आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशजी, आता तुम्हीच मनावर घ्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय नितीशजी,
मला नोव्हेंबर 2010 मधील पाटणा दौरा आजही आठवतो. तेव्हा तुम्ही विरोधकांना चारी मुंड्या चीत करून जबरदस्त विजय मिळवला होता. सामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण होते. विमानतळावर भेटलेल्या टॅक्सी ड्रायव्हरपासून हॉटेलच्या रिसेप्शनवरील कर्मचारी, छोटे दुकानदार आणि पत्रकार तसेच आयएएस अधिकारीसुद्धा म्हणत होते की, तुमच्यामुळे बिहार कसा सुधारत आहे. मीसुद्धा तुमचा समर्थक आहे. मला आठवते की, तुम्ही येण्यापूर्वी बिहारमध्ये कशी अराजकसदृश परिस्थिती होती. देशातील राज्यकारभाराच्या प्रणालीनुसार बिहारसारख्या बिघडलेल्या राज्याचा कायापालट केला. तुमच्या वागण्यात नम्रपणासह सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष विचारसरणीसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

असे असूनही तुमच्या या सकारात्मक प्रतिमेबरोबरच एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, तुमच्या मनात आपल्या मतदात्यांच्या आधारवर्गाबाबत असुरक्षिततेची भावना आहे. हिंदू-मुस्लिम गणित नीट न जमल्यास बिहारी जनता आपल्याला मतदान करणार नाही, असे तुम्हाला वाटत असावे. अन्यथा भाजप या तुमच्या सहकारी पक्षातील मोठे नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला तुम्ही विरोध केला नसता. वास्तविक ते या पदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत.

भारतीय राजकारण एकगठ्ठा मतांच्या आधारावरच चालते. कोणताही भारतीय राजकीय नेता जाती, धर्म आणि समूहाचे गणित केल्याशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही हे एखाद्या नवशिक्या राजकीय विश्लेषकालाही माहीत आहे. पण तुम्ही साधेसुधे राजकीय नेते नाहीत, तर देशातील निवडक लोकमान्य राजकीय नेत्यांमध्ये तुमचा समावेश होतो. लोक तुमच्या कार्याकडे पाहून तुमची प्रशंसा करतात, तुम्हाला मतदान करतात. त्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटून घेण्याची गरज नाही.

2014 ची लढत अटीतटीची झाली पाहिजे. कारण ती दोन्ही मोठ्या पक्षांना सावध ठेवेल. आपल्यावर राज्य करण्याची कुवत असणा-या नेत्यांपैकी योग्य पर्याय निवडण्याचा हक्क भारतीयांना आहे. काँगेसची सूत्रे कोणाच्या हाती राहतील याची आम्हाला कल्पना आहे. सत्ताधारी आघाडीला जबरदस्त टक्कर देऊ शकतील, असे नरेंद्र मोदी हे नि:संशय समर्थ दावेदार भाजपमध्ये आहेत. हा उमेदवार कोणाच्या मर्जीनुसार निवडला जात नसून लोकप्रियतेच्या लाटेचा तो परिणाम आहे. हे नाकारून तुम्ही जनतेच्या मताचा एकप्रकारे अनादरच करत आहात. तुम्ही तुमच्या सहकारी पक्षाने निवडलेल्या उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत तुमचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि असुरक्षिततेची भावना कशी दूर कराल यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.

चौथ्या पिढीतील घराणेशाही परंपरावाद्यांना ही निवडणूक सोपी व्हावी असे तुम्हाला वाटते का? माध्यमांशी न बोलणारा आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारा पंतप्रधान आपल्याला हवा आहे का? निखालस कुवतीच्या बळावर आपण राजकीय नेते म्हणून उदयास आलात. मग घराणेशाहीचा वारसा चालवणा-या कुटुंबाला आपण अप्रत्यक्ष पाठिंबा देणार आहात का? हा पाठिंबा त्या राज्यकर्त्यालाही असेल जो गरजेच्या वेळी आपल्या लोकांना साथ देईलच याची खात्री नाही. आपल्या यशोगाथेचे हेच फळ असेल का? धर्मनिरपेक्ष उमेदवाराची मागणी आपल्या सहकारी पक्षाकडे करून तुम्ही दाखवून देताहात की, काही भाजप नेते धर्मनिरपेक्ष आहेत आणि काही नाहीत. आपल्या सहकारी पक्षावर असा अप्रत्यक्ष आरोप करणे योग्य नाही.

जर तुमच्या मनात एखाद्याच्या धर्मनिरपेक्षतेबाबत साशंकता असेल तर अशा वेळी तुमची जास्तच आवश्यकता भासेल. जातीय प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही संतुलन साधणारा घटक ठराल. तेव्हा केवळ चांगली कामे व्हावीत म्हणून नितीशकुमार भाजपचे भागीदार व पाठीराखे होतील, असे नव्हे तर देशाची धर्मनिरपेक्ष वीण टिकण्याकडेही त्यांचे लक्ष असेल. देशाच्या पूर्वेकडील भागांमध्ये प्रभाव निर्माण होण्याच्या दृष्टीनेही तुमचे महत्त्व आहेच, कारण बहुधा तेथे मोदींचा जास्त प्रभाव दिसत नाही.

माझ्या मते तुम्ही हेसुद्धा पाहाल की, येथे काय पणाला लागले आहे. सर्वोच्च पदावर एखादा अस्सल नेता असावा याची वाट देशातील तरुणवर्ग आतुरतेने पाहत आहे. तुम्ही यासाठी त्यांना मदत करू शकता किंवा इतरांप्रमाणे त्यांच्याशी राजकारणाचा खेळ खेळू शकता. परंतु फरक असा आहे नितीशजी की, तुम्ही इतरांसारखे नाही. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत.

राजकारणाच्या खेळाबाबत बोलायचे तर मोदींबद्दल तुमच्या मनातील अढीचे निराकरण होऊ शकते. आघाडीमध्ये एखादा असाही उमेदवार असू शकतो, जो सर्वमान्य असेल. मोदी त्याच्या मागे राहतील व तो पुढे राहील. त्याने तुमचे समाधान होईल. मात्र, नियंत्रण मोदींचेच असेल. पण असे करणे चुकीचे ठरेल. आपण अनेक राजकीय खेळी खेळलो आहेत. ज्याच्यामागे बेजबाबदार नेते असतील असे कळसूत्री बाहुलीसारखे नेतृत्व आम्हाला नको आहे. हा देखावा कशाला? जर भाजपचे पाठीराखे मोदींना आपला नेता म्हणून स्वीकारत असतील तर दाखवण्यासाठी इतर कुणाला कशासाठी पुढे करायचे? सध्या असलेल्या परिस्थितीपेक्षा त्यात काय वेगळे असेल?

म्हणून देशासाठी थोडे नरमाईने घ्या. बिहारमध्ये तुमची मते पक्की आहेत. बिहारी लोकांचा (मग तो हिंदू असो की मुसलमान किंवा अन्य) तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आपल्या सहकारी पक्षाच्या पसंतीला कशामुळे पाठिंबा दिला आहे हे ते समजून घेतील. तुमचा विजय एकगठ्ठा मतांवर अवलंबून नाही. तुम्ही एक ब्रँड आहात. शिक्का मारताना मतपत्रिकेवर तुमचे नाव असणेच लोकांना पुरेसे आहे. सर्वोत्कृष्ट योद्ध्यालाच विजयश्री मिळावी, असा खराखुरा संग्राम 2014 मध्ये व्हायला हवा.

chetan.bhagat@gmail.com