आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्याने’ पाहिलेले सॅम माणेकशॉ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 3 एप्रिल 2014 रोजी फील्ड मार्शल एसएचएफजे ‘सॅम’ माणेकशॉ यांनी वयाची शंभरी गाठली असती; पण शतक गाठण्याच्या सहा वर्षांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अर्थात, जेथे फील्ड मार्शल निवृत्त झाले, त्या नीलगिरीतील वेलिंग्टनमध्ये त्यांच्या स्मृती आजही जिवंत आहेत. दरवर्षी मी जेव्हा संरक्षण सेवा स्टाफ कॉलेजात वार्षिक व्याख्यान द्यायला जातो, तेव्हा सॅम बहादूर यांचा किमान एक तरी नवा अनुभव मला गवसतो. 2013 हे वर्षही याला अपवाद नव्हते.
कोइम्बतूरच्या विमानतळावर पोहोचलो तेव्हा मद्रास रेजिमेंटच्या गणवेशातील एक संपर्क अधिकारी माझ्या स्वागतासाठी उभा होता. लष्कराच्या काळ्या अ‍ॅम्बेसेडर कारजवळ खाकी गणवेशात उभ्या असलेल्या चालकाने आपला परिचय करून देत माझे स्वागत केले. त्याचे नाव केनेडी. आम्ही त्या कारमधून वेलिंग्टनच्या दिशेने निघालो. केनेडीला मी विचारले, ‘आपण आधी भेटलो आहोत?’ तो म्हणाला, ‘नाही सर, पण मी तुम्हाला टीव्हीवर आणि गेल्या वर्षी फील्ड मार्शलच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमातही पाहिले आहे.’ मी केनेडीला विचारले, ‘तू फील्ड मार्शलना किती जवळून पाहिले आहेस?’ तो म्हणाला, ‘सर, मी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा चालक म्हणून 22 वर्षे काम काम केले.’ ज्याने फील्ड मार्शलना तब्बल दोन दशके अगदी जवळून पाहिले होते, अशा माणसासमोर मी होतो! माझ्यातील पत्रकार आता खडबडून जागा झालेला होता.
खिशातील डायरी, पेन काढून मी केनेडीला पहिला प्रश्न विचारला, ‘फील्ड मार्शलबद्दलची एखादी आठवण सांग!’ तो म्हणाला, ‘खूप आठवणी आहेत.’ दोन मिनिटे अशीच गेली. केनेडी कदाचित काही तरी आठवत होता. मग म्हणाला, ‘जेव्हा जेव्हा मी त्यांच्या घरी जात असे, तेव्हा ते त्यांच्या खानसाम्याला सांगत - केनेडी को चाय पिलाओ, बे्रड में जाम लगाओ, बटर लगाओ.’ प्रत्येक वेळी फील्ड मार्शल मला ब्रेड - बटर खाऊ घालून चहा देत असत. त्यांच्या घरी गाई होत्या. लोणी घरीच तयार केले जात होते. मी विचारले, ‘तू नेहमी त्यांच्या घरी जात होतास?’ तो म्हणाला, ‘पंधरा दिवसांतून एकदा तरी चक्कर व्हायची. सरकारी कार फक्त कार्यालयीन कामांसाठी वापरण्याचा त्यांचा दंडक होता.’ केनेडी सांगतच होता... फील्ड मार्शलांच्या पत्नी सिल्लू त्यांच्या स्वत:च्या मारुती 800 कारमधून बाजारात जायच्या. सॅम स्वत: भाजीपाला, मटण वगैरे आवश्यक वस्तू हौशीने खरेदी करायचे. 1960 मध्ये स्टाफ कॉलेजचे कमांडंट असताना त्यांनी एक प्लॉट खरेदी केला होता; पण मेजर जनरल झाल्यानंतरही त्यावर घर बांधण्याइतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. एकदा ते मला म्हणाले, ‘केनेडी, मला हा प्लॉट खरेदी करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढावी लागली.’ आम्ही मेट्टुपलायमचे पठार सोडून नीलगिरीकडे निघालो तेव्हा केनेडी कमालीचा उत्साहात होता. तो म्हणाला, ‘फील्ड मार्शल यांना सेवानिवृत्तीनंतर सरकारने जी वागणूक दिली ती त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना मुळीच आवडली नव्हती. सरकारने त्यांना बॅटन आणि 5 स्टार्सशिवाय काहीही दिले नाही. एखादी कारसुद्धा नाही.’ केनेडी संतापला होता. ते ऐकून मला प्रश्न पडला की, हा माणूस फील्ड मार्शलच्या कुटुंबीयांनी सांगितलेली माहिती देतो आहे की, पदरचे काही त्यात घालून सांगतो आहे? या चालकाला जे वाटते तसेच सॅम यांनाही वाटत असावे का? मला खात्री नव्हती. मी विचारले, ‘केनेडी तुझे खरे नाव आहे?’ तो म्हणाला, ‘खरे नाव हृदयराज आहे सर. पण मी 1963 च्या नोव्हेंबर महिन्यात जन्मलो. त्याच वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांची हत्या झाली होती. आम्ही ख्रिस्ती आहोत. माझ्या वडिलांवर केनेडींचा प्रभाव होता म्हणूनच त्यांनी माझे नाव केनेडी ठेवले.’
