राहिलो. जर असं होऊ द्यायचं नसेल, तर प्रत्येक क्रीडा चाहत्याने सचिन किंवा मिल्खासिंग यांच्यापासून प्रेरणा घेऊन ती कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वत:च्या कृतीत आणली पाहिजे. सचिनसारख्या तेजोनिधी सूर्याला निरोप देताना आपल्यामध्येही स्फुल्लिंग पेटता झाला पाहिजे आणि स्वत:मध्ये दडलेल्या मानवी सचिनचा शोध घेतला पाहिजे.