केनेडीला पुन्हा एकदा सॅमच्या आठवणींकडे आणत मी विचारले, ‘तुला त्यांच्याबद्दल आणखी काही आठवते?’ तो म्हणाला, ‘दिल्ली आणि इतर ठिकाणचे अनेक मोठे अधिकारी वेलिंग्टनला आल्यावर फील्ड मार्शलना भेटायला आवर्जून जायचे. अनेकदा मीच त्यांना फील्ड मार्शलच्या घरी घेऊन जायचो. तुम्हाला ठाऊक आहे? मी माझ्या 27 वर्षांच्या सेवेत 500 हून अधिक थ्री स्टार अधिका-यांना या कारमधून प्रवास घडवला आहे. जनरल रॉड्रिग्ज, जनरल सुंदरजी, जनरल मलिक, जनरल जेजे, जनरल व्ही. के. सिंग, जनरल कपूर यांच्यासह अनेक प्रमुखांचे सारथ्य मी केले आहे!’ केनेडीला हेही ठाऊक होते की, कोणत्या लष्करप्रमुखांचे वडील साधे ज्युनियर कमांडिंग आॅफिसर होते! या शतकाच्या पहिल्या दशकात लष्करप्रमुख झालेल्या एका अधिका-याने कसे राजकारण करून हे पद मिळवले आणि त्याची कशी पात्रता नव्हती हेदेखील केनेडीला ठाऊक होते, हे विशेष. केनेडीची स्मरणशक्ती आणि माहिती विलक्षण होती. तो म्हणाला, ‘छत्तीसगड आणि त्रिपुराचे राज्यपाल जनरल के. एम. सेठ इथे 1992-93 मध्ये लष्कराचे चीफ इन्स्ट्रक्टर होते. नंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी अनुक्रमे लष्कर आणि नौदलाचा अभ्यासक्रम येथील स्टाफ कॉलेजातच पूर्ण केला. त्यांच्या मुलाने येथे प्रमुख म्हणून यावे, अशी माझी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही.’ बोलण्याच्या ओघात आम्ही कुण्णूरपर्यंत पोहोचलो होतो. मी केनेडीला म्हणालो, ‘मला वडील आणि पती म्हणून सॅम कसे होते ते सांग.’ त्याने सुरुवात केली, ‘फील्ड मार्शलसाठी पत्नीचा शब्द अखेरचा होता. फील्ड मार्शल एक प्रेमळ पिता आणि आजोबा होते. त्यांचा एक नातू तर अगदी त्यांच्यासारखाच दिसायचा. लांब, धारदार नाक, उंच आणि गोरापान. मी त्यांना कधीच कुणाला शिवीगाळ करताना पाहिले नाही. मॅडमच्या निधनानंतर सॅम कोलमडून गेले. आयुष्यातील ऊर्जा संपल्यामुळे ते आता फार काळ जिवंत राहणार नाहीत याची आम्हाला कल्पना होती. तुम्हाला ठाऊक आहे? राष्‍ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याइतकी सन्मानाची वागणूक फील्ड मार्शलना कोणीच दिली नाही. फील्ड मार्शल रुग्णालयात उपचार घेत असताना मी कलाम यांना माझ्या गाडीतून रुग्णालयात नेले होते. माणेकशॉ यांचे निधन झाले तेव्हा एकही लष्करप्रमुख अंत्यसंस्कारांच्या वेळी आले नाहीत. संरक्षणमंत्री अँटनी यांनी त्यांचे कनिष्ठ मंत्री राजू यांना पाठवले. ‘सर, आमच्या आदर्शांना आम्ही कधी अशी वागणूक देतो?’ मी निरुत्तर झालो.
स्टाफ कॉलेजजवळ पोहोचताना मी केनेडीला विचारले, ‘तुझे फील्ड मार्शलसोबत काही फोटो आहेत?’ संध्याकाळी तो फोटो घेऊन आला. पुढील दोन दिवस केनेडी माझ्या दिमतीला होता. तो मला स्टाफ कॉलेजात, बाजारात घेऊन गेला. मला त्याने दोन दिवसांनी कोइम्बतूरच्या विमानतळावर सोडले तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल असूया होती की, एवढ्या मोठ्या माणसाला किती जवळून पाहण्याची संधी या चालकाला मिळाली. केनेडी आणखी दहा वर्षे नोकरी करेल; पण फील्ड मार्शल यांच्या सहवासातील क्षण जेवढे रोमहर्षक होते ते त्याला कधीच अनुभवायला मिळणार नाहीत.